सकाळी हुडहुडी, दुपारी तडाखा

सकाळी हुडहुडी, दुपारी तडाखा

कोल्हापूर - यंदा कोल्हापूर परिसरात मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सकाळी धुके, थंडी आणि रात्री तीव्र गारठा, तर दुपारी उन्हाचा  ‘तडाका’ असे विचित्र वातावरण आहे. १९ जानेवारीपर्यंत अचानक थंडी गायब झाली होती. ही थंडी १९ जानेवारीनंतर पुन्हा सक्रिय झाली. यामुळे फेब्रुवारीतील तापमान हे ३२ ते ३४ अंशापर्यंत राहिले.

होळीचा सण झाला तरी लांबलेल्या थंडीमुळे सकाळी अन्‌ संध्याकाळी वातावरण आल्हाददायक राहिले; मात्र २३ मार्चनंतर उन्हाचा तडाखा वाढायला सुरवात होऊन तुलनेने यावर्षीचा उन्हाळा कडकच राहील, असे हवामानतज्ज्ञांनी सांगितले, तर भारतीय हवामान खात्यानेही प्रसारित केलेल्या परिपत्रकात हा ‘कडक’ उन्हाळ्याचा अंदाज वर्तविला आहे. 

असा राहील यंदा उन्हाळा
ॲक्‍युवेदरवरील नोंदीनुसार, यावर्षी मार्चमधील तापमान हे ३६,३७,३८ अंश कमाल, तर किमान १८ ते २२ अंशापर्यंत राहील. ११ आणि १२ मार्चला मात्र तापमान ४० अंशापर्यंत जाऊ शकते.  १ आणि २ मार्चला तापमान हे ३४ ते ३५ अंश होते. म्हणजेच कडक उन्हाळ्याची मार्च म्हणजे, ‘ट्रायल’ राहील. १ ते ९ एप्रिलला तापमान ३८ अंश कमाल, तर किमान २० ते २२ अंश राहील. दोन एप्रिलला मात्र ४० अंशापर्यंत तापमान जाईल. ११ ते १६ एप्रिल दरम्यान तापमान ३९ अंश, तर १७ ते ३० एप्रिलला तापमान हे ३८ ते ३९ अंश राहील. एक ते १३ मे दरम्यान ३९ अंश तर १४ ते १९ दरम्यान ३६,३७,३८ अंश तापमान असेल. तापमानाची ही ‘रेंज’ ३१ मेपर्यंत राहील.

दोन ते चार वर्षे कोल्हापूर परिसरात होळी येईपर्यंत तीव्र उन्हाचा झळांनी लोक त्रस्त होत असत. यंदा मात्र लांबलेल्या थंडीने होळी आल्हाददायक जाणवली. असे असले तरी, कडक उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य जपले पाहिजे. विशेषत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यानंतर उन्हाची वाढणारी तीव्रता आणि हवेतील आर्द्रतेच्या वाढत्या प्रमाणामुळे दुपारी टोपी, फूल पांढरे शर्ट, गॉगल, चामड्याचे चप्पल घालावे, पाणी भरपूर प्यावे, असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला. 

२०१७ मधील कोल्हापुरातील उन्हाळा
जानेवारीत ३४ ते ३७ अंश, तर फेब्रुवारीत ३२ ते ३९ अंशापर्यंत तापमान होते. मार्चमध्ये ३२ ते ३४ अंश तापमानाची नोंद झाली. म्हणजेच, जानेवारी आणि फेब्रुवारी महिना हा तुलनेने ‘हॉट’ राहिला. मार्चमध्ये तापमान हे सर्वसाधारण राहिले; मात्र मार्चच्या शेवटच्या आठवड्यानंतर उन्हाचा तडाखा वाढून तो पूर्ण एप्रिल, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राहिला. हवामान तज्ज्ञ डॉ. साबळे म्हणाले, ‘‘उन्हाळ्यासाठी मार्चचा पहिला आठवडा हा महत्त्वाचा राहतो. यावरच मॉन्सूनचे आगमन लवकर की उशिरा हे समजते. शिवाय उन्हाळा कडक राहील, की सर्वसाधारण राहील, हे ही समजते.’’ २०१७ मध्ये मार्चमधील तापमान सर्वसाधारण राहिल्याने मॉन्सून जून, जुलैमध्ये लांबला. उन्हाळा आणि मॉन्सूनचे हे असे गणित असते.  

