‘शिवपुत्र छत्रपती राजाराम’ ग्रंथाचे बुधवारी प्रकाशन - डॉ. जयसिंगराव पवार

‘शिवपुत्र छत्रपती राजाराम’ ग्रंथाचे बुधवारी प्रकाशन -  डॉ. जयसिंगराव पवार

कोल्हापूर - ‘शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांची दिल्ली जिंकण्याची इच्छा होती. तसा उल्लेख त्यांनी लिहिलेल्या पत्रात आहे; मात्र त्यांचे नेतृत्व आजपर्यंत उपेक्षित राहिले. पंधरा वर्षांच्या अथक संशोधनानंतर ‘शिवपुत्र छत्रपती राजाराम’ हा साडेपाचशे पानांचा ग्रंथ आकाराला आला आहे. या ग्रंथाचे महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीतर्फे येत्या बुधवारी (ता. ३०) सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे,’ अशी माहिती ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमास सुरवात होणार आहे. 

डॉ. पवार म्हणाले, ‘‘छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाविरुद्ध सत्तावीस वर्षे लढा दिला. औरंगजेबाचे हे संकट साधे नव्हते. त्याच्याविरुद्ध संघर्ष केल्यानंतरसुद्धा मराठ्यांच्या इतिहासाचे संरक्षण करणाऱ्या संभाजी महाराज, राजाराम महाराज व ताराबाई यांचे नेतृत्व उपेक्षित राहिले. त्यामुळे छत्रपती शिवरायांनंतर थेट बाळाजी विश्‍वनाथांचा इतिहास सांगितला गेला. मधल्या काळातील नेतृत्वाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. या नेतृत्वकर्त्यांचा इतिहास समाजासमोर आणला पाहिजे, या उद्देशाने राजाराम महाराजांविषयी पंधरा वर्षे संशोधन केले. त्यातून त्यांना निष्क्रिय म्हणून संबोधणाऱ्यांना सडेतोड प्रत्त्युत्तर देता आले आहे. राजाराम महाराज हे मुत्सद्दी होते.’’ 

ते म्हणाले, ‘‘संभाजी महाराजांच्या हत्येनंतर राजाराम महाराजांनी तमिळनाडूतील जिंजी किल्ल्यावर मराठ्यांची राजधानी स्थापन केली. मुघल-मराठा संघर्षाचे क्षेत्र अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरावरील मद्रास किनारपट्टीपर्यंत विस्तारले. त्यामुळे औरंगजेबाला शह दिला गेला. त्याच्या जुल्फीकारखान सेनापतीने वेढा दिलेला जिंजीचा किल्ला त्यांनी आठ वर्षे लढविला. भारताच्या इतिहासातील प्रदीर्घ काळ चाललेला हा एकमेव वेढा आहे. त्यांच्यावर आधारित या चरित्रग्रंथाच्या लेखनासाठी फारसी, इंग्रजी, फ्रेंच व पोर्तुगीज कागदपत्रे, तसेच ग्रंथ महत्त्वपूर्ण ठरले आहेत. संशोधनात्मक व चिकित्सक पद्धतीने राजाराम महाराजांवर लिहिलेला हा पहिलाच चरित्रग्रंथ आहे. त्यात शंभरहून अधिक चित्रे, छायाचित्रे, नकाशे असून, तो डेमी क्राऊन साइजमध्ये आहे.’’ 

ग्रंथप्रकाशन प्रसंगी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस डॉ. मंजुश्री पवार, सुरेश शिपूरकर, डॉ. प्रकाश शिंदे, विजयराव शिंदे उपस्थित होते. 

‘तारीखे-ए-मोहंमदी’ ग्रंथात नोंद
औरंगजेबाच्या दरबारात मिर्झा मोहंमद होता. त्याच्या ‘तारीखे-ए-मोहंमदी’ ग्रंथात राजाराम महाराजांच्या मृत्यूची नोंद आहे. ‘तेज व धाडस असलेले राजाराम महाराज,’ असा उल्लेखही या ग्रंथात आहे. त्याचबरोबर ग्रंथात ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन करताना ‘ताराबाईने धामधूम उडवली’ असाही उल्लेख असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com