दिल्लीमध्ये लवकरच ‘शाहू छत्रपती’ प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - ‘अभिजात भारतीय लघुचित्रशैलीतील चित्रांतून करवीर संस्थानचा इतिहास पाहून थक्क व्हायला होते. ‘युनाते’च्या टीमचे त्याबद्दल अभिनंदनच. आता हेच प्रदर्शन लवकरच दिल्लीमध्ये आयोजित केले जाईल,’ अशी ग्वाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. येथील युनाते क्रिएशन्स आयोजित ‘शाहू छत्रपती’ या प्रदर्शनाच्या उद्‌घाटनावेळी ते बोलत होते. 

कोल्हापूर - ‘अभिजात भारतीय लघुचित्रशैलीतील चित्रांतून करवीर संस्थानचा इतिहास पाहून थक्क व्हायला होते. ‘युनाते’च्या टीमचे त्याबद्दल अभिनंदनच. आता हेच प्रदर्शन लवकरच दिल्लीमध्ये आयोजित केले जाईल,’ अशी ग्वाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. येथील युनाते क्रिएशन्स आयोजित ‘शाहू छत्रपती’ या प्रदर्शनाच्या उद्‌घाटनावेळी ते बोलत होते. 

दरम्यान, ‘प्रदर्शनातील काही कलाकृती घेऊन त्या देशभरातील विविध खासदारांना दिल्या जातील. कोल्हापुरात सुसज्ज कलादालनासाठी लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून द्या. तो मंजूर करून आणला जाईल,’ असेही त्यांनी या वेळी सांगितले. 

प्राचार्य अजय दळवी म्हणाले, ‘‘राजस्थानमध्ये शाहू महाराजांची छायाचित्रे केवळ ‘महाराजा’ अशा नावाने विकली जातात आणि परदेशांतील लोक ती मोठ्या प्रमाणावर घेतात. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर शाहू महाराजांनाच भारतीय लघुचित्रशैलीत सर्वांसमोर आणायला हवे, अशी केवळ भावना व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांनी कष्ट घेऊन या कलाकृती 
साकारल्या.’’

युरोपियन पोर्ट्रेचरची चलती असताना जाणीवपूर्वक ‘युनाते’च्या टीमने अभिजात भारतीय लघुचित्रशैलीत कलाकृती साकारल्या आहेत. प्रतीक्षा व्हनबट्टे, आकाश झेंडे, शुभम चेचर, दुर्गा आजगावकर, अभिषेक संत, पुष्पक पांढरबळे, अनिशा पिसाळ आदींच्या कलाकृतींचा त्यात समावेश असून प्रदर्शन ११ नोव्हेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, रणरागिणी ताराराणी यांच्यापासून ते श्रीमंत शाहू महाराज यांच्यापर्यंतची विविध पोर्ट्रेटस्‌ प्रदर्शनात आहेत. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सोनतळी येथे दरबारी चित्रकार दत्तोबा दळवी यांच्या पुढाकाराने भेट झाली होती. काही वर्षांपूर्वी संशोधनातून ही माहिती पुढे आली. मात्र या प्रदर्शनाच्या निमित्ताने ही भेट पहिल्यांदाच चित्रबद्ध झाली आहे. त्याशिवाय शाहू महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, चित्त्याकडून काळविटाची शिकार आदी प्रसंगांवर आधारित कलाकृती लक्षवेधी ठरत आहेत. उद्‌घाटन सोहळ्यासाठी डॉ. नलिनी भागवत, विजय टिपुगडे, सागर बगाडे आदी उपस्थित होते. 

ब्रिटिश लायब्ररी...
चित्रकलेतील ‘कोल्हापूर स्कूल’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या धुरंधरांच्या कलाकृती आजही ब्रिटिश लायब्ररीत जपून ठेवल्या आहेत. आपला अमूल्य ठेवा कसा जपून ठेवायचा, हा एक आदर्शच या लायब्ररीने घालून दिला आहे. या लायब्ररीत नव्या पिढीची चित्रे कशी जातील, यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही खासदार संभाजीराजे म्हणाले.