एकाकी लढत; कोल्हापूरात शिवसेनेसमोर आव्हानच

एकाकी लढत; कोल्हापूरात शिवसेनेसमोर आव्हानच

कोल्हापूर - आगामी विधानसभा व लोकसभा स्वबळावर लढण्याच्या शिवसेनेच्या निर्णयाला कोल्हापुरात मोठे आव्हान असेल. या दोन्ही निवडणुकीत दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यास भारतीय जनता पक्ष नव्हे तर ही आघाडीच शिवसेनेसाठी प्रमुख विरोधक असतील. गेल्या चार वर्षांपासून सेनेचा केंद्र व राज्य सरकारच्या सत्तेतील सहभाग, त्याच वेळी सरकारच्या कारभारावर टीका आणि दुसरीकडे राज्य व केंद्र सरकारवर असलेली नाराजी अशा परिस्थितीत स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाता जिल्ह्यात प्रचंड तयारी करावी लागेल. 

२०१४ ची लोकसभा सेना-भाजप युतीच्या माध्यमातून लढली. त्यातही हातकणंगले मतदारसंघात या दोन्ही पक्षांनी खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला. त्यातून त्यांचा मार्ग सुकर झाला. या वेळी याच मतदारसंघात पुन्हा सेनेला ताकदीच्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक हे सेनेचे उमेदवार होते. राज्य व केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारविरोधातील नाराजी आणि देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाट असतानाही खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला होता. 

जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी दोन ते अडीच लाख मतेच सेनेची आहेत. ही मते त्यांना विजयापर्यंत नेऊ शकत नाहीत. याचा विचार करता केवळ सेनेच्या उमेदवारीवर पुन्हा प्रा. मंडलिक सेनेकडून लोकसभा लढतील का? हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. त्यातही प्रा. मंडलिकांसाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी पायघड्या घातल्या आहेत. त्याच वेळी श्री. महाडिक यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. बदललेल्या परिस्थितीचा विचार केला तर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची पहिली पसंती ही श्री. महाडिक यांनाच असेल. सेनेकडे प्रा. मंडलिक सोडले तर लोकसभेसाठी जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्याशिवाय दुसरे नाव पुढे येत नाही. यापूर्वी रमेश देव, शिवाजीराव पाटील, कै. विक्रमसिंह घाटगे, श्री. देवणे यांचाच पर्याय सेनेला मिळाला त्यातही श्री. घाटगे वगळता इतर उमेदवार आव्हानही उभे करू शकले नाहीत. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सेना, भाजपसह दोन्ही काँग्रेसही स्वतंत्र लढले. काँग्रेस अंतर्गत नेत्यांतील मतभेद, पाडापाडीचे राजकारण यातून एका मतदारसंघात काँग्रेसला उमेदवार मिळाला नाही. उर्वरित मतदारसंघात एकालाही विजय मिळवता आला नाही. त्यातून शिवसेनेचे सहा आमदार विजयी झाले. बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. हीच परिस्थिती २०१९ ला राहील, अशी शक्‍यता नाही. कारण सेनेचे उमेदवार विजय झालेल्या सर्वच मतदारसंघांतील त्यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती. त्यातून इतर पक्षांतील उमेदवारांनी आयत्यावेळी सेनेचा ‘धनुष्यबाण’ खांद्यावर घेतला आणि ते विजयी झाले. 

मुळात जिल्ह्यातील सेनेच्या सहा आमदारांत आमदार राजेश क्षीरसागर व काही प्रमाणात सत्यजित पाटील-सरूडकर सोडले तर मूळचा शिवसैनिक कोणी नाहीच. शिरोळमध्ये उल्हास पाटील यांना ‘स्वाभिमानी’ने डावलल्यानंतर त्या मतदारसंघात जातीचे राजकारण उफाळून आले. त्यातून मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्र येऊन श्री. पाटील यांना ताकद दिली, त्याच वेळी इतर समाजातील दोन-तीन उमेदवार रिंगणात राहिले आणि श्री. पाटील यांचा विजय झाला. त्याची पुनरावृत्ती पुन्हा होईल, असे म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल. 

