यंत्रमाग उद्योगाच्या समस्येवर राज्यव्यापी आंदोलन - शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

इचलकरंजी - ‘घोषणा करूनही राज्य सरकारने यंत्रमाग उद्योगाला वीजदरात सवलत दिलेली नाही. ही सवलत मिळावी, यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येईल,’ अशी घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी केली.

इचलकरंजी - ‘घोषणा करूनही राज्य सरकारने यंत्रमाग उद्योगाला वीजदरात सवलत दिलेली नाही. ही सवलत मिळावी, यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येईल,’ अशी घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी केली.

भाजप वगळता शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन इचलकरंजीला भेडसावणारे प्रश्‍न व समस्या खासदार शेट्टी यांनी जाणून घेतल्या. फॉर्च्युन प्लाझामध्ये ही बैठक झाली.

खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘वीजदरात सवलत देण्याची घोषणा माझ्या उपस्थितीतच वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी एका वर्षापूर्वी केली होती; मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. हा फक्त इचलकरंजीपुरता मर्यादित प्रश्‍न नाही. भिवंडी, मालेगाव, सोलापूर आदी गावांना सोबत घेऊन जनआंदोलन उभारावे लागेल. आपण या गावांशी संपर्क साधू व त्यांनाही सोबत घेऊन आंदोलन उभारले जाईल.’’

ते म्हणाले, ‘‘धरणाच्या पाण्यावर पिण्याच्या पाण्याचा प्रथम अधिकार असतो. त्याच्याशी मी सहमत आहे. काही गावांतील लोक विरोध करीत आहेत. त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी कमी होणार नाही याची खात्री करून दिली पाहिजे. त्यांना विश्‍वासात घेतले पाहिजे. इचलकरंजीला पाणी मिळावे यासाठी आवश्‍यक ती बोलण्याची प्रक्रिया मी सुरू केली आहे.’’

नगरसेवक विठ्ठल चोपडे म्हणाले, ‘‘आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यंत्रमाग उद्योग कोलमडला तर गाव कोलमडेल. त्यामुळे आपण यात लक्ष घालावे.’’ शशांक बावचकर म्हणाले, ‘‘ वस्त्रोद्योगासंदर्भात हाळवणकर समितीची नियुक्ती केली होती. या समितीच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या की नाहीत, हे समजले नाही. वारणेचे पाणी मिळणार की नाही, याविषयी भूमिका स्पष्ट करावी.’’ सागर चाळके म्हणाले, ‘‘खासदार शेट्टी यांचा इचलकरंजीशी संपर्क कमी पडत आहे. त्यांनी इचलकरंजीत लक्ष घालावे. आवाडे यांनी २३ कलमी पॅकेज योजना आणली होती. त्यामुळे आज त्यांची आठवण होत आहे.’’ प्रकाश मोरे म्हणाले, ‘‘कृष्णा योजनेच्या दुरुस्तीसाठी २८ कोटी रुपये आणले होते; मात्र ते पैसे आमदारांनी परत पाठवले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन घरफाळावाढीवर खासदारांनी स्थगिती आणावी.’’ 

स्वाभिमानीचे शहराध्यक्ष विजय भोसले यांनी स्वागत केले.  महादेव गौड, ए. बी. पाटील, चंद्रकांत पाटील, विनय महाजन, नारायण दुरुगडे आदींनी मनोगत व्यक्त केले. शिवसेना शहरप्रमुख सयाजी चव्हाण, नगरसेवक सुनील तेलनाडे, सुनील पाटील, बाळासाहेब कलागते, जयवंतराव लायकर, उदयसिंह पाटील, सतीश डाळ्या, मदन झोरे, जयकुमार कोले, प्रकाश मोरबाळे आदी उपस्थित होते. 

सदाभाऊ गेल्याने फरक नाहीच
ऊस परिषदेच्या तारखेची घोषणा बांबवडे येथे होणाऱ्या भात परिषदेत केली जाईल. शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊन किती दर हवा, ते बघून ऊस परिषदेत दराची मागणी केली जाईल, असे शेट्टी यांनी सांगितले. सदाभाऊ खोत संघटनेतून बाहेर पडल्यानंतर संघटनेला भगदाड पडले आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, ‘‘मीही घाबरलो होतो; पण असे काही मला दिसले नाही. मी देशभर फिरत आहे; परंतु माझ्या मतदारसंघाची चिंता माझे शेतकरी करतात. यावरून त्यांचे माझ्यावरील प्रेम दिसून येते.’’

Web Title: kolhapur news Statewide agitation on the problem of the power-loom industry