रंकाळा संवर्धनासाठी शिवाजी विद्यापीठ घेणार पुढाकार 

संभाजी गंडमाळे
मंगळवार, 12 जून 2018

कोल्हापूर - रंकाळा तलाव हा तमाम कोल्हापूरकरांचा श्‍वास आहे. शिवाजी विद्यापीठही आता या परिसराचा सर्वांगीण अभ्यास करून श्‍वेतपत्रिका काढणार आहे. त्यानंतर शास्त्रीय पध्दतीने रंकाळा संवर्धनासाठी प्रयत्न होणार आहेत. रंकाळा ग्रुप व "सकाळ'च्या पुढाकाराने आज उत्स्फूर्त गर्दीच्या साक्षीने रंकाळ्यावर वृक्षारोपण व झाडांचे वाढदिवस झाले. यावेळी सर्वानुमते हा निर्णय झाला.

कोल्हापूर - रंकाळा तलाव हा तमाम कोल्हापूरकरांचा श्‍वास आहे. शिवाजी विद्यापीठही आता या परिसराचा सर्वांगीण अभ्यास करून श्‍वेतपत्रिका काढणार आहे. त्यानंतर शास्त्रीय पध्दतीने रंकाळा संवर्धनासाठी प्रयत्न होणार आहेत. रंकाळा ग्रुप व "सकाळ'च्या पुढाकाराने आज उत्स्फूर्त गर्दीच्या साक्षीने रंकाळ्यावर वृक्षारोपण व झाडांचे वाढदिवस झाले. यावेळी सर्वानुमते हा निर्णय झाला.

"सकाळ'च्या "चला, झाडे लावू या' उपक्रमातून सात वर्षापूर्वी रंकाळ्यावर लोकचळवळ उभी राहिली. त्यातूनच रंकाळा तलाव आणि परिसराच्या संवर्धनासाठी यापूर्वी चाळीस पानांचा तज्ञांचा अहवाल तयार झाला आहे. मात्र, तांत्रिक बाबींसाठी शिवाजी विद्यापीठाचा सक्रीय सहभाग आवश्‍यक असून तमाम रंकाळाप्रेमींच्या वतीने डॉ.अमर अडके यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी तत्काळ हा प्रस्ताव मान्य केला. लवकरच बैठक घेवून पुढील कार्यवाहीची ग्वाहीही त्यांनी दिली. 

"सकाळ'चे निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड म्हणाले, ""आपल्या संत परंपरेनेच वृक्षाची महती सांगितली आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुध्दा वृक्षसंपदेबाबतची आज्ञापत्रे काढली. रंकाळा ग्रुपची ही चळवळ प्रेरणादायी असून ती भविष्यात अधिक व्यापक करण्यासाठी "सकाळ' नक्कीच पाठबळ देईल.''

कुंभी-कासारी साखर कारखान्यातर्फे रंकाळा चळवळीसाठी आवश्‍यक सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली. 

"सकाळ'चे उपसरव्यवस्थापक रविंद्र रायकर, नगरसेवक राहूल माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, पंडितराव बोंद्रे, रवी चौगुले, माजी उपमहापौर विक्रम जरग, सुहास साळोखे, अभय देशपांडे, राजशेखर तंबाखे, बी. एम. चौगले, विजय औंधकर, अमर सरनाईक, राजेश कोगनूळकर आदी यावेळी प्रमुख उपस्थित होते. 

अशोक देसाई, राजेंद्र पाटील यांनी स्वागत केले. विजयराव सावंत, अभिजीत चौगले, संजय मांगलेकर, प्रा. एस. पी. चौगले, सुधीर राऊत, यशवंत पाटील, किरण पडवळ, जितेंद्र लोहार, प्रवीण वायचळ, नीता साळोखे, मीनल भालेकर, विक्रम कुलकर्णी आदींनी संयोजन केले. विकास जाधव यांनी आभार मानले. 

  • श्रीकांत कदम (भैय्या), शिवशाहिर राजू राऊत, अजित मोरे-मेस्त्री, सुधीर गांधी, सुनील राऊत या रंकाळाप्रेमींचा रंकाळा चळवळीतर्फे सन्मानचिन्ह देवून झाला गौरव. 
  • माधुरी बेकरीचे चंद्रकांत वडगावकर व परिवारातर्फे रंकाळ्याच्या छायाचित्रासह वाढदिवसासाठी आकर्षक केक. 
  • बोधीवृक्ष परिसरात बैठकीसाठी बेंच बसवण्यात आले आहेत. या झाडाखाली अधिक ऑक्‍सिजन मिळतो. 

रंकाळा संवर्धनाची चळवळ आदर्शवत आहे. ती अधिक नेटाने पुढे नेण्यासाठी शिवाजी विद्यापीठ आवश्‍यक ती सर्व मदत देईल. 
- डॉ. देवानंद शिंदे,
कुलगुरू 

रंकाळा संवर्धनासाठी महापालिका पातळीवर वेळोवेळी प्रयत्न सुरू आहेतच. येत्या काळातही सर्वतोपरी सहकार्य महापालिका देईल. 
- शोभा बोंद्रे,
महापौर 

Web Title: Kolhapur News Shivaji University Rankala conservation