मंडलिकांच्या कार्यक्रमाला शरद पवार

मंडलिकांच्या कार्यक्रमाला शरद पवार

कोल्हापूर - माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कार वितरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार कोल्हापुरात येणार आहेत. ३० डिसेंबरला हा कार्यक्रम होण्याची शक्‍यता आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘राष्ट्रवादी’ने जिल्ह्यात लोकसभेसाठीची जुळवाजुळव सुरू केल्याचे बोलले जाते. 

(कै.) मंडलिक यांचे पुत्र व शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांना ‘राष्ट्रवादी’त घेऊन २०१९ मध्ये लोकसभेची उमेदवारी त्यांना देण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांचे प्रयत्न सुरू आहेत. या घडामोडींत आमदार सतेज पाटील यांचाही पुढाकार आहे. त्याचाच एक भाग म्हणून यापूर्वी (कै.) मंडलिक यांच्या पुतळ्याचे अनावरण श्री. पवार यांच्या हस्ते व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन होते. पण दोघांच्या तारखा एकाच दिवशी न मिळाल्याने हा कार्यक्रम श्री. ठाकरे यांच्या हस्तेच झाला. दोन वर्षांपासून (कै.) मंडलिक यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय पातळीवरील एक व राज्य पातळीवरील चार विविध क्षेत्रांत काम केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविले जाते.

गेल्या वर्षी या कार्यक्रमाला पवार यांना आणण्याचे प्रयत्न झाले होते; पण त्यात यश आले नाही. म्हणून यंदा पवार यांच्याच उपस्थितीत हा कार्यक्रम ३० डिसेंबरला घेण्याचे नियोजन सुरू आहे. पवार यांच्याकडूनचही तारीख निश्‍चित झाली आहे. 
‘राष्ट्रवादी’तील जिल्ह्याचे खासदार धनंजय महाडिक हे पक्षापासून चार हात लांबच आहेत. अलीकडे त्यांची उठबस भारतीय जनता पक्ष नेत्यांबरोबरच वाढली आहे. लोकसभेनंतर झालेल्या सर्वच निवडणुकांत श्री. महाडिक यांनी पक्षाला मदत होईल, असे काहीही केलेले नाही,

उलट पक्षविरोधीच भूमिका त्यांची राहिली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणारे पक्षाचे मेळावे सोडले तर इतर वेळी त्यांचा पक्ष कार्यालयाशीही फारसा संपर्क नसतो. त्यातून श्री. मुश्रीफ यांच्यासह पक्षातील सर्वच नेते त्यांच्यावर नाराज आहेत. श्री. महाडिक हेही पुढच्यावेळी पक्षाचे उमेदवार असतील की नाही, हे तेही खात्रीने सांगू शकत नाहीत. अशा परिस्थितीत पक्षाला दुसरा प्रबळ उमेदवार शोधावा लागत आहे. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत श्री. महाडिक विरुद्ध प्रा. मंडलिक अशी लढत झाली होती. येणाऱ्या निवडणुकीतही हेच दोन पहिलवान आमनेसामने असतील. फक्त त्यांच्या पक्षाचे रंग वेगळे असतील. या पार्श्‍वभूमीवर प्रा. मंडलिक यांनाच ‘राष्ट्रवादी’त घेऊन लोकसभेचे उमेदवार म्हणून त्यांना ‘प्रपोज’ करण्याचे प्रयत्न ‘राष्ट्रवादी’चे आहेत. अन्यथा श्री. मुश्रीफ यांनाच ऐनवेळी लोकसभेच्या मैदानात उतरावे लागणार आहे. आपल्याला केंद्रात जायला अजून अवकाश असल्याचे सांगणारे श्री. मुश्रीफ हेच या घडामोडींत आघाडीवर आहेत. श्री. पवार यांच्या उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे. 

हा कार्यक्रमही कोल्हापुरातच
पंधरा दिवसांपूर्वी (कै.) मंडलिक यांच्या स्मरणार्थ जंगी कुस्तीचे मैदान शहरातील शाहू खासबाग मैदानात घेण्यात आले. या मैदानावर महाडिक व भाजप सोडून सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. आता पुरस्कार वितरणाचा कार्यक्रमही कोल्हापुरातच हॉकी स्टेडियम परिसरातील मैल खड्डा मैदानावर घेण्याचे नियोजन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com