मुलांतून ‘लीडर’ घडविण्यासाठी सरसावल्या शिक्षिका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

सामाजिक बांधिलकीतून उपक्रम - टाइम मॅनेजमेंटसह नकारात्मकतेवर मात करण्याचे प्रशिक्षण  
कोल्हापूर - ‘बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सिखो
मजबुरियों को मत कोसो, हर हाल मे चलना सिखो’, 

सामाजिक बांधिलकीतून उपक्रम - टाइम मॅनेजमेंटसह नकारात्मकतेवर मात करण्याचे प्रशिक्षण  
कोल्हापूर - ‘बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सिखो
मजबुरियों को मत कोसो, हर हाल मे चलना सिखो’, 

ही केवळ शायरी नसून आयुष्य बदलण्यासाठीचा एक मंत्र आहे. या शायरीच्या अर्थानुसार बदल झाला नाही तर संकटांचा डोंगर कधीच दूर होणार नाही. प्रत्येकाच्या मनातील ‘निगेटिव्हिटी’ दूर केली, तरच तो दूर होणे शक्‍य आहे. पुस्तकी शिक्षणासह ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’चे धडे देऊन बदल घडविणे सोपे आहे, असा विचार करत विद्यार्थ्यांत ‘लीडरशीप’ घडविण्याचे काम कोल्हापुरातील चार महिला शिक्षिकांकडून सुरू झाले आहे. हे शिक्षण शुल्क आकारून नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून केले जात असून ते विद्यार्थ्यांना दिले जात आहे. 

टाइम मॅनेजमेंट कसे करायचे कळत नाही? हस्ताक्षर खराब आहे? नेतृत्व कसे करायचे कळत नाही? असे एक नव्हे, अनेक प्रश्‍न विद्यार्थ्यांच्या मनात घिरट्या घालत असतात. दहाव्या वर्षांनंतर शारीरिक बदलांमुळे विद्यार्थ्यांना नक्की काय करावे, हेही नीटसे कळत नाही. कम्युनिकेशन, स्टडी याचा भावी आयुष्याच्या पातळीवर विचार केला जात नाही. त्यामुळे ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’ हा भाग दूरच राहतो. दहा ते तेरा वयोगटांतील विद्यार्थ्यांतील शारीरिक बदल लक्षात घेत इंडियन डेव्हलपमेंट फाऊंडेशनतर्फे ‘स्टुडंट्‌स लीडरशीप प्रोग्रॅम’ सुरू केला आहे. 

मुंबई व पुणे येथे तो सुरू असून, आता कोल्हापुरातही त्याचे शिक्षण सुरू झाले आहे. बिंदी देढिया, दीपा छेडा, लीना गाला, डिंपी मामानिया या फाऊंडेशनच्या कोल्हापुरातील सदस्य आहेत. त्यांनी विद्यार्थी व पालक यांच्यातील हरवत चाललेला संवाद लक्षात घेतला. विद्यार्थ्यांनी अबोल न राहता स्वत:ला व्यक्‍त करायला शिकले पाहिजे, यासाठी त्या कार्यरत झाल्या आहेत. 

सध्या छत्रपती शाहू विद्यालयातील नववीतील विद्यार्थ्यांना ‘लीडरशीप’चे धडे त्यांच्याकडून दिले जात आहेत. आठवड्यातून दोन वेळा त्या विद्यार्थ्यांना लेक्‍चर्स देतात. या लेक्‍चर्सअंतर्गत एखादी समस्या कशी सोडवायची, यासाठी एक प्रोजेक्‍ट दिला जातो. 

विद्यार्थ्यांना भविष्यातील अशा समस्या स्वत:हून सोडविणे शक्‍य व्हावे, हा यामागील उद्देश आहे. याबाबत लीना गाला म्हणाल्या, ‘‘आमचा अभ्यासक्रम इंग्रजीत असून, तो मराठीत केला जात आहे. एका शाळेत साधारणपणे बारा व्याख्याने घेणार आहोत. विद्यार्थ्यांत नेतृत्व विकास घडविण्यासाठीचा हा आमचा एक प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांतील न्यूनगंड दूर केला तरच त्यांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे. मराठी शाळांमध्येसुद्धा आमची लेक्‍चर्स घेणार आहोत.’’