प्रदूषण मंडळाचे अधिकारी पाकिटे घेत असल्याचा शिवसेनेचा आरोप

प्रदूषण मंडळाचे अधिकारी पाकिटे घेत असल्याचा शिवसेनेचा आरोप

 कोल्हापूर - पंचगंगा नदी प्रदूषणामुळे माणसं मेल्यावरच कारवाई करणार का, असा सवाल आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. अधिकारी पाकीट घेतात आणि माघारी फिरतात, त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या घटकांवर जुजबी कारवाई होत असल्याचा आरोप त्यांनी केली.

दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक देत शिवसैनिकांनी उपप्रादेशिक अधिकारी जय कामत यांना धारेवर धरले. शिरोलीपासून शिरोळपर्यंत पंचगंगा गटारगंगा झाली आहे. महामार्गाच्या पलीकडे माणसं राहतात, जनावरे नाही. आणखी किती दिवस प्रदूषित पाणी प्यायचे? २०११ मध्ये इचलकरंजी परिसरात काविळीच्या साथीने ३८ जणांचा बळी घेतला. नदीकाठच्या गावांतील शेकडो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जलचर प्राणी, मासे मृत झाले आहेत. त्यामुळे शिरोली ते शिरोळपर्यंत पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. आणखी किती बळी जावेत असे आपणास वाटते? असा सवाल जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव, अण्णासाहेब बिलुरे यांनी केला. कोल्हापूर महापालिका, राजाराम सहकारी साखर कारखाना, हुपरी पंचतारांकित वसाहत, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, इचलकरंजी नगरपालिका, प्रोसेसिंग युनिट, साखर कारखान्याची मळी, औद्योगिक घटकातून येणारे सांडपाणी यामुळे पंचगंगा नदी विषवाहिनी बनली आहे.

या घटकांवर कारवाई करण्याऐवजी नुसत्या नोटिसा देऊन मोकळे का होता? अधिकारी प्रोसेसिंग युनिटकडून पाकीट घेतात आणि माघारी परततात, त्यामुळे कारवाई कोण करणार? काळा ओढा थेट नदीत मिसळत आहे. बंधाऱ्याच्या फळ्या काढल्या की प्रदूषणात भर पडत आहे. इचलकरंजीत नेमके रात्रीच छापे का टाकता? यामागे काय गौडबंगाल आहे, असा आरोप बिलुरे यांनी केला. अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा लोकांच्या जीवावर बेतत असून चूक कोणाची आणि शिक्षा कोण भोगतोय, याकडेही लक्ष वेधण्यात आले. १ फेब्रुवारीपर्यंत महापालिकेसह प्रदूषित घटकांवर कारवाई न झाल्यास कार्यालयास बेमुदत टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला. उपप्रादेशिक अधिकारी सामंत यांनी संबंधितांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, तातडीने कारवाईचे आश्‍वासन दिले.

या वेळी प्रदूषण मंडळाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस तैनात होते. महादेव गौड, मधुकर पाटील, साताप्पा भवान, आनंद शेट्टी, बाजीराव पाटील, सयाजी चव्हाण, शिवाजीराव पाटील, दिनकर आणुसे, विजय जोशी, प्रकाश देसाई, सुनील सांगवडेकर आदी उपस्थित होते.

डोंगराएवढे काम आणि अधिकारी दोन
जिल्ह्यात ११ हजार ५०० औद्योगिक कारखाने, दहा नगरपालिका, चार हजार रुग्णालये, पाणी प्रदूषण इतका व्याप प्रदूषण मंडळावर आहे. यासाठी केवळ दोनच फिल्ड ऑफिसर आहेत. प्रदूषणप्रश्‍नी वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईची शिफारस करण्याशिवाय मंडळाकडे अधिकार नाहीत. प्रदूषणप्रश्‍नी साखर कारखान्यांची बॅंक गॅरंटी जप्त करण्यापलीकडे कारवाई होत नाही. अधिकारी पाकिटे घेतात, या शिवसेनेच्या आरोपावर उपप्रादेशिक अधिकारी जय सामंत यांनी आरोपात तथ्य नसल्याचे नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com