शिवसेना कन्फ्यूज पार्टी - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

कोल्हापूर -  शिवसेना कन्फ्यूज पार्टी आहे. त्यांना आपण काय करतो हे समजत नाही. सत्तेत राहून आंदोलन करणे म्हणजे मोठा जोकच आहे, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजप सरकारच्या काळात महागाईने जनता होरपळत असल्याची टीकाही त्यांनी केली.

कोल्हापूर -  शिवसेना कन्फ्यूज पार्टी आहे. त्यांना आपण काय करतो हे समजत नाही. सत्तेत राहून आंदोलन करणे म्हणजे मोठा जोकच आहे, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजप सरकारच्या काळात महागाईने जनता होरपळत असल्याची टीकाही त्यांनी केली.

खासदार सुळे बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. सायंकाळी शासकीय विश्रामधाममध्ये पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘समाजातील विविध घटकांचे प्रश्‍न समजून घेण्यासाठी या विषयांवर कार्यकर्त्यांशी मनमोकळेपणे संवाद साधण्यासाठी राज्याचा दौरा करत आहे. सध्या समाजातील कोणताही घटक या सरकारच्या कारभारावर समाधानी दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, महिला सुरक्षित नाहीत, शेतीला वीज मिळत नाही, पारदर्शी कारभाराच्या गप्पा मारणाऱ्या आणि महागाई कमी करण्याचे आश्‍वासन देणाऱ्या या सरकारच्या काळात सर्वांचेच भाव वाढले आहेत. राज्यात विजेची माहिती आपण संकलित करत आहोत. या सरकारला डेटा खूप आवडतो. त्यामुळे हा डेटा सरकारला सादर करू’’

शिवसेनेच्या भूमिकेबाबत खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘मुळात शिवसेना एक कन्फ्यूज पार्टी आहे. सत्तेत राहून लोकांचे प्रश्‍न सोडवायचे असतात. त्यासाठीच लोकांनी सत्तेवर बसवलेले असते; मात्र सत्तेत राहून शिवसेना करत असलेले आंदोलन म्हणजे जोकच आहे. काही लोकांनी राजकारण व्यवसाय केला आहे. प्रत्येक पक्षात असे तीस, पस्तीस टक्‍के लोक असतात. सत्ता आली की, त्या बाजूला झुकतात. मग सत्ता कोणाची का असेना. त्यांना काही फरक पडत नाही. आजही तीच मंडळी आमच्यातून बाजूला गेली आहेत, पण त्यांचे काम काही दिसत नाही. आमच्याकडे होती तेव्हा ते लोक किमान चांगले काम तरी करत होते.’’

इकबाल कासकरला अटक केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या वक्‍तव्याबद्दल त्या म्हणाल्या, ‘‘पोलिस अधिकाऱ्यांनी संवेदनशील प्रकरणात जबाबदारीने वक्‍तव्य करणे आवश्‍यक आहे. राजकारण्यांशी संबंध असल्याचे सांगण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रथम त्याची सखोल चौकशी करून माहिती घेणे व संबंधितांना अटक करणे आवश्‍यक होते.’’

महापौर हसीना फरास, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर, नाविद मुश्रीफ, आदिल फरास, भैया माने, अनिल साळोखे आदी उपस्थित होते.

Web Title: kolhapur news supriya sule comment on shivsena