शहरातील श्री. क्षीरसागर व करवीरमधील चंद्रदीप नरके यांच्या दोन्हीही निवडणुकीतील विजयामागेही काँग्रेस अंतर्गत पाडापाडीचेच राजकारण आहे. राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे राजकारण काँग्रेसच्या मुशीतील. पण पर्याय नाही म्हणून त्यांनी सेनेची उमेदवारी स्वीकारली आणि या मतदारसंघातील काँग्रेसजनांच्या ताकदीने ते आमदार झाले. त्यात के. पी. पाटील यांच्याविषयीची नाराजी ही होतीच, त्यापेक्षा काँग्रेसची मदत त्यांच्या पथ्यावर पडली. कोल्हापूर दक्षिणमध्ये सरकारविरोधातील नाराजीचा परिणाम दिसला. पण या मतदारसंघातही आता भाजपसाठी फार अलबेल आहे असेही नाही. शिवसेनेला तर या मतदारसंघातही उमेदवार शोधावा लागेल. हातकणंगलेत जयवंतराव आवळे नको म्हणून काँग्रेसच्याच नेत्यांनी शिवसेनेच्या डॉ. सुजित मिणचेकर यांना बळ दिले, त्यातून दोन वेळा ते आमदार झाले. सलग दोन पराभवामुळे आवळे राजकारणात सक्रिय नसल्यासारखी स्थिती आणि माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांची नाराजी, यातून २०१९ तर डॉ. मिणचेकर यांच्या विरोधात कोण इथपासून भाजपसह दोन्ही काँग्रेसची स्थिती आहे. 

कागल व चंदगड हे राष्ट्रवादीचे किल्ले २०१४ ला अभेद्य राहिले. आता कागलमध्ये प्रा. मंडलिक हे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार ठरले तर संजयबाबा घाटगे यांच्याशिवाय सेनेला पर्याय नाही. पण मंडलिक गटाशिवाय श्री. घाटगे यांचा मार्ग खडतर आहे. चंदगडमध्ये काँग्रेसकडे नेते भरपूर; पण कार्यकर्त्यांची वानवा. एकाला उमेदवारी दिली तर दुसरा रिंगणात हेच चित्र असेल. पण दोन्ही काँग्रेस विधानसभेत एकत्र लढल्यास याही मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार कोण? हा प्रश्‍न आहेच. शाहूवाडी-पन्हाळ्यात राष्ट्रवादीला उमेदवार नाही, अशी स्थिती आहे. तिथे आमदार सत्यजित पाटील-सरूडकर व विनय कोरे अशीच लढत होईल. त्यात मुश्रीफ-कोरे यांची दोस्ती पाहता राष्ट्रवादी श्री. कोरे यांच्यासोबत राहीलच; पण भाजपचीही त्यांना ताकद असेल. त्या बदल्यात गडहिंग्लज, कोल्हापूर दक्षिण, शहरात श्री. कोरे यांची मदत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला घेतली जाईल. या सर्व सद्य राजकीय परिस्थितीचा विचार करता स्वबळावर सेनेचा मार्ग खडतर आहे. 

दोन्ही काँग्रेस एकत्र येणार
शिवसेनेने स्वबळावर लोकसभा व विधानसभा लढवण्याचा घेतलेला निर्णय व राज्यातील सद्य:स्थिती याचा विचार करता आगामी लोकसभा व विधानसभेतही दोन्ही काँग्रेस एकत्र लढण्याची शक्‍यता आहे. राज्याच्या पातळीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून त्याचे संकेत मिळत आहेत. सत्तेतून बाजूला गेल्यानंतर काय हाल होतात याचाही अनुभव दोन्ही काँग्रेसने घेतला आहे. अंतर्गत मतभेद व पाडापाडीच्या राजकारणामुळे पक्षाचे व स्वतःचेही किती नुकसान झाले याचीही जाणीव राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांना झाल्याचे यापूर्वीचे एकत्रित आंदोलन असेल किंवा राजकीय बेरीज यावरून दिसून आले आहे. त्यातूनच दोन्ही काँग्रेसची आघाडीच निवडणुकीत दिसेल. 

सेनेला गटबाजीने पोखरले
जिल्ह्यात शिवसेनेची स्थापना झाल्यापासून गटबाजी संपवण्यास आजपर्यंत पक्ष नेतृत्वाला यश आलेले नाही. सध्या शहरचे आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे सख्य जिल्ह्याला परिचित आहे; तर हातकणंगलेत आमदार सुजित मिणचेकर व जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्यात विस्तवही जात नाही, असे चित्र आहे. या स्थितीत स्वबळ आजमावण्याचा प्रयत्न सेनेसाठी धाडसाचा ठरू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com