भारतीय हवामान खात्याचा अंदाज
यंदाचा उन्हाळा देशात तीव्र असेल. सरासरी तापमानात यावर्षी एक डिग्री सेल्सिअसने वाढ होईल, असे पत्रक भारतीय हवामान खात्याने प्रसिद्ध केले. मार्च ते मे महिन्यात उष्णता खूप वाढेल. उत्तर-पश्‍चिम आणि मध्य भारतातील तापमानात एक अंशांची भर पडेल. पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरयाना, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल, ओरिसा, तेलंगणा, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात जास्तीत जास्त तापमानामुळे उष्ण लहरी वाहतील. ग्रीड बिंदू तापमानाची शक्‍यता ही ५२ टक्के असेल. एकूणच दक्षिण-पश्‍चिम आणि उत्तर-पश्‍चिम विभागातील उन्हाळा हा तीव्रच राहील, तर सरासरी कमाल तापमान हे सामान्यापेक्षा अधिक गरम जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरयाना-चंदीगड-दिल्ली, हिमाचल प्रदेश, पूर्व आणि पश्‍चिम राजस्थान, उत्तराखंड, पूर्व आणि पश्‍चिम उत्तर प्रदेश, पूर्व आणि पश्‍चिम मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, विदर्भ, गुजरात, अरुणाचल प्रदेशात राहील. यावर्षी केरळ, तमिळनाडू, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा भागातील तापमानात ०.५ अंशाने घट होईल. उपविभागातील जास्तीत जास्त तापमानानील विसंगती ही ०.५ ते एक अंश राहील.   

यंदा मार्चचा पहिला आठवडा हा तुलनेने उष्ण राहिला. एकअर्थाने उन्हाळ्याची ही चांगली सुरवात झाली. अर्थातच, हे चांगल्या मॉन्सूनसाठी सुचिन्ह मानावे लागेल. यंदा उन्हाळा अतिशय कडक असेल. यामुळे मॉन्सूनचे आगमनही वेळेवर होईल. कोकणातील भिरा येथील आताचे तापमान हे ४० ते ४१ अंश आहे. हे तापमान ४४ अंशापर्यंत जाऊ शकते, तर अकोला, चंद्रपूरचे तापमान हे ४५ अंशापर्यंत जाईल. मालेगावचे तापमानही ४२ अंशांच्या पुढे जाईल.२३ मार्चनंतर उन्हाळा तीव्र होत जाईल. एप्रिलचा शेवटचा आठवडा उष्ण राहील.
- डॉ. रामचंद्र साबळे, 

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ

कडक उन्हाचे परिणाम
डोळे : सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे डोळ्यातील मॅक्‍युलर झीन, नेत्रावरणात पारपटलाच्या कडेवर लहान गेळ्यांची उत्पत्ती, पंखासारखे त्रिकोणी पटल निर्माण होणे, फोटोकेरायटीसीसमुळे काही काळ अंधत्व येऊ शकते. अनेक डोळ्यांचे विकारही उद्‌भवतात. अतिनील किरणांमुळे २० टक्के केसेसमध्ये अंधत्व येते किंवा अतिशय धुसर दिसते, असे सिद्ध झाले आहे. मेलानोमा नामक त्वचेचा कर्करोगही डोळ्यात उत्पन्न होतो. यासाठी डोळ्यांच्या संरक्षणासाठी विविध सनग्लासेस, गॉगल्सचा वापर करावा, असे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले. 

त्वचा : अतिनील किरणांच्या प्रभावामुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. याशिवाय त्वचेखालील पेशी, जनुकेही नष्ट होतात. त्वचादाह, त्वचेवर पुरळ उठणे, कंड सुटणे, भाजून निघणे, त्वचा लाल, काळी होते. मेलानीनचे प्रमाण कमी होऊन त्वचेवर सुरकुत्या पडतात. त्वचा वृद्ध दिसू लागते. यासाठी दुपारी थेट उन्हात फिरणे टाळावे, टोपी, पूर्ण बाह्याचे पांढरे कपडे वापरावेत. 

सनस्ट्रोक : तीव्र डोकेदुखी, अतितहान लागणे, हृदयाची धडधड वाढणे, स्नायू आखडणे, चक्कर येणे आदी सनस्ट्रोकमुळे होऊ शकते. हृदयविकार, मूत्रविकार, मधुमेह, रक्तदाब, अल्कोहोलीझम, मानसिक विकार, वजन अतिकमी असणे किंवा अतिजास्त असणे अशा लोकांनी थेट कडक उन्हात जाणे टाळावे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com