चिता रचून, पेटवून वृद्धेची आत्महत्या

चिता रचून, पेटवून वृद्धेची आत्महत्या

सिद्धनेर्ली - बामणी (ता. कागल) येथे एका वयोवृद्ध महिलेने घरी स्वतःची चिता स्वतःच रचून पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. श्रीमती कल्लवा दादू कांबळे (वय ८५) असे त्यांचे नाव आहे. 

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. कागल पोलिस ठाण्यात याची नोंद आहे. पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी - कल्लव्वा कांबळे हरिजन वाड्यातील त्यांच्या  जुन्या घरी एकट्याच राहत होत्या. या घराच्या मागील बाजूस असलेल्या मुख्य रस्त्याकडील आरसीसी घरात त्यांचा लहान मुलगा विठ्ठल पत्नी व मुलांसह राहतो. सोमवारी (ता. १३) सांयकाळी सातच्या सुमारास त्या जेवून झोपल्या होत्या.

सकाळी सातच्या सुमारास त्यांची नात ममता त्यांना नेहमीप्रमाणे दूध देण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने आजीला हाका मारल्या. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने खिडकीतून डोकावून घरात पाहिले. नेहमी ज्या खाटेवर त्या झोपत होत्या, तिथे त्या दिसत नसल्यामुळे ती धावतच घरी गेली आणि वडिलांना सांगितले. ते धावतच तेथे आले. त्यांनी आत डोकावून पाहिल्यावर आतील बाजूस धूर झाल्याचे दिसले. त्यांना शंका आली. दरवाजा ठोठावून व हाका मारून पाहिल्या; मात्र आतून प्रतिसाद मिळला नाही. त्यांनी दरवाजा मोडला. आत गेल्यानंतर त्यांना हा प्रकार दिसला. त्यांच्या आरडाओरड्यामुळे शेजारील लोकांनीही त्या घराकडे धाव घेतली. 

कल्लवा यांचा एक हात, पाय व डोक्‍याचा काही भाग वगळता संपूर्ण शरीर खाक झाले होते. चिता विझत आलेली होती. स्वयंपाक करण्यासाठी गावातून मागून आणलेल्या शेणींची चिता रचून अंगावर राँकेल ओतून पेटवून घेऊन त्यांनी जीवनयात्रा संपविली होती. काही नवीन साड्यासुद्धा त्यांनी परिधान केल्या होत्या. रात्री उशिरा त्यांनी हा प्रकार केला असावा. गेल्या दोन दिवसांपासून वाढलेल्या थंडीमुळे आसपासचे शेजारी लवकर झोपत आहेत. लगत घरे नसल्यामुळे सकाळपर्यंत हा प्रकार निदर्शनास आला नाही. घटनास्थळी दिवसभर ग्रामस्थांनी गर्दी केली होती. 

पोलिस पंचनाम्यानंतर त्यांच्या अर्ध्यापेक्षा जळून शिल्लक राहिलेल्या मृतदेहावर दुपारी अंत्यसंस्कार केले. पोलिसांनी मुलगा विठ्ठलसह मुली व इतर नातेवाईकांचे जबाब नोंदविले आहेत. हाताचा काही भाग व राखेचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. दरम्यान कांबळे यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. तीन मुली व दोन मुलांची लग्ने करून त्यांनी संसाराचा गाडा नेटाने हाकला होता. त्यांचे पती दादू यांचे वीस वर्षापूर्वी, मोठा मुलगा अरविंद, सून व एका मुलगीचेही काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. हे सर्व धक्के त्यांनी पचविले होते.

मुलगा एसटी महामंडळात नोकरीला आहे. त्याच्यापासून सुद्धा त्या वेगळ्या राहत होत्या. विठ्ठल बामणीतील मुख्य मार्गावरील आरसीसी घरात राहतात. या घराच्या पाठीमागे असलेल्या जुन्या घरात त्या राहत होत्या. त्या स्वतःच स्वयंपाक करीत. बहूतेक वेळा विठ्ठल यांच्या पत्नी व मुलगी जेवण व दूध देत असत. अलिकडे त्यांना ऐकू सुद्धा खूप कमी येत होते. काठीचा आधार घेऊन त्या आसपास फिरत होत्या. विठ्ठल यांनी त्या नव्या घरी येत नसल्यामुळे जुने घर दुरूस्त करून दिले होते. तीन खोल्यांच्या घरातील मधल्या खोलीत हा प्रकार घडला आहे.

बामणीवर शोककळा 
महिन्यापुर्वी येथील दोन तरूण कागलमधील अपघाताने ऐन दिवाळीत मृत्युमुखी पडले होते. या मधून गाव सावरण्याआधी कल्लवा यांच्या अशा दुर्दैवी मृत्युने बामणी गावावर शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com