शिवसेना, स्वाभिमानीचा बंदला पाठिंबा 

शिवसेना, स्वाभिमानीचा बंदला पाठिंबा 

कोल्हापूर - ""शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी उद्या (ता. 5) राज्यभरातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला आज शिवसेनेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही पाठिंबा दिला असून जिल्ह्यातही उद्याचा बंद कडकडीतच पाळला जावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे "स्वाभिमानी'चे खासदार राजू शेट्टी व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज जाहीर केले. 

शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकरी 1 जूनपासून संपावर आहेत. राज्यातील सर्वच जिल्ह्यांतून या संपाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठवाडा, विदर्भात या संपाच्या पार्श्‍वभूमीवर तीव्र पडसाद उमटत आहेत. गेले चार दिवस संप सुरू असूनही सरकार याची दखल घेत नाही, त्यामुळे उद्या सर्वच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी "महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. 

या बंदला आज शिवसेनेसह स्वाभिमानी शेतकरी संघटना, सर्वपक्षीय कृती समिती, शेतकरी कामगार पक्ष व किसान सभेनेही पाठिंबा दिला आहे. बंद शांततेत करा, शेतमालाची नासाडी करू नका, नासाडी करण्यापेक्षा शेतमाल गोरगरिबांना वाटप करा, असे आवाहन करत खासदार राजू शेट्टी यांनी उद्याचा बंद कडकडीतच असेल यासाठी संघटना प्रयत्नशील आहे, असे सांगितले. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनीही या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व व्यवहार बंद ठेवावेत अन्यथा शिवसैनिक हे व्यवहार बंद करतील, असा इशारा पवार यांच्यासह विजय देवणे यांनी दिला आहे. या बंदला कॉंग्रेसचाही पाठिंबा असेल, असे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी रात्री जाहीर केले. 

उद्याच्या बंददरम्यान शेतकरी कामगार पक्षातर्फे करवीर तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. किसान सभेच्यावतीने आंदोलन परस्पर मागे घेतलेल्यांच्या निषेधासाठी व शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यायलयावर दसरा चौकातून मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. उदय नारकर, प्रा. सुभाष जाधव यांनी केले आहे. सर्वपक्षीय कृती समितीनेही उद्याच्या बंदमध्ये सर्व व्यवहार बंद ठेवून शेतकऱ्यांच्या मागे ताकद उभी करावी, असे आवाहन निवेदनाद्वारे केले आहे. जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता सुरू असलेल्या या आंदोलनाला पाठिंब्याची गरज असून लोकांनीही उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन या निवेदनात केले आहे. माजी महापौर आर. के. पोवार, नामदेव गावडे, किशोर घाटगे, बाबा पार्टे, शिवाजीराव परुळेकर, बाबूराव कदम, चंद्रकांत यादव, अतुल दिघे आदींची नावे निवेदनात आहेत. 

शिवसेना महामार्ग रोखणार 
शिवसेनेतर्फे शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्या (ता. 5) सकाळी दहा वाजता शिये फाट्यावर महामार्ग रोखण्यात येणार आहे. हॉटेल दुर्गामाता धाब्यासमोर सकाळी शिवसैनिकांना बोलावण्यात आले असून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल, असे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले. 

बंदसाठी असा आहे पोलिस बंदोबस्त 
उद्याच्या (ता. 5) बंदसाठी पोलिस अधीक्षकांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. गस्त वाढवा, पोलिस बंदोबस्त ठेवा अशा सूचनाही केल्या आहेत. शहरातील पोलिस बंदोबस्ताची सर्व जबाबदारी त्यांनी शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यावर सोपवली आहे. त्यानुसार त्यांनी सर्व पोलिस ठाण्यांतील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, शहर वाहतूक पोलिस, विशेष पोलिस पथक, जलद कृती दल, 15 बीट मार्शलसह राखीव दलाची तुकडी असा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. याचे नेतृत्व ते स्वतः करणार असल्याची माहिती गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com