कर्जमाफीविरोधात सेनेचे अनोखे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

कर्जमाफी जाहीर झाल्यापासून आजपर्यंत जिल्ह्यातील केवळ २२ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्याचे सांगितल्यानंतर शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला.

कोल्हापूर -  वेळ- दुपारची... स्थळ- सहकार उपनिबंधक कार्यालयासमोरील रस्ता... कार्यकर्ते भरउन्हात मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा करीत रस्त्याच्या दुतर्फा उभे होते... एकच्या सुमारास मुख्यमंत्री गाडीतून खाली उतरले... घोषणाबाजी सुरू झाली... त्यांच्या अंगावर फुलांचा वर्षाव होऊ लागला... महिलांनी औक्षण केले... त्यानंतर त्यांच्या हस्ते कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना प्रतीकात्मक प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली... आणि त्यानंतर सायरन वाजणाऱ्या गाडीतून ते निघून गेले. हे वर्णन शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या कार्यक्रमाचे नसून, शासनाच्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात शिवसेनेने केलेल्या अनोख्या आंदोलनाचे आहे.

कर्जमाफी जाहीर झाल्यापासून आजपर्यंत जिल्ह्यातील केवळ २२ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्याचे सांगितल्यानंतर शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला. शासनाची कर्जमाफी कागदावरच आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप गावोगावी झाले, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच नाही. याच्या निषेधार्थ शिवसेनेने अनोखे आंदोलन सहकार उपनिबंधक कार्यालयासमोर केले. दुपारी बाराच्या सुमारास सर्व कार्यकर्ते कार्यालयासमोर जमले.

कार्यालयाशेजारी असलेल्या पेट्रोलपंपाजवळ मुख्यमंत्र्यांच्या वेशात आलेले मनोज साळोखे व पदाधिकारी गाडीतून उतरले. तेथून घोषणा देत सहकार उपनिबंधक कार्यालयासमोर आले. श्री. साळोखे यांच्या गळ्यात ‘शेतकरी कर्जमुक्‍त बोगस प्रमाणपत्र, कोल्हापूर जिल्हा’ असा फलक अडकविला होता. सहायक निबंधक अमित गोराडे आंदोलकांसमोर आले. 

या वेळी त्यांनी आतापर्यंत किती जणांची कर्जमाफी झाली, याची माहिती द्यावी, अशी मागणी केली. यावर श्री. गोराडे यांनी जिल्ह्यातील २२ शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. उर्वरित काम सुरू असल्याचे सांगितले. कर्जमाफी दिल्याचा आकडा ऐकताच कार्यकर्ते संतप्त झाले. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत कर्जमाफीच्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, संग्रामसिंह कुपेकर, सुजित चव्हाण, रवी चौगुले, राजेंद्र पाटील, शिवाजी पाटील, सुनील शिंगे, प्रभाकर खांडेकर, नामदेव गिरी, सात्ताप्पा भवान, महादैव गौड, मधुकर पाटील, मधुकर पाटील, बाजीराव पाटील, दत्ता पोवार, भिकाजी हाळदकर, उत्तम पाटील, सयाजी चव्हाण, शुभांगी पोवार, संज्योती माळवी, शांता जाधव, मेघना पेडणेकर, दीपाली शिंदे, सुजाता सोहनी, रंजिता आयरेकर आदी सहभागी झाले.

निवेदनातून विविध मागण्या
जिल्ह्यातील अर्ज केलेल्या दोन लाख ७० हजार शेतकऱ्यांपैकी दोन लाख ५३ हजार शेतकऱ्यांकडून आधारकार्ड प्राप्त झाले. १२ हजार शेतकऱ्यांकडे आधारकार्ड नाहीत. त्यावर काही निर्णय झाला नाही. सहकार आयुक्‍तांच्या खात्यावर चार हजार कोटी रुपये जमा केल्याचे शासन सांगत आहे. कर्जमाफीच्या प्रमाणपत्र वितरणाचा समारंभ झाला. त्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले नाहीत. ते त्वरित जमा करावेत. ऑनलाईन अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांना मुदत वाढवून मिळावी, आधारकार्ड नसणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ द्यावा, कर्जमाफीचे निकष बदलावेत, कर्जमुक्‍ती प्रक्रियेची माहिती त्वरित मिळावी, अशा मागण्या निवेदनात आहेत.