प्रतिकूलता हीच तुमची प्रेरणा बनेल...

प्रतिकूलता हीच तुमची प्रेरणा बनेल...

समर यूथ समीट २०१७ - खणखणीत आत्मविश्‍वासाची विविध वक्‍त्यांकडून पेरणी
कोल्हापूर - महाविद्यालयीन जीवनातच करिअरचा मार्ग निवडणे उज्ज्वल भविष्याचा मंत्र आहे. ज्याच्याकडे बुद्धीचे भांडवल आहे आणि ज्याला वशिल्याची गरज नाही, त्याने स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग स्वीकारावा व परिस्थितीचा बाऊ न करता कष्टाची तयारी ठेवावी. युवकांनो, तुमची प्रतिकूलता हीच तुमची प्रेरणा बनेल आणि काळावर स्वार होणारी पिढी घडेल, अशा खणखणीत आत्मविश्‍वासाची पेरणी विविध वक्‍त्यांनी आज यिन सदस्यांमध्ये केली. इमेज बिल्डिंगची उसनवारी होत नाही, हे लक्षात घेऊन डॉक्‍युमेंटेशनद्वारे स्वत:ची इमेज बिल्डिंग निर्माण करा, असा सल्लाही वक्‍त्यांनी दिला. 

डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ‘समर यूथ समीट२०१७’ च्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांत सळसळती ऊर्जा वक्‍त्यांनी पेरली. दिवसभरातील वैविध्यपूर्ण विषयांवरील मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडलीच, शिवाय कॉन्फिडन्स वाढल्याच्या प्रतिक्रियाही त्यांच्यातून व्यक्‍त झाल्या. स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी प्रस्तुत व नीलया एज्युकेशन ग्रुप पॉवर्ड बाय असणाऱ्या शिबिरासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट व विद्याप्रबोधिनी यांचे सहप्रायोजकत्व आहे. वि. स. खांडेकर भाषाभवनात त्याचे आयोजन केले आहे. प्रेरणा शहा हिने सूत्रसंचालन केले. 

तंत्रज्ञानाचा आवाका लक्षात घ्या - श्रीराम पवार, मुख्य संपादक, सकाळ माध्यम समूह

विषय : चेंजिंग मीडिया ट्रेंडस्‌
काळावर स्वार होणारी पिढी घडावी, यासाठी यिन चळवळ सुरू आहे. बदल न चुकणारे असतात. बदलाला जो सामोरा जात नाही, तो संपून जातो. प्रवाही असणे म्हणजे बदलाला सामोरे जाणे. बदल होत असताना एक अस्वस्थता असते. नव्या तंत्रज्ञानाचा आवाका लक्षात घेऊन मार्गक्रमणा करावी लागते. अस्वस्थतेवर मात करण्याचे एकच तंत्र आहे, ते म्हणजे नव्या जगाची माहिती करून घेणे. कोडॅक कंपनी बंद पडण्यामागे हेच कारण आहे. थोडेसे मागे वळून पाहिल्यास, पहिल्या औद्योगिक क्रांतीने माणसाचे आयुष्य बदलून गेले. कामगार व मालक दोन वर्ग तयार झाले. वितरणाची व्यवस्था बदलली. शेती हाच रोजगाराचा मार्ग होता. ही स्थिती बदलून उद्योगधंद्यांत नोकऱ्या तयार झाल्या आणि नवी समाजरचना अस्तित्वात आली. विजेच्या शोधानंतर उत्पादनात वाढ झाली, तर संगणकाच्या शोधाने उत्पादनाची गती हजारो पटीने वाढली. चौथ्या औद्योगिक क्रांतीनंतर एक टक्के लोक अन्य लोकांनी काय करावे, त्यांचे वर्तन कसे असावे, व्यवहार कसे असावेत, हे ठरवू लागले आहेत. 

