दोन कुटुंबांची दिवाळी अंधाराच्या साक्षीनेच

दोन कुटुंबांची दिवाळी अंधाराच्या साक्षीनेच

कोल्हापूर -  दीपावलीचे वातावरण तयार झाले आहे. हा सोहळाही ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार साजरा होणार आहे; पण मानबेटच्या जंगलालगत फक्त दोनच खोपटात राहणाऱ्या दोन कुटुंबांची दीपावली अंधाराच्या साक्षीनेच होणार आहे. कारण दिवस मावळला की, पुन्हा दिवस उजाडेपर्यंत खोपटाची दारे लावावीच लागतात, अशी इथली परिस्थिती आहे. कारण माणसांचा मागमूस नसलेल्या या परिसरात ही दोनच कुटुंबे पिढ्यान्‌पिढ्या राहतात.

फक्त इथल्या वाऱ्यावर, इथल्या नितळ पाण्यावर आणि दारात पिकवलेल्या भात, नाचण्यावर जगतात. दीपावली त्यांना माहीत आहे; पण थाटामाटात साजरी करणे, ही त्यांच्या दृष्टीने खूप लांबची गोष्ट आहे. जरुर त्यांच्या दृष्टीने ही लांबची गोष्ट आहे; पण तुम्ही आम्ही मनात आणलं, तर मात्र दीपावलीचा आनंद त्यांना मिळवून देऊ शकणार आहे. 

राधानगरी तालुक्‍याचा शेवट म्हणजे मानबेट हे गाव. या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आजपर्यंत डांबराचा थेंबही पडलेला नाही आणि या गावाच्या पुढे रस्ताच नाही. तेथून पुढे फक्त दाजीपूरचे जंगल. या मानबेटच्या पुढे काही अंतरावर धनगरवाडा होता. अशा अर्थाने की धनगरांची २० ते २५ कुटुंबे या जंगलाच्या हद्दीलगत पिढ्यान्‌पिढ्या राहात होती. लाईट नाही, रस्ता नाही, औषध नाही. एवढंच काय वस्तीतल्या माणसांशिवाय बाहेरच्या कोणत्याही माणसाचं दर्शन नाही, अशी इथली परिस्थिती. दिवस मावळला की खोपटांची दारे बंद म्हणजे बंद. कारण किर्र जंगलातल्या किर्र अंधाराचे रात्रभर साम्राज्य. दारात कुत्री आणि ती जोरजोरात भुंकायला लागली व खोपटात शिरायला लागल, की ओळखायचं बाहेर कायतरी जनावर आलंय. त्यामुळे बाहेर पडायचं नाही म्हणजे नाही.

महिन्यापूर्वी रात्री अशीच कुत्री भुंकू लागली. भुंकून भुंकून कुत्री दमली. आज कुत्री जास्तच भुंकतात याची जाणीव आत खोपटात राहणाऱ्यांना झाली. सकाळी पाहिले, तर खोपटाच्या पाठीमागे चक्क हत्तीच्या पायाचे ठसे. भात तुडवत हत्ती पुढे गगनबावड्याकडे गेलेला आणि हत्तीच्या अस्तित्वाचा अनुभव प्रथमच आलेला. 
अशा या दोनच खोपटात बबन भिकू गावडे व लहू बाळू गावडे हे दोघे कुटुंबांसह राहतात. बाकीचे सर्व धनगर परिसर सोडून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या भग्न खोपटाचे अवशेष उरले आहेत. 

म्हशीपालन, भात शेती करून ही दोन्ही कुटुंबे जगतात. जंगल, निसर्ग पर्यावरणाशी जुळवून घेत जगतात. जंगलाचे, ढगांचे, वाऱ्याचे, पावसाचे, पशुपक्ष्यांचे रोज वेगळे कल अनुभवतात. पंधरा दिवसांतून एकदा सहा ते सात तास पायपीट करून तारळ्याला बाजारास जातात. आपल्याजवळची अंडी, नाचणे, तांदूळ विकतात. त्यातून आपल्यासाठी तेल, पीठ, हळद, मीठ, काड्यापेटी, लिटरभर रॉकेल घेतात. पावसाळ्यात तर तीन ते चार महिने खोपटात शेकोटी पेटवून राहतात. त्यांना गणपती, शिमगा, दसरा, दिवाळी सण माहीत आहेत. ते साजरे करणे त्यांच्या आवाक्‍याबाहेरचे आहे. खोपटाबाहेर पणती, नवे कपडे, आकाश कंदील, रांगोळी, फटाके, लाडू-चिवडा, करंजी तर खूप लांबचे आहे; पण तुम्ही आम्ही आपण मनावर घेतलं तर मात्र जरूर दीपावली त्यांच्यासोबत साजरी करणार आहे. त्यांच्या जगण्यातला काळोख कायमस्वरूपी दूर करू शकलो नाही, तरी काही क्षणापुरती तरी आपण त्यांना साथ देऊ शकणार आहे. 

येथे जाण्याचा मार्ग असा...
गगनबावडा, सांगशी फाटा, चौके, कंदलगाव, राई, मानबेट ते मानबेट धनगरवाडा असा दोन धनगरांच्या खोपटाकडे जाण्याचा मार्ग आहे. चौक्‍यापर्यंत रस्ता बरा; पण त्यानंतर चारचाकी वाहनांनाही कसरत करावी लागते. पण मानबेटपर्यंत हळूहळू जाता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com