छत्रपती शिवाजी चौकाच्या सुशोभीकरणाला प्रारंभ

छत्रपती शिवाजी चौकाच्या सुशोभीकरणाला प्रारंभ

कोल्हापूर - भगवे ध्वज आणि फेट्यांचा दिमाखदार बाज... ‘जय भवानीऽऽ जय शिवाजीऽऽ’ असा अखंड जयघोष... नसानसांत शिवप्रेम भारणारा प्रेरणा मंत्र... ढोल-ताशा आणि धनगरी ढोलांचा निनाद आणि ‘तोंडात मावा माझ्या भावा, कसला रं तू शिवाजीचा छावा’, असा सवाल उपस्थित करीत शाहिराने मारलेली डफावरची थाप... अशा चैतन्यदायी वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण कामाला प्रारंभ झाला. हजारो कोल्हापूरकरांच्या साक्षीने हा कार्यक्रम सजला.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. महापौर हसीना फरास अध्यक्षस्थानी होत्या. दरम्यान, आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाच महिन्यांत सुशोभीकरणाचे काम पूर्ण करून तमाम कोल्हापूरकरांच्या साक्षीने लोकोत्सव साजरा करणार असल्याचे जाहीर केले.   

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ३३ गड-किल्ल्यांवरील माती, दगड व पाणी, जिल्ह्यातील पवित्र नद्यांचे पाणी व शहरातील शाहूकालीन तालमीतील माती पायाभरणीसाठी वापरली. बिंदू चौकातून सकाळी सवाद्य मिरवणुकीने कलश मिरवणूक शिवाजी चौकात आली आणि कार्यक्रमाला प्रारंभ झाला. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती ताराराणी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या चित्ररथांनी या सोहळ्याची उंची आणखीन वाढवली. भूमिपूजन विधीचा मान नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सेवा करणाऱ्या दाम्पत्यास देण्यात आला.

जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक झाल्यानंतर पायाभरणी सोहळा झाला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवप्रेरणा मंत्राद्वारे स्वराज्याची शपथ दिली. शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी पोवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा इतिहास उलगडला. 

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. सर्वसमावेशक विकास हाच खरा शिव विचार असून साडेतीनशे वर्षांनंतरही हा विचार आजही दिशादर्शक आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक कोल्हापूरचे प्रेरणास्थळ असून त्याचा अपमान होणार नाही, याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. 

महापौर हसीना फरास म्हणाल्या, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या पायाभरणी समारंभासाठी अध्यक्षपद मिळणं, हा माझा मोठा गौरव आहे. सर्व जातिधर्मीयांचे हे स्फूर्तिस्थान असून त्यापासून प्रेरणा घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबवावेत.’’ 

आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुतळा सुशोभीकरण कामाचा प्रवास उलगडला. पुतळा सुशोभीकरण हा कुठल्याही राजकीय पक्षाचा विषय नाही. कोल्हापूरच्या अस्मितेसाठी सुशोभीकरण होत असून त्यासाठीचा सर्व निधी महापालिकेकडे सुपूर्द केला आहे. देशातील पहिल्या क्रमांकाचे हे स्मारक होईल आणि त्याचा उद्‌घाटन सोहळा म्हणजे कोल्हापूरकरांचा लोकोत्सव असेल, असेही ते म्हणाले. 

माजी महापौर उदय पवार, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मनोगते व्यक्त केली. पद्माकर कापसे, अंकुश निपाणीकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला उपमहापौर अर्जुन माने, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या खजानीस वैशाली क्षीरसागर, स्थायी समिती सभापती संदीप नेजदार, परिवहन सभापती नियाज खान, नगरसेवक ईश्‍वर परमार, उमा बनछोडे, निलोफर आजरेकर, प्रतिज्ञा उत्तुरे, सुरेखा शहा, माजी महापौर विलासराव सासणे, ॲड. महादेवराव आडगुळे, मारुतराव कातवरे, आर. के. पोवार, नंदकुमार वळंजू, रविकिरण इंगवले, प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके, दिग्दर्शक यशवंत भालकर, अशोक देसाई, किशोर घाटगे, आदिल फरास, महेश उत्तुरे, सुरेश यादव, उदय भोसले, दिलीप देसाई, दीपक गौड, चंद्रकांत बराले, मधुकर नाझरे, चंद्रकांत यादव आदी उपस्थित होते. मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने या वेळी अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती. बोर्डिंगचे संचालक कादर मलबारी आणि गणी आजरेकर यांचे विशेष सहकार्य मिळाले.

यांचे विशेष सत्कार
कार्यक्रमात स्वातंत्र्यसेनानी भागीरथी तांबट याचे वारसदार निशिकांत तांबट आणि स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील यांचे वारस प्रकाश पाटील यांच्यासह शहाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष उदय शिंदे, आर्किटेक्‍ट सूरज जाधव, पुतळ्याची नित्य पूजा करणारे पिंटू पोवार, दररोज पुतळ्याला हार अर्पण करणारे महमद पठाण, सुनील सूर्यवंशी, आशिष घोरपडे, दिगंबर साळोखे, सुरेश यादव, मानसिंग जाधव, प्रशांत पाटील, राजन भिलारी, बाळासो मुंगसुळे, सुनील करंबे, खंडोबा तालीम मर्दानी खेळ पथक, भारतवीर प्रतिष्ठान ढोल-ताशा पथक, कोपर्डी हत्याकांडाचा यशस्वी तपास करणारे पोलिस अधिकारी शशीराज पाटोळे आदींचा विशेष सत्कार झाला. मात्र विल्सनचा पुतळा विद्रुप करण्यात आघाडीवर असलेल्या स्वातंत्र्यसेनानी जयाबाई हावेरी यांच्या नावाचा उल्लेख केवळ एखाद-दुसऱ्याच वक्‍त्याने केला.  

मूळ पाटी कायम 
शिवस्मारकासाठी अनेक सूचना घेतल्यानंतर अंतिम स्वरूप देण्यात आले. पुतळ्यावर असणारी मूळ पाटीही जतन करावी आणि शिवस्मारकात ती ठळकपणे दिसेल, अशा ठिकाणी लावावी, अशी मागणीही आता होऊ लागली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com