यंदा साखर हंगाम दिवाळीनंतरच...

यंदा साखर हंगाम दिवाळीनंतरच...

केंद्र सरकारची भूमिका - लवकर हंगामासाठी अनुदानही नाकारले
कोल्हापूर - गेल्या वर्षीच्या हंगामातील शिल्लक साखर साठा कमी आहे. त्यामुळे ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये साखरेचा तुटवडा जाणवू नये यासाठी या वर्षीचा साखर हंगाम दिवाळीनंतरच सुरू करावा, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. वेस्टर्न इंडिया शुगर मिल असोसिएशनने हंगाम लवकर सुरू करायचा झाल्यास प्रतिटन गाळपास ५०० रुपये अनुदानाची मागणी केली होती. पण या वर्षी दिवाळी लवकर असल्याने हे अनुदान न देता हंगामच सुरू करावा, असे लेखी पत्र सरकारने दिले आहे. 

राज्यात गेल्या वर्षीच्या हंगामात (२०१६-१७) साखरेचे उत्पादन निम्मेच झाले. २०१५-१६ ला साखर उत्पादन ८४ लाख टन झाले होते, तर गेल्यावर्षी हे उत्पादन फक्त ४२ लाख टन झाले आहे. देश पातळीवरही गेल्या वर्षीचे साखर उत्पादन कमीच झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर शिल्लक असलेला साखर साठा ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये कमी पडेल असा केंद्राचा अंदाज आहे. त्यामुळे ‘ईस्मा’ व साखर संघ फेडरेशनने नोव्हेंबरपूर्वीच हंगाम सुरू करावा यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर प्रदेशचा साखर हंगाम १५ नोव्हेंबरनंतरच सुरू होतो. तर महाराष्ट्रात सोलापूर व पुणे जिल्ह्यातील काही कारखाने दिवाळीपूर्वी सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

महाराष्ट्रातील साखर हंगामाचे धोरण ठरवण्यासाठी असलेल्या मंत्री समितीची बैठक झालेली नाही. ही बैठक कधी होणार हे निश्‍चित नाही. कोल्हापूरसह राज्याच्या इतर भागात दसऱ्यात पाऊस पडतो. सप्टेंबर महिन्यात पिकांची चांगली वाढ होते. 

ऑक्‍टोबरमध्ये त्यात साखर निर्मितीची प्रक्रिया सुरू होते. या शास्त्रीय कारणांचा अभ्यास करता महाराष्ट्रातील हंगामही २३ ऑक्‍टोबर ते १ नोव्हेंबरच्या दरम्यानच सुरू होईल, असा अंदाज आहे. या वर्षी दिवाळी १९ ऑक्‍टोबरला आहे. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी साखर कारखाने सुरू करावेत, असे लेखी निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत, पण कोल्हापुरात दिवाळीपूर्वीच हंगाम सुरू करण्याची तयारी साखर उद्योगाची आहे. मंत्री समितीचे धोरण निश्‍चित झाल्यानंतर हा निर्णय घेतला जाईल. 

या वर्षीचा हंगाम
या वर्षी राज्यात सुमारे ९.५० लाख हेक्‍टर क्षेत्र उसाखाली आहे. बी-बियाणे व अन्य कारणासाठी जाणारा ऊस गृहीत धरता गाळपासाठी सुमारे ६५० लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असेल. त्यातून अंदाजे ७२ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे.

जिल्ह्यात पहिला हप्ता २८०० ते २९५०
कोल्हापूर जिल्ह्याची रिकव्हरी (साखर उतारा) चांगली आहे. जिल्ह्याचा सरासरी उतारा १२.५० इतका आहे. पहिल्या साडेनऊ रिकव्हरीला २५५० व त्यापुढील प्रत्येक रिकव्हरीचा २६८ रुपये दर गृहीत धरून त्यातून तोडणी-ओढणीचे पैसे वजा करतात प्रतिटन कमीत कमी २८०० रुपये तर जास्तीत जास्त २९५० रुपये पहिल्या हप्त्यापोटी मिळणार आहेत. 

शेतकऱ्यांना होणार फायदा
या वर्षीच्या हंगामात उसाच्या एफआरपीत भरघोस वाढ झाली आहे. हंगाम कधीही सुरू झाला तरी पहिल्या साडेनऊ रिकव्हरीला प्रतिटन २५५० रुपये एफआरपी मिळणार आहे. त्यापुढील प्रत्येक रिकव्हरीला प्रतिटन २६८ रुपये मिळतील. राज्याची सरासरी रिकव्हरी ११.५० धरल्यास प्रतिटन ३०८६ रुपये मिळतील, त्यातून तोडणी-ओढणीचे प्रतिटन ५५० रुपये वजा जाता प्रत्यक्ष शेतकऱ्याला २५५० रुपये मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com