संगणक क्रांतीने प्रत्येक वस्तू एकमेकाशी जोडली गेली आहे. या परिस्थितीत उबेरॉयने टॅक्‍सी चालविणाऱ्या लोकांचे ॲप तयार केले करून टॅक्‍सी व्यवसायाला वेगळा आयाम दिला आहे. दुसरे असे, की प्रवासाला जाण्यापूर्वीच हॉटेल बुकिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. टॉप टेन उद्योगांतील पहिले पाच उद्योग तंत्रज्ञानावर आधारित आहेत. या सर्व बदलांच्या मागे अर्थकारण आहे. गाना डॉट कॉमवर गाणे ऐकण्याची, तर व्हॉटस्‌ ॲपवर कॉल करण्याची सोय आहे. मात्र हे करत असताना जगात कोणतीही गोष्ट फुकट नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. ड्रायव्हरलेस गाड्या प्रत्यक्ष रस्त्यावर उतरतील, असे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नवतंत्रज्ञान शिकावे लागेल तरच जगण्यात बदल होईल. व्हॉटस्‌ ॲपने एकमेकांचा संवाद सुकर केला, हे सत्य असले तरी प्रायव्हसीसुद्धा नष्ट झाली आहे. रोटी, कपडा, मकान यासमवेत डाटा नावाचे तंत्र प्रत्येकाच्या जीवनाशी जोडले जात आहे.
 - प्रत्येक पिढी जगाला पुढे नेणारी 
 - १९८० नंतर जन्मलेली पिढी स्क्रिन एजर 
 - मेडिकल सायन्समध्ये शारीरिक चाचण्या मोबाईलद्वारे 
 - अस्वस्थतेत भर टाकणारे तंत्रज्ञान

बुद्धीच्या भांडवलदारांसाठी... - सुनील पाटील, संचालक, स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी
विषय : स्पर्धा परीक्षा

स्पर्धा परीक्षा करिअरचा राजमार्ग आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा तीव्र झाली आहे. या परिस्थितीत परवलीचे दोन शब्द सर्वांनाच माहित होत आहेत. त्यातील एक एमपीएससी व दुपरा यूपीएससी. स्पर्धा परीक्षांचे विश्‍व खूप मोठे आहे. ज्याला वशिल्याची गरज नाही व ज्याच्याकडे बुद्धीचे भांडवल आहे, त्यांनी स्पर्धा परीक्षेत जरूर उतरावे. पोलिस, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस आयुक्त, नायब तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, सचिव, मुख्य सचिव यांना अधिकार असतात. अर्थात शासकीय सेवेतले प्रत्येक पद अधिकाराचे असते. या पदांच्या परीक्षेतील काठिण्य पातळी निरनिराळी असते इतकेच. यूपीएससी ही सर्वोच्च नागरी परीक्षा असून, त्यात २६ प्रकारचे केडर आहेत. पूर्व परीक्षेचा विचार केला तर एमपीएससी व यूपीएससीचा पॅटर्न सारखाच झाला आहे. आता देशाला अधिकार गाजवणारे नव्हे, तर उत्तम व्यवस्थापन करणारे अधिकारी आहेत. कमी स्रोत असताना चांगले काम करून दाखविणारे अधिकारी हवे आहेत.  

यूपीएससीमध्ये सीसॅट प्रश्‍नपत्रिकेद्वारे परीक्षार्थीची आकलनक्षमता पाहिली जाते. त्याला शक्‍य पर्याय कळले पाहिजेत, त्याबाबत निर्णय घेता आले पाहिजेत, अशी त्यामागील धारणा आहे. एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी इंग्रजी व मराठी विषय असून, त्यातून परीक्षार्थीचे भाषाकौशल्य, शब्दसंग्रह, म्हणी, वाक्‌प्रचार, व्याकरण, लेखनकौशल्य पाहिले जाते. सुमारे अर्धा तासाच्या मुलाखतीतून त्याच्या सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेतली जाते. या परीक्षांसाठी ऑब्जेक्‍टिव्ह प्रश्‍न विचारले जात असल्याने परीक्षार्थींना पाठांतरापेक्षा संकल्पना समजून घेणे आवश्‍यक असते.

पंचवार्षिक योजनांचा विचार करता त्यांचा तुलनात्मक अभ्यास करणे जरुरीचे आहे. प्रत्येक योजनेत विकासाच्या अनुषंगाने काय झाले, कोणत्या घटकाला प्राधान्य होते, ग्रोथ रेट किती ॲचिव्ह झाला, याचा विचार केला पाहिजे. यूपीएससीच्या बारा-तेरा परीक्षा ऑब्जेक्‍टिव्ह आहेत. त्याच्या एक-दोन महिन्यांनी जाहिराती येत असतात. 
- विषयांतील संकल्पना समजणे आवश्‍यक
- इंग्रजी व गणितचा बाऊ नको
- उत्तम व्यवस्थापन करणारे हवेत अधिकारी
- विश्‍लेषणाचा सराव गरजेचा

व्हिजनमुळे करिअरचा मार्ग सुकर - तेजस गुजराथी, मुख्य व्यवस्थापक कम्युनिटी नेटवर्क, यिन
विषय : ओटीएक्‍स - थिंकिंग 

जीवनात कुणीच परिपूर्ण असू शकत नाही. व्हिजन ठरवून प्रवास केल्यास करिअरचा मार्ग सुकर होतो. फेसबुक प्रोफाईल कसे बनले पाहिजे, ई-मेल आयडी ओपन कसा केला पाहिजे, व्हॉट्‌स ॲप कम्युनिकेशन कसे करायला हवे, हे समजणे गरजेचे आहे.

