गांधीनगरात वृद्धेचा स्वाईन फ्लूने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

गांधीनगर - उचगाव (ता. करवीर) येथील राधे-राधे कॉलनीमधील सौ. राणी कन्हैयालाल आहुजा (वय 60) यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. गांधीनगर बाजारपेठेस लागूनच ही कॉलनी आहे. गांधीनगर-उचगाव परिसरातील स्वाईन फ्लूचा हा दुसरा बळी आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.

राणी आहुजा यांना चार दिवसांपूर्वी वळिवडे रस्त्यावरील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथील डॉक्‍टरांनी त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात पाठविले. तीन दिवस उपचार झाल्यानंतर सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय तपासणी अहवालामध्ये स्वाईन फ्लूने त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. यावर्षी जुलै महिन्यामध्ये लता जयदेव कुकरेजा यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला होता. या परिसरातील स्वाईन फ्लूचा हा दुसरा बळी असल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. गांधीनगरला लागूनच उचगावची हद्द येते. या दोन्ही गावच्या परिसरातील अस्वच्छता, दलदल, कचऱ्याचे ढीग यामुळे असे रुग्ण निर्माण होत आहेत. ग्रामपंचायतींनी वेळीच लक्ष दिले असते तर स्वाईन फ्लूचा दुसरा बळी गेला नसता अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. उचगाव आणि गडमुडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी स्वच्छतेचा अहवाल पाठवूनही संबंधित ग्रामपंचायतींकडून स्वच्छतेबाबत दुर्लक्ष झाल्यानेच परिसरात तापाचे रुग्ण आणि स्वाईन फ्लूसारख्या आजारांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे.