शाहू महाराजांनी समाज बौद्धिकदृष्ट्या समृद्ध केला - राहुल सोलापूरकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

कोल्हापूर  - ‘‘सामान्य व्यक्तींचे प्रश्‍न समजून घेण्याला राजर्षी शाहू महाराजांनी प्राधान्य दिले. त्यातून अनेक प्रकरणांत जागेवर आदेश काढले. याशिवाय मोफत शिक्षण कायदा करून समाजातील दुर्बल घटकाला बौद्धिकदृष्ट्या समृद्ध बनविले. राधानगरी धरण बांधताना प्रथम लोकांचे पुनर्वसन केल्यानंतर धरण बांधले. ते लोकराजे होते. त्यामुळे महाराजांचा इतिहास सर्वार्थाने समजून घेण्याबरोबर आचरणात आणला पाहिजे,’’ असे मत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आज येथे व्यक्त केले. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या येथील शाखेतर्फे शाहू जयंतीनिमित्त ‘लोकराजा शाहू महाराज’ या विषयावर श्री. सोलापूरकर यांचे व्याख्यान झाले, या वेळी ते बोलत होते. 

श्री. सोलापूरकर म्हणाले, की ‘‘ राजर्षी शाहू महाराजांनी संस्थानचा कारभार महालात बसून न चालवता रयतेत स्वतःचे मंत्रिमंडळ सोबत घेऊन फेरी मारत, लोकांच्या व्यथा समजून घेत त्यांना तत्काळ मदत करीत. शिक्षण, उद्योग, व्यापार, कला, संस्कृती, नाटक, चित्रपट अशा प्रत्येक विषयांत त्यांनी कार्य केले.’’ 

ते म्हणाले, ‘‘एका वसतिगृहात विशिष्ट जातीची मुले बसतात, दुर्बल घटकांतील मुले बाहेर दिव्याखाली बसून अभ्यास करतात हे पाहून त्यांनी विविध जातींच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू केली. त्यातून बहुजनांच्या पिढ्या िशकल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीएला पहिले आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी महाराज मुंबईला गेले.’’  

वेदोक्त प्रकरणानंतर लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये महाराजांच्या भूमिकेवर टीका करणारे अग्रलेख लिहिले त्यानंतर त्याच केसरीमध्ये त्यांना दिलगीरी व्यक्त करावी लागली. 

चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडण्याचा पहिला प्रयत्न शाहू महाराजांनी केला. शाहू महाराजांविषयीचा इतिहास सांगताना अनेकदा सोयीनुसार सांगितला गेला. त्यातून काही गैरसमज निर्माण झाले. त्याला कोल्हापूरकरांनी उत्तर देण्याची गरज आहे, असेही श्री. सोलापूरकर यांनी सांगितले.      

म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, की ‘‘राजर्षी शाहू महाराज मॅनेजमेंट गुरू होते. समाजहितासाठी क्रांतिकारी निर्णय घेतले. विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले. मुलीच्या वडिलांना संपत्तीत हक्क दिला. देवदासी प्रथा निर्मूलन व मोफत शिक्षणाचा कायदा केला. अशा त्यांच्या कार्याचा लौकिक देशभर आहे. त्याच वाटेने आम्ही चालत आहोत. म्हणून कागल तालुक्‍यात जलयुक्त शिवार योजना राबविणार आहोत. गाळ काढण्यापासून ते पाण्याची पातळीत वाढविण्यासाठी व्यापक काम करणार आहोत. त्यासाठी वाढदिवस किंवा तत्सम कार्यक्रमांचा खर्च अशा समाजोपयोगी कार्यासाठी वापरणार आहोत.’’ संघाचे अजय कुलकर्णी, भगतराम छाबडा, सूर्यकिरण वाघ यांनी संयोजन केले.