‘दत्त दालमिया’वर ‘स्वाभिमानी’चा राडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

पन्हाळा -  गतवर्षीच्या अंतिम हप्त्यासह प्रतिटन २ किलो साखर मिळावी आदी मागण्यांसाठी आसुर्ले पोर्ले येथील दत्त-दालमिया साखर कारखान्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लक्ष्य केले. कारखान्याचे मुख्य अधिकारीच परस्पर निघून गेल्याने संतप्त जमावाने शेती, संगणक, टाइम ऑफिस आणि अकाउंट कार्यालयावर दगडफेक, तोडफोड करून कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयांना कुलपे ठोकली.

दत्त दालमियाचा को-जनरेशन प्रकल्प सुरू असून, दोन दिवसांत डिस्टिलरी प्रकल्प सुरू होणार आहे. १ नोव्हेंबरपासून गळीत सुरू होणार आहे. गतवर्षीचा अंतिम दर, तसेच प्रतिटन २ किलो साखर मिळावी, अशी मागणी आहे. याबाबत चर्चा, बैठकाही झाल्या. यातून मार्ग निघाला नाही.

संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रम पाटील, रामभाऊ चेचर, उदय शेलार, दत्ता पाटील, नारायण पाटील, बाबूराव शेवडे, तानाजी नारकर, कृष्णात जमदाडे, शिवाजी शिंदे आदी संघटनेचे २०० ते २५० कार्यकर्ते आणि शेतकरी यांनी आज सकाळी ११ वाजता ऊस आमच्या घामाचा, नाही कोणाच्या बापाचा, टनाला २ किलो साखर मिळालीच पाहिजे, 
अशा घोषणा देत मोर्चा काढला. मुख्य कार्यकारी अधिकारी के. पी. सिंग, युनिट हेड टी. एन. सिंग मोर्चा येताच निघून गेले, त्यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा अधिकारी कॅप्टन विक्रम सिंग, असिस्टंट जनरल मॅनेजर (एचआर) अनंत कामोजी यांना धारेवर धरले, ते समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने जमाव कारखान्यात घुसला. त्यांनी शेती, संगणक, टाइम ऑफिस आणि अकाउंट ऑफिस, मीटिंग हॉलच्या काचा फोडल्या. पोलिस निरीक्षक रवींद्र साळोखे, सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत गिरी यांनी सौम्य लाठीहल्ला करत जमावाला पांगविले.

दत्त-दालमियाचे प्रशासन पहिले बिल तेवढे देते, अन्य बिलांबाबत चालढकल करते. बाहेरून ऊस आणून तो खर्च परिसरातील शेतकऱ्यांवरच बसवतात. डिस्टिलरीमुळे प्रदूषण वाढले. गत हंगामातील अंतिम दर व टनाला २ किलो साखर मिळत नाही, तोपर्यंत कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही.
रामभाऊ चेचर, विक्रम पाटील, स्वाभिमानी संघटनेचे नेते.