कोल्हापूर मनपा महापौरपदासाठी स्वाती यवलुजेंची निवड निश्‍चित

कोल्हापूर मनपा महापौरपदासाठी स्वाती यवलुजेंची निवड निश्‍चित

कोल्हापूर - महापौर, उपमहापौरपदासाठी शुक्रवारी (ता. २२) होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दिवशी महापौरपदासाठी काँग्रेसकडून स्वाती सागर यवलुजे यांचा; तर भारतीय जनता पक्षातर्फे मनीषा अविनाश कुंभार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील सावजी पाटील यांचा; तर ताराराणी आघाडीतर्फे कमलाकर यशवंत भोपळे यांचा अर्ज दाखल झाला. त्यामुळे महापौरपदासाठी सौ. यवलुजे व उपमहापौरपदासाठी श्री. पाटील यांची निवड निश्‍चित मानली जाते.

रिक्‍त असलेल्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा दिवस होता. महापौरपदासाठी काँग्रेसकडून दीपा मगदूम, उमा बनछोडे व स्वाती यवलुजे इच्छुक होत्या. या तिघांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेस समितीत घेतलेल्या. सुरुवातीपासून श्रीमती मगदूम यांचे नाव आघाडीवर होते. मात्र शेवटच्या टप्प्यात त्यांचे नाव मागे पडले आणि सौ. बनछोडे व सौ. यवलुजे यांची नावे पुढे आली.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दुपारी चारच्या सुमारास काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक महापालिकेत आले. याच वेळी आमदार सतेज पाटील समर्थकांनीही महापालिकेत गर्दी केली होती. काँग्रेस आघाडीच्या कार्यालयात काँग्रेसचे नगरसेवक 
महापौरपदासाठी कोणाचे नाव येणार? याच्या प्रतीक्षेत होते. चारच्या सुमारास आमदार पाटील यांचा गटनेते शारंगधर देशमुख यांना फोन आला. त्यांनी स्वाती यवलुजे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले. सौ. यवलुजे यांना सभागृह नेता प्रवीण केसरकर सूचक व स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार अनुमोदक आहेत.

उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून फारसे कोणी इच्छुक नव्हते. त्यामुळे सुनील पाटील यांचे नाव जवळपास निश्‍चित होते. असे असले तरी दुपारी साडेचारच्या सुमारास आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रा. जयंत पाटील यांना फोन करून सुनील पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले. त्यानुसार श्री. पाटील यांचा अर्ज भरण्यात आला. श्री. पाटील यांना मुरलीधर जाधव सूचक व ॲड. सूरमंजिरी लाटकर अनुमोदक आहेत. महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज भरताना काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, प्रा. जयंत पाटील आदी उपस्थित होते.

सामान्य कार्यकर्त्याला संधी
स्वाती यवलुजे या प्रभाग सहा पोलिस लाईनमधून निवडून आल्या आहेत. सौ. यवलुजे यांच्या रूपाने महापौरपदी सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक सहलीवर
महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना रात्री सहलीवर पाठविण्यात आले.

सौ. कुंभार व भोपळे यांचे अर्ज
महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे मनीषा अविनाश कुंभार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. त्यांना शेखर कुसाळे सूचक व आशिष ढवळे अनुमोदक आहेत. उपमहापौरपदासाठी तारारणी आघाडीतर्फे कमलाकर भोपळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यांना अजित ठाणेकर सूचक व सुनंदा मोहिते अनुमोदक आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना विरोधी पक्षनेते किरण शिराळे, भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम आदी उपस्थित होते.

बनछोडेंच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस सोडण्याचा आग्रह

महापौरपदासाठी डावलल्याने नाराज झालेल्या उमा बनछोडे यांची समजूत काढण्यासाठी गेलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाऱ्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कोणत्याही निवडणुकीत आपण कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. तसेच पक्ष बघून तुम्हाला भागातील नागरिकांनी मतेही दिलेली नाहीत. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी बनछोडे यांच्यासमोर धरला. सुमारे तासभर बनछोडे यांच्या समर्थकांचा गोंधळ सुरू होता. 

महापौरपदासाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये उमा बनछोडे यांचाही समावेश होता. या वेळी काँग्रेसचे नेते आपल्याला संधी देतील आणि महापौरपदासाठी आपले नाव जाहीर करतील, अशी त्यांची खात्री होती. त्यामुळे आज त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बोलावून घेतले होते. शेवटच्या क्षणी स्वाती यवलुजे यांचे नाव जाहीर झाले आणि बनछोडे समर्थकांत अस्वस्थता निर्माण झाली.

उमेदवारी नाकारल्याचे समजल्यानंतर समर्थकांनी बनछोडे यांच्या निवासस्थानी गर्दी केली. या कार्यकर्त्यांनी विश्‍वासघात करणाऱ्यांसोबत राहण्यापेक्षा पक्षाचा राजीनामा दिलेला बरा, असे म्हणत त्यांना राजीनामा देण्याचा आग्रह धरला. बनछोडे नाराज असल्याची माहिती काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना समजली. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी ते बनछोडे यांच्या घरी गेले. त्यात काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार, सभागृह नेता प्रवीण केसरकर, तसेच नगरसेवक प्रतापसिंह जाधव, राहुल माने, तौफिक मुल्लाणी, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, मधुकर रामाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, आदींचा समावेश होता.

या सर्वांना बनछोडे समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. महापौरपद देण्यास अडचण होती, तर नेत्यांनी तसे स्पष्टपणे सांगायचे होते. आम्ही मानसिक तयारी केली, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. आजपर्यंत केवळ आश्‍वासन देण्याशिवाय नेत्यांनी काहीच केले नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

काही कार्यकर्त्यांनी, शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही येथून आपणास निवडून दिले आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आपल्याला आम्ही मदत केली नाही, असे काही कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सुनावले. या वेळी गटनेते श्री. देशमुख यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अजून अडीच वर्षे आहेत. पुढे बघता येईल, असे सांगितले. यावर कार्यकर्त्यांनी तसा शब्द तुम्ही देणार काय, असा सवाल केला. यावर श्री. देशमुख यांनी शेवटी निर्णय नेते घेत असतात, असे सांगून ते निघून गेले. त्यानंतर श्रीकांत बनछोडे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत त्यांना शांत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com