जंक फूडपासून मुलांना आताच रोखा!

प्रमोद फरांदे
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

आरोग्यावरील दुष्परिणामाचे प्रमाण वाढते; व्यापक जनजागृतीची गरज
कोल्हापूर - मुलांच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक वाढीवर जंक फूडचा मोठा परिणाम होत असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. शिवाय, जंक फूड म्हणजे आजाराला स्वत:हून दिलेले आमंत्रण असल्याने मुलांना त्यापासून रोखायचे कसे, हा मोठा सामाजिक प्रश्‍न निर्माण झाला आहे.

आरोग्यावरील दुष्परिणामाचे प्रमाण वाढते; व्यापक जनजागृतीची गरज
कोल्हापूर - मुलांच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक वाढीवर जंक फूडचा मोठा परिणाम होत असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. शिवाय, जंक फूड म्हणजे आजाराला स्वत:हून दिलेले आमंत्रण असल्याने मुलांना त्यापासून रोखायचे कसे, हा मोठा सामाजिक प्रश्‍न निर्माण झाला आहे.

जंक फूडमुळे लहान वयातच हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा असे विविध आजार होऊ लागले आहेत. प्राथमिक शाळांनी मुलांच्या डब्यात जंक फूडला बंदी घातली असली तरी माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय स्तरांवरील विद्यार्थ्यांचे जंक फूड हेच मुख्य अन्न झाल्याचे चित्र आहे.

आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) महाविद्यालये, विद्यापीठांतील कॅन्टीनमध्ये जंक फूडला मनाई केली आहे. याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले आहे.

तरीही कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय, विद्यापीठातील कॅन्टीनमध्ये आणि परिसरात जंक फूड हेच प्रमुख पदार्थ झाले आहेत. ते सर्वाधिक विकलेही जात आहेत. त्यामुळे जंक फूडविरोधात लोकचळवळ उभारणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर आहार व त्याच्या शरीरावर होणाऱ्या परिणामाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणे उपयुक्त ठरणार आहे.

आहाराचा प्रकृतीवर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी पोषक तत्त्व असलेला चांगला आहार अत्यावश्‍यक असतो. विशेषत: मुलांच्या वाढीच्या वयात त्याचा जास्त उपयोग होतो. पिझ्झा, बर्गर, वडापाव, भजी, ब्रेड, बटर, शीतपेये, आइस्क्रीम, चीज, मिठाई, वारंवार तळलेले पदार्थ, चिप्स, चॉकलेट, विशिष्ट पद्धतीने प्रक्रिया केलेले पदार्थ इत्यादींमध्ये पोषक घटकांची कमतरता असते. उलट हे पदार्थ शरीरातील पोषक घटकांवर हल्ला करतात. त्यामुळे त्यांचा शरीरावर मोठा दुष्परिणाम होत असल्याचे संशोधनातून वारंवार सिद्ध झाले आहे. जंक फूड ही फॅशन झाल्याने वयाच्या पन्नाशीनंतरचे आजार कॉलेजच्या मुलांना आताच होऊ लागले आहेत. कोणतेही शहर, अथवा गाव याला अपवाद नाही. आहाराविषयी शिक्षक, पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अज्ञान असल्याने मुले जंक फूडच्या आहारी जात आहेत. त्यांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृतीसाठी लोकचळवळ उभारणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर आहार हा विषय शालेय स्तरापासून अभ्यासक्रमामध्ये समावेश केल्यास त्याचे
महत्त्व पालक, मुलांमध्ये रुजेल आणि त्यांच्यातील अज्ञान दूर होऊन जंक फूडला कायमचाच पायबंद बसेल.

जंक फूडचे मानसिक दुष्परिणाम
जंक फूडमुळे मुलांचे वजन वाढते. यकृतावर परिणाम होऊन मानसिक स्वास्थ्य बिघडते, मुलांचे अभ्यासात नीट लक्ष लागत नाही. चिडचिडेपणा वाढतो. मुले ताण सहन करू शकत नाहीत. असे अनेक मानसिक दुष्परिणाम होत असल्याचे तज्ञांचे मत आहे.

निरोगी आरोग्यासाठी समतोल, सकस आहार आवश्‍यक आहे. भाज्या, कडधान्ये, तृणधान्यांचा समावेश आहारात करावा. जंक फूडमुळे मुलांमध्ये विशेषत: 16 ते 20 वयोगटांपर्यत आजाराचे प्रमाण वाढत आहे. मुलींमध्ये ऍनिमियाचे प्रमाण जास्त आहे. पोषक घटक असलेले अन्नच मुलांच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकासासाठी फायद्याचे असते. हे पालकांनी लक्षात घेणे आवश्‍यक आहे. -
- प्रा. रेखा पंडित, आहारतज्ज्ञ, कमला कॉलेज, कोल्हापूर