हे टुल्स कम्युनिकेशनचे चॅनेल्स आहेत. संगणकाचे स्किल घ्यायचे असेल, तर त्यात तडजोड करता कामा नये. यूएसएच्या लोकांना इंग्रजी चांगले बोलता येत असेल, तर तसा बोलण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. भारतीय लोक कोणत्याही गोष्टी लगेच स्वीकारतात, हे आपण जाणतो. मग आपण एखादे स्किल शिकण्यात वेळ का दवडतो? शॉर्ट टर्म कोर्स कुठले आहेत, याचा विचार करून त्यांचे प्रशिक्षण घ्या. वर्षभराने त्याचे विश्‍लेषण करा. वर्षभरापूर्वी तुम्ही कोठे होता आणि आता कोठे आहात, याचे विश्‍लेषण करा. लक्षात ठेवा, जो वेगळा विचार करायला लागतो, तो इतरांपेक्षा खूप वेगळा असतो. लोकांना काय द्यायचे आहे, हे समजणे आवश्‍यक आहे. कुटुंबाचे कितीही प्रेशर असले, तरी आपले व्हिजन क्‍लिअर असेल असायला हवे, तरच आपण कुटुंबाचे मनपरिवर्तन करू शकतो. त्याचबरोर आत्मविश्‍वासाने लीड करायला शिकतो आणि दुसऱ्यांना द्यायला शिकतो. राग सर्वांनाच येतो. पण तो आल्यानंतर आपला दृष्टिकोन कसा ठेवायचा याचेही भान आपल्याला असले पाहिजे. गाव कोणतेही असो, तेथे मित्र असणे आवश्‍यक आहे. शिकाल तरच शिकवाल, हे तत्त्व लक्षात घेत कोणत्याही गोष्टीला ‘दर्जा’ प्राप्त करून द्यायला शिका. फेसबुक व व्हॉट्‌स ॲप कम्युनिकेशनचे महत्त्व सांगतात. त्यामुळे कमी शब्दांत आशयपूर्ण संवाद करायलाही शिका. 
- व्हिजन क्‍लिअर असेल तरच यश 
- ‘गाव तेथे मित्र’ संकल्पना आत्मसात करा
- व्यक्तिमत्त्व विकास आशयपूर्ण संवाद आवश्‍यक
- विश्‍लेषण जीवनातील महत्त्वाचा घटक

निरीक्षणातूनच इमेज बिल्डिंग -  अनंत खासबारदार, संस्थापक, निर्मिती ग्राफिक्‍स

विषय : इमेज बिल्डिंग
‘स्वच्छ भारत’साठी २०१४ ला बनविलेल्या लोगोचे कौतुक आजही सुरू आहे. अमुक करा-तमुक करा म्हणून सांगण्याइतका मी मोठा नाही. त्यामुळे मी ॲकॅडेमिक काही बोलणार नाही. केवळ गेल्या वीस-पंचवीस वर्षांतील अनुभव शेअर करणार आहे. 

इमेज बिल्डिंग ही मोठी प्रक्रिया आहे. ती समजून घेण्यासाठी अभिनेता रॉजर मूर व प्रातिनिधिक स्वरूपात राजू मोरे याचे उदाहरण घेऊ. राजूच्या आयुष्याचे पदर आपण वेगवेगळ्या प्रकारे मांडू शकतो. रॉजर मूरचे क्षितिज फारच वेगळे आहे. त्याला निराळे संदर्भ आहेत. त्याच्या अभिनयाच्या संकल्पना वेगळ्या आहेत. दुसरीकडे राजू मोरे बेसिक गोष्टीसाठी झगडत आहे. त्यामागे त्याला शिक्षणातून आलेले भान, व्यक्तिमत्त्व प्रभावी करण्याची इच्छा, प्राप्त परिस्थिती अशी विविध कारणे आहेत. तो चांगला मोबाईल, ब्रॅंडेड गॉगल, पेन, टाय आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होऊ शकतो, या विचारांत अडकला आहे. दिखाऊ व खरी इमेज बिल्डिंग यात फरक आहे. इमेज बिल्डिंग दिखाऊ वस्तूत नाही. इमेजची उसनवारी करता येत नाही. वाचन, निरीक्षणाचं स्थान यातून ती घडत असते. देशाचा झेंडा गाडीवर लावून इमेज बिल्डिंग होत नाही.

