गुणवत्तेशी स्पर्धा करणारा ‘शिरगावकर ब्रदर्स’ उद्योग समूह  

गुणवत्तेशी स्पर्धा करणारा ‘शिरगावकर ब्रदर्स’ उद्योग समूह  

नागाव - कोणताही व्यवसाय करा; पण त्यामध्ये अव्वल राहा, देशात नव्हे तर परदेशांतही तुमच्या गुणवत्तेला स्पर्धा नसावी, अशीच काहीशी वाटचाल ‘शिरगावकर ब्रदर्स’ या उद्योग समूहाची आहे. कोल्हापुरात विविध नवीन उद्योग उभारणीमध्ये समूहाचे महत्त्वाचे योगदान आहे. चौथी पिढी यशस्वीपणे कार्यरत असणारा जिल्ह्यातील एकमेव उद्योग समूह म्हणूनही याची ओळख आहे. 

विन्ड टर्बाइन कास्टिंगसह हेवी ड्यूटी इंजिनिअरिंग कास्टिंगचे उत्पादन करणारा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगातील पहिल्या पाच क्रमांकांमध्ये ‘सिनर्जी ग्रीन’चा समावेश आहे. भारतातील सर्वाधिक गाळप क्षमतेमुळे (एका हंगामात एकोणीस लाख पन्नास हजार टन) चालू वर्षी उगार शुगर मिलला ओळखले गेले.

रावजी, रामचंद्र, सीताराम, शांताराम आणि राजाराम या पाच शिरगावकर बंधूंनी एकत्र येऊन १९०७ मध्ये ‘शिरगावकर ब्रदर्स’ची स्थापना केली. या समूहामार्फत कोल्हापुरात पहिली ऑईल मिल ‘कोल्हापूर ऑईल’ १९१३ मध्ये; छत्रपती राजाराम महाराजांच्या पाठबळावर १९३२ मध्ये पहिला साखर कारखाना 
‘कोल्हापूर शुगर मिल’, पहिला साबण कारखाना, कोल्हापूर साबण कारखाना, पहिली बॅंक ‘बॅंक ऑफ कोल्हापूर’, काळ्या गुळाची खांडसरी अशा विविध उद्योगांची मुहूर्तमेढ रोवण्याचे कार्य या समूहाने केले. 

दुसऱ्या पिढीतील विनायकराव शिरगावकर यांनी सांगली संस्थानच्या आधिपत्याखाली असणाऱ्या उगार या गावी ‘उगार शुगर मिल’ची स्थापना १९४२ मध्ये केली. सुरेश ऊर्फ बाबूकाका शिरगावकर त्यांच्यासोबत होते. 

तिसऱ्या पिढीतील राजाभाऊ, प्रफुल्ल, शिशिर आणि संजीव यांनी ‘उगार शुगर मिल’ची धुरा सांभाळत गाळप क्षमता प्रतिदिन दहा हजार टनांपर्यंत वाढवली. शिवाय भारतातील पहिला को-जनरेशन प्रकल्प १९९५ मध्ये सुरू केला. 

त्याच दरम्यान दुसऱ्या पिढीतील विनायकराव शिरगावकर यांनी साखर कारखान्यांना लागणाऱ्या क्रशिंग रोलर्सची निर्मिती करणाऱ्या ‘एस. बी. रिशेलर्स’ या उद्योगाची स्थापना १९७८ मध्ये केली आणि याची सर्व जबाबदारी तिसऱ्या पिढीतील मोहनराव शिरगावकर व दिनकरराव ऊर्फ मेजर यांच्याकडे सोपविली. वसंतराव आणि कुमार शिरगावकर यांनी ‘तारा टाईल्स’ आणि १९९४ मध्ये हॉटेल पॅव्हेलियन सुरू केले. 

आता चौथ्या पिढीतील सचिन व सोहन शिरगावकर यांनी एस. बी. रिशेलर्सची धुरा यशस्वीपणे सांभाळला. देशातील दोनशेहून अधिक साखर कारखान्यांना; तसेच आफ्रिका, साऊथ ईस्ट एशिया, अमेरिका अशा सुमारे पंचवीस देशांना रोलर पुरवठा केला जातो. एक टन ते ऐंशी टन वजनापर्यंतच्या कास्टिंग रोलर उत्पादनाची क्षमता आहे. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये ‘सिनर्जी ग्रीन’ कंपनीची २०१० मध्ये स्थापना केली. चौथ्या पिढीतील नीरज व चंदन शिरगावकर यांनी उगार शुगर मिलची जबाबदारी स्वीकारली आहे. 

सामाजिक बांधिलकीतून उगारमध्ये पस्तीस बेडचे अद्ययावत हॉस्पिटल, साडेतीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत असणारी शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कला व वाणिज्य महाविद्यालय, जिमखाना, त्याचप्रमाणे मिरजेतील श्री सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल, कोल्हापुरातील स्वयंसिद्धा, अवनी, स्वयंम, मतिमंद, ऋणानुबंध, एकटी अशा अनेक सेवाभावी संस्थांमध्ये शिरगावकर समूहाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com