प्रेम प्रकरणातून तरुणाची आत्महत्या

प्रेम प्रकरणातून तरुणाची आत्महत्या

कोल्हापूर - प्रेम प्रकरणातून आज टेंबलाईवाडी परिसरातील लक्ष्मी कॉलनीतील तरुणाने उचगाव येथील त्याच्या घरात आत्महत्या केली. संग्राम चंद्रकांत देसाई (वय २०, मूळ लक्ष्मी कॉलनी, सध्या रा. उचगाव) असे त्याचे नाव आहे. यानंतर १५-२० तरुणांनी टेंबलाईवाडीतील देसाईच्या घराशेजारील घरावर हल्ला केला. त्यात एक महिला जखमी झाली.

घरातील प्रापंचिक साहित्य, रिक्षा, दोन मोपेडसह सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, रात्री परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या. प्रेम प्रकरणातून वारंवार दबाव येत असल्याच्या कारणातून संग्रामने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.

संग्राम देसाईच्या आत्महत्येस शेजारी कारणीभूत असल्याच्या कारणावरून जमावाने वहिदा अक्कलकोट यांच्या घराची प्रचंड तोडफोड केल्याचे पोलिसांनी सांगितले. घराची तोडफोड करताना वहिदा जखमी झाल्या. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार झाले. घटनेनंतर संबंधित अक्कलकोटवर गुन्हा दाखल करा; अन्यथा मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. पोलिसांच्या मध्यस्थीने गुन्हे दाखल करण्याचे आश्‍वासन मिळाल्यावर दुपारी अंत्यसंस्कार झाले. याबाबतचा गुन्हा रात्री राजारामपुरी पोलिस ठाण्यात तर आत्महत्येचा गुन्हा गांधीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाला.

घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी - संग्राम देसाई टेंबलाईवाडी लक्ष्मी कॉलनीत राहत होता. त्याच्या शेजारी अक्कलकोट राहतात. सहा महिन्यांपूर्वी अक्कलकोट आणि संग्राम यांच्यात किरकोळ वाद झाला होता. स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने वाद मिटला होता. त्यानंतर देसाई कुटुंबीय उचगाव येथे स्वामी समर्थ मंदिर परिसरात राहण्यास गेले. काल रात्री साडेदहा वाजता संग्राम आणि कुटुंबीयांनी एकत्रित जेवण केले. त्यानंतर सर्वजण झोपी गेले. आज सकाळी सहाच्या सुमारास चंद्रकांत देसाई उठल्यानंतर त्यांना जिन्याच्या टोपीला संग्रामने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. त्यांना धक्काच बसला. त्यांनी कुटुंबीयांना बोलावून घेतले. गांधीनगर पोलिस दाखल झाले. पंचनामा झाला. त्यानंतर सकाळी संग्रामचा मृतदेह सीपीआरमध्ये नेण्यात आला. 

दरम्यान, देसाई यांचे सर्व कुटुंबीय सीपीआरमध्ये असतानाच काही अज्ञात पंधरा-वीस जणांच्या जमावाने थेट अक्कलकोट यांच्या घरात घुसून हल्ला चढविला. घरातील चारही खोल्यांतील सर्व प्रापंचिक साहित्याची मोडतोड केले. फ्रीजचा दरवाजा मोडला, पंखा वाकवला, तीन कपाटांची मोडतोड केली. ताटे-वाट्या भिरकटून दिल्याचे दिसत होते. खिडक्‍यांच्या फोडलेल्या काचाही घरात सर्वत्र पसरलेल्या होत्या. या वेळी अक्कलकोट यांच्या घरातील कुटुंबीय भयभीत झाली. हल्ल्यात वहिदा अक्कलकोट यांच्या डोक्‍याजवळ जखम झाली. जमावाने दारातील रिक्षा, बोळातील दोन मोपेडचे मोठे नुकसान केले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

गांधीनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ यांच्यासह राजारामपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या वेळी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यानच्या काळात संग्रामचा मृतदेहसुद्धा अककलकोटच्या घराशेजारीच असलेल्या चुलत्याच्या देसाई यांच्या घरी आणण्यात आला होता. अक्कलकोट यांनी दिलेल्या त्रासामुळेच संग्रामचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलविणार नसल्याची भूमिका देसाई कुटुंबीयांनी घेतली. अखेर शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह पोलिस निरीक्षक सर्वश्री संजय साळुंखे, तानाजी सावंत, संजय मोहिते यांनी नातेवाईकांची समजूत काढली व गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर संग्रामचा मृतदेह तेथून हलविण्यात आला.

प्रेम प्रकरणाचे कारण ?
संग्रामचे प्रेम प्रकरण या सर्व घटनेला कारणीभूत असल्याचे पोलिस आणि स्थानिकांनी सांगितले. प्रेम प्रकरणाच्या कारणावरून संग्रामला वारंवार त्रास दिला जात होता. त्याच त्रासातून मुक्त होण्यासाठी त्याने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. याबाबत शहानिशा करूनच गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मी उद्या कामावर जाणार नाही 
आम्ही देसाई कुटुंबीय दररोज रात्री एकत्रितच जेवतो. काल रात्रीसुद्धा संग्राम आमच्याबरोबर जेवायला बसला होता. जेवतानाच त्याने ‘मी उद्या कामावर जाणार नाही’ असे मला सांगितले होते. तब्येत बरी नसेल म्हणून जाणार नसेल असे समजून मी ‘बरं’ म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले आणि रात्रीत त्याने आत्महत्या केली, असे सांगत त्याचे वडील चंद्रकांत यांना अश्रू आवरता आले नाहीत. 

परस्पर फिर्यादी 
जखमी वहिदा अक्कलकोट यांनी दिलेल्या फिर्यादीत योगेश अजाटे, युवराज अजाटे, ऋतीक देसाई, त्याचा लहान भाऊ, दादा देसाई, सुनील देसाई, विनय अनिल क्षीरसागर, पवन चंद्रकांत देसाई, चंद्रकांत देसाई यांच्यासह १५-२० जणांनी घराची तोडफोड केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

मृत संग्रामचे वडील चंद्रकांत देसाई यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, की करीम अक्कलकोट, बबलू अक्कलकोट, रजिया अक्कलकोट, वहिदा अक्कलकोट यांनी संग्रामला आत्महत्येस प्रवृत्त केले. पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संग्रामने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या डायरीचा संदर्भ फिर्यादीत घेण्यात आला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com