हिंमत असेल तर शिवसेनेच्या विरोधात विधानसभा लढवा 

डॅनियल काळे
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

पालकमंत्री पाटील यांना खासदार किर्तीकर यांनी दिले आव्हान 

कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सत्तेच्या जोरावर जर शिवसेनेवर अन्याय करणार असतील तर त्यांनी कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, शिवसेना त्यांचा पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे आव्हान शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी आज येथे दिला. कळंबा येथील अमृतसिध्दी हॉलमध्ये आयोजित केलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार, जिल्हाप्रमुख यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. या मेळाव्यात कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यातून शिवसेनेचे 16 आमदार निवडून आणण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

खासदार गजानन किर्तीकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेवर मोठा अन्याय केला जात आहे. शिवसेनेच्या आमदांवर, कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करुन पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या मागे लावला जात आहे. शिवसेनेच्या विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण केले जात आहे. भाजपचे आमदार, भाजपचे नगरसेवक, यांच्याकडे जादा निधी दिला जात आहे. शिवसेनेवर हा एकप्रकारे अन्याय आहे. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांना त्यांची जागा दाखवून देउ. वेळप्रसंगी त्यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हापोलिस प्रमुख कार्यालयावरही मोर्चे काढू. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहे. ते शिवसेनेच्या मार्गात अडथळा आणत आहेत. त्यांना जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे. त्यामुळे या मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही आव्हान देतो की, त्यांनी कोणत्याही एका विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, आम्ही त्यांच्या विरोधात लढू आणि मैदानातच शिवसेनेची ताकद काय आहे, ते दाखवून देउ. कोल्हापूरातील दहा जागापैकी किमान आठ जागा, सांगली आणि सातारा जिल्ह्यातून अनुक्रमे 4 जागा निवडून आणल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही.

यावेळी बोलताना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, जिल्ह्यात शिवसेनेची मोठी ताकद आहेत. आठ आमदार आहेत. 2009 नंतर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीतही भाजपाला त्यांची जागा दाखवून देउ. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनीही बाळासाहेब ठाकरे यांचे काम तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम येथल्या शिवसैनिकांनी केल्यामुळे शिवसेना तळागाळापर्यंत पोहचली आहे. नजीकच्या काळात हे यश आणखीन उज्वल करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे. या मेळाव्यास आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, आमदार उल्हास पाटील, आमदार सत्यजित पाटील सरुडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव, विजय देवणे आदी उपस्थित होते.

मोदी, शहा, जेटली यांची एकाधिकारशाही 
केंद्रातील सरकारमध्ये मोदींची एकाधिकारशाही आहे. नोटाबंदी, जीएसटी असे निर्णय लादून जनतेला नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळे या एकाधिकारशाहीलाच आव्हान देण्याची गरज आहे. मोदींच्यावर जनतेने विश्‍वास टाकला. हिंदूत्वासाठी शिवसेनेने राज्यात पाठींबा दिला. पण कांहीही काम झाले नाही. मोदींच्यावर दाखविलेला विश्‍वास वाया गेला आहे. त्यामुळे या भाजपावाल्यांची मनमानी शिवसेना आता चालू देणार नाही. आयात उमेदवार, आयात कार्यकर्त्यांच्या जीवावर भाजपा मोठी होत असून शिवसेनेला संपवू पहात आहे. त्यामुळे आता त्यांना शिवसेनेची ताकद दाखविण्याची गरज आहे. शिवसेनेने सर्व जातीधर्माची माणसे जोडली आहेत. शिवसेनेला मोठा जनाधार आहे, असेही किर्तीकर म्हणाले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :