नोकरी बावीस वर्षांची : रजा केवळ पंचवीस 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

कोल्हापूर -  अधिकाऱ्याने रजा दिली नाही, की एखाद्या कर्मचाऱ्याचा चेहरा पडलेला. त्यात जर अधिकाऱ्यामागे "लुडबूड' करणाऱ्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला रजा मिळाली, की रजा न मिळालेल्या कर्मचाऱ्याचा नुसताच पारा चढलेला. कधीकधी एकाच दिवशी कर्मचाऱ्यांचे रजेचे अर्जच इतके, की रजा द्यायची कुणाला, या प्रश्‍नाने अधिकाऱ्याच्या कपाळावर आठ्या. असे सर्वसाधारण चित्र शासकीय अथवा खासगी कार्यालयात पहायला मिळत असले, तरी रजा कमीत कमी घेणारा एखादा कमर्चारी आढळला, तर भुवया उंचावल्याखेरीज राहणार नाहीत.

कोल्हापूर -  अधिकाऱ्याने रजा दिली नाही, की एखाद्या कर्मचाऱ्याचा चेहरा पडलेला. त्यात जर अधिकाऱ्यामागे "लुडबूड' करणाऱ्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला रजा मिळाली, की रजा न मिळालेल्या कर्मचाऱ्याचा नुसताच पारा चढलेला. कधीकधी एकाच दिवशी कर्मचाऱ्यांचे रजेचे अर्जच इतके, की रजा द्यायची कुणाला, या प्रश्‍नाने अधिकाऱ्याच्या कपाळावर आठ्या. असे सर्वसाधारण चित्र शासकीय अथवा खासगी कार्यालयात पहायला मिळत असले, तरी रजा कमीत कमी घेणारा एखादा कमर्चारी आढळला, तर भुवया उंचावल्याखेरीज राहणार नाहीत. बावीस वर्षांच्या कारकिर्दीत पंचवीस दिवसांहून कमी रजा घेणारे शिवाजी विद्यापीठातील कर्मचारी जनार्दन दत्तू गवळी चर्चेचा विषय ठरले आहेत. 

श्री. गवळी हे सुभाषनगरात राहतात. विद्यापीठात ते 1987 मध्ये पदार्थविज्ञान विभागात रोजंदारीवर रुजू झाले. चार वर्षांनंतर त्यांच्यावर पाणक्‍याची जबाबदारी सोपवण्यात आली. ते 1997 ला सेवेत कायम झाले. तशी त्यांची कारकिर्द तीस वर्षांची झाली असली, तरी सेवेत कायम होऊन बावीस वर्षे झाली आहेत. विद्यापीठातील प्रत्येक अधिविभागात पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने त्यांच्या ड्युटीची वेळ पहाटे चार ते दुपारी बारा अशी आहे, मात्र, ड्युटीची वेळ संपल्यानंतरही पाण्याच्या कमतरतेमुळे विद्यापीठाकडे कोणी बोट दाखवू नये, या उद्देशाने ते विद्यापीठातच थांबत राहिले. 

प्रयोगशाळेत मुबलक पाणी उपलब्ध झाले तरच विद्यार्थी "प्रॅक्‍टिकल' पूर्ण करणार, याची जाणीव त्यांना होती. दीक्षांत सोहळा, सांस्कृतिक महोत्सव, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय परिषद असो, पाणीपुरवठ्यात कमतरता पडणार नाही, याची ते दक्षता घेत राहिले. श्री. गवळी यांनी त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी घेतलेल्या कमी रजा कौतुकाचा विषय ठरला आहे. कामावर निष्ठा कशी असावी, याचा आदर्शच त्यांनी घालून दिला आहे. आज (ता. 30) ते सेवानिवृत्त झाले आहेत. ते म्हणाले, ""पाण्याची कमतरता विद्यापीठाला भासू नये, यासाठीच मी रजा घेण्याचे टाळले. पैशापेक्षा विद्यापीठाची सेवा मला महत्त्वाची वाटत राहिली.'' 

मुलाचा अपघाती मृत्यू 
श्री. गवळी यांच्या मुलाचा 2012 ला अपघाती मृत्यू झाला, मात्र त्याचे दु:ख पचवत ते नातू महेंक व नात मुरमई यांचा सांभाळ करत आहेत. महेंक चौथीला, तर मुरमई पहिलीला आहे. श्री. गवळी यांच्या पत्नी गायत्री गवळी या विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. 

टॅग्स