तुम्हाला फोन येईल... तुम्ही फक्त ‘होय’ म्हणा...

तुम्हाला फोन येईल... तुम्ही फक्त ‘होय’ म्हणा...

कोल्हापूर - तुम्हाला कदाचित एक फोन येईल. तो स्वच्छ भारत अभियान - २०१८ मार्फत असेल. ते विचारतील ‘‘तुमच्या कोल्हापूर शहरात स्वच्छता भारत अभियान चालू आहे का?’’ त्या वेळी तुम्ही ‘होय’ एवढं उत्तर दिलं, की या शहरातील लोकांना अभियानाची माहिती आहे या मुद्द्यावर ४००० पैकी १७५ मार्क मिळणार आहेत. त्यामुळे ‘‘तुम्ही फक्त हो म्हणा,’’ अशा स्वरूपाचे संदेश महापालिका यंत्रणेमार्फत दिले जात आहेत.

जानेवारी २०१८ पासून सुरू होणाऱ्या या अभियानात कोल्हापूर महापालिका सहभागी झाली. अर्थात हे अभियान कसे राबवले जाईल हा पुढचा भाग आहे; पण निदान अभियान लोकांपर्यंत पोचले आहे, या मुद्द्यावर १७५ मार्क मिळवण्याची तयारी महापालिकेने सुरू केलीय.

अभियानांतर्गत महापालिका स्वच्छतेसंदर्भात वेगवेगळे उपक्रम राबवणार आहे. त्यांची छाननी समितीतर्फे होणार आहे; पण त्याहीपेक्षा हे अभियान खरोखर लोकांना माहीत आहे का? या वेगळ्या निकषावरही छाननी होणार असल्याने या जुळण्या सुरू झाल्या आहेत.

अभियानाची तयारी एका दिवसात करता येणे शक्‍य नसल्याने तयारीला सुरवात झाली. १३ ‘गुडमॉर्निंग पथकां’ची स्थापना झाली. पथकात एक सॅनिटरी इन्स्पेक्‍टर व इतर सात ते आठ कर्मचारी आहेत. पहाटे हे पथक बाहेर पडते व विशेषतः ज्या भागात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या जास्त आहे, तेथे जाते. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना गांधीगिरी पद्धतीने गुलाबाचे फूल देऊन समज दिली; पण आता या पथकात पोलिसही असल्याने दंडाची कारवाई सुरू झाली. अर्थात गुडमॉर्निंग पथकाच्या कारवाईचा अंदाज घेत, काही जणांनी आपल्या प्रातःर्विधीच्या वेळेत बदल करण्याचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे १०० टक्के हा प्रकार थांबण्याची शक्‍यता नाही अशी परिस्थिती आहे.

अर्थात रेल्वे मार्गालगतचा काही परिसर, राजेंद्रनगर व अन्य काही उपनगरांत काही ठिकाणीच उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांची संख्या अधिक आहे; मात्र तेथेही आसपासचे नागरिक शौचाला बसणाऱ्यांच्या दिशेने दगड, विटा फेकून त्यांना बसू देत नाहीत; पण त्यातूनही हा प्रकार पूर्ण थांबवणे अशक्‍य आहे. घराघरात शौचालय किंवा सार्वजनिक शौचालयांची सोय, हाच त्यावरचा उपाय आहे.

कचरा उठाव ही शहराची मुख्य समस्या आहे. शहराच्या तुलनेत सफाई कर्मचाऱ्यांची संख्या ३५० ने कमी आहे. आऊट सोर्सिंगही बंद आहे. त्यामुळे  स्वच्छता पूर्ण क्षमतेने होत नाही. शहरातले काही भाग असे आहेत, की दिवसातून तीन वेळा कचरा उचलला, तरी तेथील कोंडाळा पुन्हा भरलेलाच असतो. कपिलतीर्थ, गंगावेश, ऋणमुक्तेश्‍वर, एस.टी. स्टॅंड ही त्याची उदाहरणे आहेत. याशिवाय चार मुख्य रस्त्यांवर रात्रीच्या वेळी सफाई सुरू आहे; पण शहराच्या तुलनेत सफाई यंत्रणेवर मर्यादा असल्याने कोठे ना कोठे कचऱ्याचे ढीग दिसतात, गटारं तुंबलेली असतात ही परिस्थिती आहे. काही ठिकाणी कचरा घंटागाडी नियमित येत नाही. त्यामुळे कचरा साठून राहतो व घरातला अतिरिक्त कचरा गटारात ओतला जातो.

दोन स्वीपिंग मशीन कार्यान्वित होणार 
 दोन स्वीपिंग मशीन येत्या आठवड्यात कार्यान्वित होणार आहेत. कदाचित स्वच्छ भारत अभियानाचाच हा एक भाग आहे. ही दोन मशीन शहरातल्या ३५ किलोमीटर मार्गावर रोज फिरणार आहेत. हे मशीन कचरा एकत्रित करते व तो कचरा शोषून घेते. रोज ७० किलोमीटर रस्ते या मशिनने स्वच्छ होणार आहेत, असा मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांचा दावा आहे. अर्थात मशीन रस्त्यावर फिरू लागल्यानंतरच त्याचा आवाका लक्षात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com