मॉलमधील पर्स चोरीचा अवघ्या २ तासांत छडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - खरेदीसाठी मॉलमध्ये गेलेल्या महिलेची सहा हजार रोकड आणि बॅंकेचे एटीएम कार्ड असलेली पर्स चोरट्याने लांबवली. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्याचा शोध सुरू केला. पोलिसांची चाहूल लागताच चोरटा पर्स मॉलमध्ये टाकून पळाला. ती पर्स शोधून पोलिसांनी संबंधित महिलेच्या स्वाधीन केली. त्या महिलेने पोलिसांचे आभार मानले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, टेंबलाईवाडी परिसरातील साधना आडकूरकर खरेदीसाठी ताराबाई पार्कातील एका मॉलमध्ये दुपारी गेल्या होत्या. पर्समध्ये सहा हजार रोकड आणि दोन एटीएम कार्ड होती. त्यावर सुमारे दोन लाख ४० हजार बॅलेंन्स होता. दिवाळीमुळे मॉलमध्ये गर्दी होती. मॉलमध्ये आत जाण्यापूर्वी आडूरकर यांनी पर्स मॉलच्या बॅगेत जमा केली. ती बॅग सीलबंद करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांकडे दिली. त्याच दरम्यान एका महिलेने तुमची पर्स बाजूला ठेवल्याचे सांगितले. तशी त्यांची नजर हटली. त्याचाच फायदा घेत चोरट्याने त्यांची पर्स लांबवली.

हा प्रकार एकच्या सुमारास आडकूरकर यांच्या लक्षात आला. त्यांनी याची माहिती मॉलमधील कर्मचाऱ्यांना दिली. त्यांनी शाहूपुरी पोलिसांना हा प्रकार कळवला. सहायक फौजदार संदीप जाधव आणि कॉन्स्टेबल सागर डोंगरे यांनी धाव घेतली. त्यांनी मॉलमधून बाहेर पडणाऱ्या गेटवर मॉलमधील कर्मचारी उभा केले. सीसीटीव्ही तपासण्यास सुरवात केली. त्याचबरोबर बाहेर पडणाऱ्या ग्राहकाकडे लक्ष ठेवले.

मॉलमध्ये चोरट्याचा शोध सुरू केला. दरम्यान, चोरट्याला पोलिस आल्याचे लक्षात येताच त्याने मॉलच्या साहित्यातच चोरलेली पर्स टाकली. त्यानंतर तो तेथून बाहेर पडला. दरम्यान, दुपारी अडीचच्या सुमारास जाधव व डोंगरे यांना मॉलमध्ये आडकूरकर यांची पर्स सापडली. त्यात सहा हजार व एटीएम कार्ड सुरक्षित होते. आडकूरकर यांनी सहायक फौजदार जाधव व कॉन्स्टेबल डोंगरे यांचे आभार मानले.