डॉक्‍युमेंटेशन हे इमेज बिल्डिंगसाठी महत्त्वाचे ठरते. चार महिन्यांपूर्वी काय केले, याची नोंद ठेवली पाहिजे. सामाजिक, आर्थिक, चमत्कार काय घडताहेत, हेसुद्धा लिहून ठेवायला हवे. डायरीतून पर्सनॅलिटी व्हिज्युलाइज होत असते. तुमची इमेज तयार झाली, की काय होते, याचे उदाहरण म्हणून अमीर खानकडे पाहा. आज जेव्हा तो लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांवर बोलत असतो, तेव्हा त्याच्या पोशाखाकडे नव्हे त्याच्या विचारांकडे लक्ष जाते. तुमची इमेज तयार झाल्यावर तुमच्यावर सामाजिक दबावही असतो. तुम्हाला चुकीचे वर्तन करता येत नाही. हा काळ मोहमयी आहे. डगमगणारा आहे. इथे नीट पाऊल नाही टाकले, तर घसरण्याची भीती आहे. उद्योजक छोटी पुस्तके काढतो. त्याचा उद्देश त्याची प्रेरणा इतरांना मिळावी, हा असतो. इमेज बदलण्यात डॉक्‍युमेंटेशन काम करते, हे लक्षात घ्या. 
 - इमेज बिल्डिंगसाठी क्रिएटिव्हिटी गरजेची
 - कॉज चांगले असेल, तर फॉलोअर्स वाढतात
 - डॉक्‍युमेंटेशन इमेज बिल्डिंगसाठी महत्त्वाचे
 - इमेज बिल्डिंगची उसनवारी होत नाही

विचार, भावनांवर काम करत राहा - संतोष इंगोळे मानसोपचारतज्ज्ञ

विषय : पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट
कोणत्या प्रकारचे आव्हान घ्यावे लागेल, कोणत्या क्षेत्रात ती येत आहेत, हे समजून घ्या. त्यासाठी तुमचे माइंडसेट, स्किलसेट, टुलसेट बदलण्याची गरज आहे. प्रत्येकाला चॉइस असते, पण डिसिजन मेकिंग नसते. आतून बदलायला आपण तयार असत नाही.

आपल्या स्वप्नांवर आपणच काम करायला हवे. वरुणकुमार हे माइंडसेटवर काम केलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्याचा प्रवास लक्षात घेऊन प्रेरणा घेतली तरी पुष्कळ कमावण्यासारखे आहे. आपल्या विचार व भावनांवर काम करत राहू, तेव्हा खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकास होईल. केवळ बाह्य बदलांनी स्वत:मध्ये बदल घडणार नाही. भूतकाळातील वर्तन भविष्यातील वर्तनाचे भाकित आहे, हा विचार लक्षात घ्या. तुमच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी नियोजनाची व कष्ट करण्याची तयारी ठेवा. कम्युनिकेशन स्किल म्हणजे नुसते बोलणे नव्हे. तुमचे सेल्फ मॅनेजमेंटचे स्किल गुणपत्रकावर येत नसले, तरी त्याला महत्त्व आहे. अंडरप्रेशर काम करण्याची कुवत जो विकसित करतो त्याला अपयश येत नाही.  

मोबाईल, सोशल मीडिया आपण विकासासाठी कशी वापरतो, त्याचा आपल्या करिअर व विकासावर कसा फोकस राहणार नाही, याचा शोध आपणच घेतला पाहिजे. कधी कधी आयुष्याच्या टप्प्यावर आपली क्षमता हीच विकनेस बनते. अनेक पदव्यांचे भेंडोळे कामाचे नाही. वडिलांचा धंदा आहे, तोच मी करणार नाही, ही विचारधारा बदलून पाहा. अंतर्गत भागांवर काम केल्याखेरीज मूलभूत बदल घडत नाही. गाभ्यात काय आहे, त्यात मूल्य व धारणा काय आहेत, याचा धांडोळा घ्यायला हवा. आपली प्रतिकूलता हीच प्रेरणा होऊ शकते. मूलभूत भावनांवर काम करून स्वत:ला बदलण्यास सज्ज राहा. कारण तुमची मूल्ये ही तुम्ही जीवनात काय करणार, हे ठरवत असतात. 
- प्रतिकूलता हीच बनेल प्रेरणा
- अंडरप्रेशर काम करण्याची कुवत विकसित व्हावी
- स्वप्नांवर काम करा
- बाह्य बदलाने बदल घडणार नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com