एसटीचा प्रवास होणार आल्हादायक; दोन हजार शिवशाही गाड्या येणार ताप्यात

शिवाजी यादव
रविवार, 11 जून 2017

प्रवाशांना अधिक आरामदायी व सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी एसटी महामंडळ दोन हजार नव्या शिवशाही गाड्या घेणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून या गाड्या वातानुकूलीत; तसेच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यातून सर्वसामान्य वर्गातील प्रवाशांना दीर्घपल्ल्याचा वातानुकूलीत बसमधून नियमित प्रवास करता येणे शक्‍य होणार आहे. यामुळे एसटीचा प्रवास अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे.

कोल्हापूर - प्रवाशांना अधिक आरामदायी व सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी एसटी महामंडळ दोन हजार नव्या शिवशाही गाड्या घेणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून या गाड्या वातानुकूलीत; तसेच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यातून सर्वसामान्य वर्गातील प्रवाशांना दीर्घपल्ल्याचा वातानुकूलीत बसमधून नियमित प्रवास करता येणे शक्‍य होणार आहे. यामुळे एसटीचा प्रवास अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे.

गेल्या दहा वर्षांत खासगी आरामगाड्याची संख्या राज्यभरात वाढली आहे. दुसरीकडे वडापही वाढल्याने एसटीच्या महसुलात मोठी घट होत आहे. एसटी महामंडळाच्या जुन्या झालेल्या गाड्यांमुळे अनेक प्रवासी दीर्घअंतराचा प्रवास करण्यासाठी खासगी आरामगाड्यांचा आधार घेतात. याचा विचार करून एसटी महामंडळ नव्या दोन हजार गाड्या घेणार आहे. पूश बॅक सिट या प्रकारातील 1800 तर स्लिपर कोच प्रकारातील 200 गाड्यांचा समावेश असेल.

नव्या शिवशाही गाड्या 250 ते 500 किलोमीटरच्या मार्गावर सोडण्यात येतील. सर्वसामान्य प्रवाशांनाही एसटीमध्ये बसून प्रवास करता येणार आहे. कमीत कमी 6 ते 10 तासांच्या अंतराच्या प्रवासासाठी या गाड्याचा वापर होईल. या वातानुकूलीत बसमध्ये एलइडी स्क्रिन असेल. सोबत हेड फोनव्दारे एफएम ऐकण्याचा आनंदही घेता येणार आहे. या बस राज्यभरात लवकरच सुरू होत आहेत. मुंबई-रत्नागिरी मार्गावर पहिली सेवा आजपासून सुरू झाली. येत्या महिन्याभरात राज्यातील अन्य दहा शहरांत अशी सेवा सुरू होणार आहे. त्यानंतर राज्यभरातच अशा गाड्या सुरू होतील. एकाच वेळी दोन हजार गाड्या खरेदी करण्याइतपत महामंडळाकडे भांडवल नाही, परिणामी 1500 ठेकेदारी तत्त्वावर तर 500 गाड्या स्वतःच्या भांडवलातून घेण्यात येणार आहे. शिवशाही गाड्या कोल्हापूर- पुणे, मुंबई, तुळजापूर, सोलापूर, पणजी, सावंतवाडी, मालवण या मार्गावरही कोल्हापुरातून सुरू करता येणार आहेत. कोकणानंतर पहिल्या टप्प्यात या गाड्या कोल्हापुरातून सुरू व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पाठपुराव्याची गरज
कोल्हापुरातून मुंबई पुण्यासह विविध शहरांकडे प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात; मात्र त्यांच्यासाठी गाड्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांवर खासगी आरामगाडीने प्रवास करण्याची वेळ येते. रात्री दहानंतर मुंबईला जाण्यासाठी एसटी नाही. त्यामुळे कोल्हापूरला नव्या गाड्या सोडताना प्राधान्य मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी स्थानिक आमदारांनी शिवशाही गाड्या कोल्हापुरातून सुरू व्हाव्यात यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे.