‘किंग मेकर’च्या दिशेने विद्यापीठ विकास मंच...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या (सिनेट) निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचने ‘किंग मेकर’ होण्याची संधी मिळवली आहे. पाच संघटनांच्या एकत्रीकरणातून मंच आकाराला आल्याने यंदाच्या निवडणुकीत कोणाचा वरचष्मा राहणार, हे स्पष्ट झाले आहे. गेली कित्येक वर्षे विद्यापीठात बस्तान बसविण्यासाठी खटाटोप करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने यंदा आपला खुट्टा मजबूत केला आहे. राज्यातील भाजपच्या सत्तेचा सारीपाट पाहता विद्यापीठ वर्तुळातील संघटनांनी या सारीपाटावरच आपला डाव मांडला आहे.  

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या (सिनेट) निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचने ‘किंग मेकर’ होण्याची संधी मिळवली आहे. पाच संघटनांच्या एकत्रीकरणातून मंच आकाराला आल्याने यंदाच्या निवडणुकीत कोणाचा वरचष्मा राहणार, हे स्पष्ट झाले आहे. गेली कित्येक वर्षे विद्यापीठात बस्तान बसविण्यासाठी खटाटोप करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने यंदा आपला खुट्टा मजबूत केला आहे. राज्यातील भाजपच्या सत्तेचा सारीपाट पाहता विद्यापीठ वर्तुळातील संघटनांनी या सारीपाटावरच आपला डाव मांडला आहे.  

शिवाजी विद्यापीठ पी. जी. टीचर्स असोसिएशन (सुप्टा), आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटना, शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, कास्ट्राईब, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनांचे पदाधिकारी याआधीच एकत्र आले होते. एकट्या-दुकट्या संघटनेचा प्रशासनाविरुद्ध कस लागणार नाही, हे त्यांच्या वेळीच लक्षात आले. प्रश्‍न एका कर्मचाऱ्याचा असो की संघटनेचा, तो एकाच झेंड्याखाली सर्व संघटना आल्याने सुटणार, या द्रष्ट्या विचाराने संघटनांनी विद्यापीठ प्रशासनावर दबाव ठेवण्यास सुरुवात केली. प्रशासनात मुरलेल्या अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रश्‍नांना बगल देण्याची हातोटी प्राप्त झाल्याने, त्यांच्याविरुद्ध गेल्या दोन-अडीच वर्षांत संघटनांनी आक्रमक रूपही धारण केले. २०१० ते २०१५ मधील नोकरभरती प्रकरण असो की प्रभारी कुलसचिव म्हणून काम पाहिलेले डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या विरोधात थेट उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना तक्रारीचे पत्र पाठविण्याचा मामला असो, या संघटना त्यात आघाडीवर राहिल्या. भविष्यात हा एकोपा राहिल्यास आवश्‍यक मागण्या पदरात पाडून घेण्याची संधी आहे, असा विचार करून या संघटना विद्यापीठ विकास मंचच्या झेंड्याखाली एकत्र आल्या. 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला विद्यापीठ वर्तुळात यापूर्वी आपले हातपाय हलविता येत नव्हते. मोजक्‍या विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन त्यांची विद्यार्थ्यांच्या हिताची लढाई सुरू होती. संघटनेचा परीघ काही वाढत नव्हता. मात्र ही स्थिती आता राहिलेली नाही. पाच संघटनांत अभाविप ही पडद्यामागची सूत्रधार असल्याचे चित्र दिसते. विद्यापीठ अधिकार मंडळाच्या निवडणुकांच्या निमित्ताने अभाविपला अन्य संघटनांची जोड मिळाली आहे. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) ही एकटीच बाजूला पडली आहे. शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी, रयत शिक्षण संस्था व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थांशी विद्यापीठ विकास मंचाने हातमिळवणी केली आहे. 

गेल्या निवडणुकीत रयत, विवेकानंद व सुटा यांची गट्टी होती. यंदा सुटामध्येच शीतयुद्ध सुरू असल्याने संघटनेने कुणाबरोबर राहायचे, याचा निर्णय झालेला दिसत नाही. सदस्यांना कुणाबरोबर लढायचे आहे, जणू याचा विसर पडल्याचे चित्र आहे. संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक यांच्या त्या त्या गटांत निवडणुका होणार असल्या तरी सिनेटमध्ये ‘सुटा’व्यतिरिक्त अन्य संघटनांच्या आघाड्या होणार, हे स्पष्ट आहे. त्यात ‘सुटा’चा आवाज किती मोठा होणार, हे पाहावे लागणार आहे. 

अभाविपला लाभ शक्‍य
महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्‍टप्रमाणे यंदा अधिकार मंडळांच्या निवडणुका होतील. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाच संघटनांसमवेत रयत, विवेकानंदने केलेला घरोबा विचार करायला लावणारा आहे. श्री. पाटील यांनी या निवडणुकांत घातलेले लक्ष महत्त्वपूर्ण असून त्यातून विद्यापीठात अभाविपची पाळेमुळे किती घट्ट होणार, हेही भविष्यात पाहायला मिळेल.