विद्यार्थ्यांसाठी भरीव निधी देण्याची शिवाजी विद्यापीठ अधिसभेत सुचना

विद्यार्थ्यांसाठी भरीव निधी देण्याची शिवाजी विद्यापीठ अधिसभेत सुचना

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या २०१८-१९ आर्थिक वर्षाच्या २ कोटी ६५ लाख १३ हजाराच्या तुटीच्या अंदाजपत्रकास अधिसभा सदस्यांनी मान्यता देत, अपेक्षित जमा होणाऱ्या ३६१ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात सदस्यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून निधीच्या तरतुदीला मंजुरी दिली. संशोधन, क्रीडा, प्रशिक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. या सूचनांचा विचार प्रस्तावित सुधारित अंदाजपत्रकात केला जाईल, असे सभा अध्यक्ष कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आश्‍वासन दिले. 

विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आज झालेल्या अधिसभेत अंदाजपत्रक सादर केले. अधिसभेत विषय क्रमांक चारनुसार २०१७-१८ चे सुधारित अंदाजपत्रक व २०१८-१९ चे वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ मधील तरतुदीनुसार अधिसभेत मान्यतेसाठी ठेवले. प्राचार्य डॉ. सी. टी. कारंडे यांनी अंदाजपत्रकातील तरतुदी विशद केल्या. प्रथमच हे अंदाजपत्रक संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन सादर केले. सदस्यांनीही लॅपटॉपवर सभेचे पेपरलेस कामकाज झाले. उपस्थित झालेल्या प्रश्‍नास प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले व डॉ. कारंडे यांनी उत्तरे दिली. 

अंदाजपत्रकात विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा, संशोधक विद्यार्थ्यांना सुविधा, शिष्यवृत्ती, खेळाडू, विद्यार्थी कलाकारांना तरतूद वाढवावी. खेळाडूंना दिले जाणारे भत्ते, प्रशिक्षणासाठी भरीव तरतूद करावी असा सदस्यांनी आग्रह धरला. कुलगुरूंसह पदाधिकाऱ्यांच्या संगणक, आधुनिकीकरणासाठी केलेल्या खर्चावर अनेकांनी आक्षेप घेतला. विद्यापीठात १२० सुरक्षा रक्षक आहेत. त्यातील फक्त १७ कर्मचारी कायम असून इतर कर्मचारी हे कंत्राटी आहेत. त्यांच्या वेतनासाठी तब्बल ३ कोटीहून अधिक रकमेची तरतुदीबाबत प्रश्‍न उपस्थित केले. त्या तरतुदीतील एक कोटीची रक्कम कपात करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अपेक्षित तरतूद करून त्यांना तशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी केली.

खेळाडूंसाठी विम्यासह अन्य सुविधा 
अध्यक्ष कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विद्यापीठाचे जे खेळाडू बाहेर खेळण्यासाठी जातात, अशा खेळाडूंना विम्याचे संरक्षण दिले जाईल. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणाऱ्या खेळाडूंसाठी दोन लाख रुपये दिले जातील. एनसीसी, एनएसएस आदी विद्यार्थ्यांसाठी भवित तरतूद करू, असे सांगितले. सूचनांचा सप्टेंबरमधील सुधारित अंदाजपत्रकात विचार करू, असे आश्‍वासन सचिव व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिले. चर्चेत भैय्या माने, नंदकुमार दिवटे, नसिमा हुरजूक, मधुकर पाटील, सागर डेळेकर, अनिल चौगुले आदींनी सहभाग घेतला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आदी उपस्थित होते. 

अंदाजपत्रकातील तरतुदी 

  •  संशोधनासाठी पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ः १० लाख
  •     (प्रति विद्यार्थ्यासाठी ३० हजारांचा प्रस्ताव)
  •  चर्चासत्र, सेमिनार, संशोधन कोर्ससाठी ः १० लाख
  •  ॲकॅडमी फॉर ॲकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेशन ः १० लाख 
  •  संशोधन गुणवत्ता वाढीसाठी ः १५ लाख 
  •  जनरल बुक्‍स्‌साठी ः १ कोटी ३० लाख 
  •  अधिविभाग आधुनिकीकरण, प्रयोगशाळा ः ४२ कोटी ३८ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com