जिल्हा ग्रंथालयांतर्फे शाळा दत्तक योजना

अमृता जोशी
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

विद्यार्थ्यांना विनामूल्य सभासद करून घेणार; वाचनसंस्कृती वाढण्यासाठी उपक्रम

विद्यार्थ्यांना विनामूल्य सभासद करून घेणार; वाचनसंस्कृती वाढण्यासाठी उपक्रम
कोल्हापूर - जिल्हा ग्रंथालयांतर्फे पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा जिल्ह्यांत शाळा दत्तक योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांतर्फे ही योजना शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना विनामूल्य ग्रंथालयाचे सभासद करून घेतले जाईल.

भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या 125 व्या जन्मदिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात या योजनेचा प्रारंभ झाला. शालेय मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ग्रंथालयातील ग्रंथसंपदेचा प्रचार व प्रसार व्हावा, त्या माध्यमातून वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी दत्तक घेण्यायोग्य प्राथमिक, माध्यमिक शाळांची निवड करावी. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना विनामूल्य ग्रंथालयाचे सभासद करून घेतले जाणार आहे. मात्र, ग्रंथालयांवर हा उपक्रम राबविण्याची सक्ती नाही. ग्रंथालयांसाठी हा उपक्रम ऐच्छिक असून यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या परीरक्षण अनुदानाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा जादा निधी देण्यात येणार नाही. उपक्रमासाठी जिल्हा ग्रंथालयातर्फे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना आवश्‍यक ते मार्गदर्शन केले जाणार आहे.

उपक्रमाची उद्दिष्टे
- विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे
- वाचन संस्कृतीपासून दूर चाललेल्या उदयोन्मुख पिढीस वाचते करणे
- ग्रंथालयांसाठी भविष्यातील वाचक तयार करणे
- वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न करणे
- सार्वजनिक ग्रंथालयांची कार्यक्षमता वाढविणे

जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांपासून साधारण चार ते पाच किलोमीटर अंतरावरील शाळांमध्ये हा उपक्रम राबवायचा आहे. सोयीनुसार आठवडा ते पंधरा दिवसांच्या अंतराने पुस्तके बदलून देण्यासाठी, इतर संबंधित कामकाजासाठी ग्रंथालयाचे कर्मचारी शाळांमध्ये जातील. यामुळे यासाठी अधिक निधीची आवश्‍यकता नाही.
- अपर्णा वाईकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी

ग्रंथालयाकडून परिसरातील शाळांना भेटी देऊन शाळा दत्तक योजना राबविण्यास सुरवात झाली आहे. शाळांकडून, विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. खूप चांगली योजना आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लागण्यास, वाचनसंस्कृती वाढण्यास निश्‍चितपणे मदत होईल.
- मनीषा शेणई, ग्रंथपाल, करवीर नगर वाचन मंदिर