राज्यातील ५ ग्रामपंचायतींत बुबनाळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

कुरुंदवाड - राज्यातील २८ हजारपैकी केवळ पाच ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती असून त्यातही बुबनाळसारख्या संवेदनशील गावाने बिनविरोध महिलाराज आणले, हे उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्‍त जे. एस. सहारिया यांनी व्यक्‍त केले.

कुरुंदवाड - राज्यातील २८ हजारपैकी केवळ पाच ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती असून त्यातही बुबनाळसारख्या संवेदनशील गावाने बिनविरोध महिलाराज आणले, हे उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्‍त जे. एस. सहारिया यांनी व्यक्‍त केले.

राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील व ईर्षेखोर बुबनाळ (ता. शिरोळ) गावाने बिनविरोध पद्धतीने महिलांच्या हाती ग्रामपंचायत सोपविली असून त्याची दखल राज्य निवडणूक आयुक्‍तांनी घेत बुबनाळला भेट देऊन सुकाणू समितीच्या सदस्या व ग्रामस्थांशी संवाद साधला. श्री. सहारिया यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले. श्री. सहारिया यांनी प्रथम ग्रामपंचायत कार्यालयात येऊन माहिती घेतली. त्यानंतर चावडी चौकात संवाद साधला.

श्री. सहारिया म्हणाले, ‘‘राज्यात २८ हजार ग्रामपंचायती असून पाच ग्रामपंचायती महिलांच्या हाती आहेत. बुबनाळने २० वर्षांत सामाजिक व राजकीय संघर्षात २० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान सोसले. ही निवडणूक बिनविरोध करताना कारभार महिलांच्या हाती दिला. हे परिवर्तन कसे घडले या उत्सुकतेपोटी मी आधी पुण्याच्या गोखले संशोधन संस्थेला परिवर्तनाबाबत संशोधन करून अहवाल देण्यास सांगितले व त्यानंतर बुबनाळ महिलाराजची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली आहे.’’ 

प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, डॉ. हरीश जगताप यांनी विकासकामांना प्रशासकीय पाठबळ देण्याची ग्वाही दिली. सुकाणू समितीचे धनपाल गरजे, सुरेश शहापुरे, सुकुमार किणिंगे, जगन्नाथ जाधव यांनी बिनविरोध निवडणुकीसाठीचे प्रयत्न व भूमिका विशद केली. सदस्या त्रिशला निडगुंदे यांनी मनोगत व्यक्‍त केले. निवडणूक आयोगाचे उपसचिव अविनाश सनस, राजेंद्र भालेराव, तहसीलदार गजानन गुरव, गटविकास अधिकारी सुशील संसारे, सभापती मल्लाप्पा चौगुले, रूपाली मगदूम, मीनाज जमादार, उपसरपंच पूनम कबाडे, अजित शहापुरे, पुष्पलता ऐनापुरे, सुजाता शहापुरे, स्नेहल मांजरे, अर्चना मालगावे, उलफतबी मकानदार, रोशन बैरगदार, सोनाली शहापुरे, त्रिशला कुंभोजे उपस्थित होते. सरपंच आसमा जमादार यांनी स्वागत केले. अजित केरीपाळे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामसेवक एम. एल. अकिवाटे यांनी आभार मानले.

बुबनाळच्या सदस्या आत्मविश्‍वासाने काम करतात. त्यांच्या पतीचा कामात हस्तक्षेप नसतो. आतापर्यंत त्यांना ४५ लाखांचा निधी दिला आहे.
-उल्हास पाटील
, आमदार