शिवाजी विद्यापीठात ‘अभाविप’च्या फॉर्म्युल्याकडे लक्ष

शिवाजी विद्यापीठात ‘अभाविप’च्या फॉर्म्युल्याकडे लक्ष

कोल्हापूर- शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर दोन सदस्यांची नियुक्ती झाल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे (अभाविप) विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. सिनेटवर राज्यपाल नामनिर्देशित दहा सदस्यांत अभाविप बाजी मारणार का, याची उत्सुकता आहे. अधिसभा गाजवू पाहणाऱ्या कोणत्या मोहऱ्यांची नावे ‘अभाविप’च्या यादीत आहेत, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होतील आणि ‘अभाविप’च्या गोटात प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी कोणते डावपेच आखले जात आहेत, हेही कळून येईल. 

व्यवस्थापन परिषदेवर अमित कुलकर्णी व प्रा. विवेक खांजोडे या दोन अभ्यासू सदस्यांची वर्णी लागल्यानंतर अभाविप आता कोणती शस्त्रे बाहेर काढणार, हा कुतूहलाचा विषय बनला आहे. विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकीत सावधपणे चाली रचत ‘अभाविप’ने बाजी मारली आहे. चार संघटनांशी हातमिळवणी करत आपला पाया भक्कम केला आहे. शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने ठरविल्यानुसार पावले टाकली आहेत. एक पाय मागे घेत आवश्‍यक तेथे आपले सदस्य आणण्यावर लक्ष ठेवले आहे. सातारचे नगरसेवक राहिलेले श्री. कुलकर्णी हे पूर्वी अधिसभा सदस्य होते. त्यांना अधिसभेतील कामकाजाचा अनुभव आहे. प्रश्‍नांची मांडणी करण्यात त्यांची हातोटी आहे. त्यांच्या जोडीला खांजोडे हे आयटी तज्ज्ञ आहेत. अधिसभेतील त्यांची वर्णी म्हणजे ‘अभाविप’ला प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी मिळालेली संधी आहे. 

प्रा. शंकरराव कुलकर्णी हे ‘अभाविप’चे संघटन करण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्नशील आहेत. यंदाच्या निवडणुकीतून त्यांना ‘अभाविप’ची बांधणी करण्यासाठी चांगले पाठबळ मिळाले आहे. प्रा. अमित वैद्य हे पडद्यामागून सूत्रे हलविण्यात कमी पडत नाहीत. विशेषत: विद्यार्थी वर्गातील सदस्यांची संख्या वाढविण्यावर त्यांचा भर दिसतो आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या ‘अभाविप’ला भविष्यातील दिवस कसे असतील, याचा अंदाज आता बांधला जात आहे. त्याचबरोबर ‘अभाविप’चे सिनेटवर राज्यपाल नामनिर्देशित सदस्य कोण, यावरही चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. 

राज्यपाल नामनिर्देशित दहा सदस्य
राज्यपाल नामनिर्देशित दहा सदस्य विविध क्षेत्रांतून सिनेटवर येणार आहेत  कृषी, समाजकार्य, सहकार, कायदा, फायनान्स, बॅंकिंग, सांस्कृतिक क्षेत्रातून चार, उद्योग, शिक्षण, विज्ञान, फाईन आर्टस्‌, पर्यावरण क्षेत्रातील प्रत्येकी एक, तर महिला विकास, ज्येष्ठ नागरिक, कल्याण दळणवळण संपर्क माध्यम क्षेत्रातून एक सदस्याचा त्यात समावेश आहे. नामनिर्देशित सदस्यांत विद्यापीठ वर्तुळातील संघटनांकडून आपापल्या गोटातील सदस्य यावेत, अशी अपेक्षा आहे. मात्र खरे लक्ष आहे ते अभाविपकडे. त्यांनी नामनिर्देशनासाठी कोणाची नावे पाठवली, ते कोणत्या जिल्ह्यातील आहेत, याची माहिती घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे.

 अभाविपचे संघटन बळकट करणे, हेच आमचे ध्येय आहे. एक काळ असा होता, की आम्हाला विद्यापीठात प्रवेश दिला जात नव्हता. मात्र, ही स्थिती बदलली आहे. चार महिन्यांपूर्वीच आम्ही सिनेटसाठी नावे दिली आहेत. आमच्या नावाचा विचार केला तर योग्य होईल. पण, तो निर्णय राज्यपालांचा आहे. सिनेटवर आमची नावे येतील, अशी आम्हाला आशा आहे.
प्रा. शंकरराव कुलकर्णी
 , अभाविप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com