गजानन महाराजनगरात दागिन्यांसह दोन लाखांचा ऐवज केला लंपास

गजानन महाराजनगरात दागिन्यांसह दोन लाखांचा ऐवज केला लंपास

कोल्हापूर - शहरात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. गजानन महाराजनगर परिसरातील घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्याने त्यातील तीन तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाखांचा ऐवज लंपास केला. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली. याबाबतची फिर्याद शामराव बाळकू पाटील (वय ६२) यांनी दिली. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती, गजानन महाराजनगर येथील सिंधूनगरीत प्लॉट नंबर ४ मध्ये शामराव बाळकू पाटील (वय ६२) राहतात. ते शिक्षण उपसंचालक कार्यालयात वरिष्ठ लिपिक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. ते पत्नी, मुलगा तुषार सोबत राहतात. त्यांचे दुमजली घर आहे.

मंगळवारी रात्री ते तळमजल्यावरील दोन खोल्यांना बाहेरून कुलूप लावून वरच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. परिसरात एकाचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी येथील मुले रात्री उशिरापर्यंत जागीच होती. मध्यरात्री चोरट्याने त्यांच्या बंद दाराचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यांने बेडरुममधील तिजोरी फोडून त्यातील अडीच तोळे वजनाच्या सहा अंगठ्या, चांदीच्या मूर्ती आणि ५० हजाराची रोकड असा सुमारे दोन लाखाचा ऐवज लंपास केला. फिरायला जाण्यासाठी पाटील पहाटे साडेचारच्या सुमारास उठले. जिन्यातून येताना त्यांना खालच्या खोलीतील बल्ब सुरू असल्याचे लक्षात आले. घरात कोणीतरी चोरटे आले, असा त्यांचा समज झाला. ते घाबरले. त्यांना चक्कर आली. ते तसेच वरच्या खोलीत गेले. त्यांनी पत्नी व मुलाला उठवले. मुलगाही घाबरला. त्यालाही चक्कर आली. त्या दोघांच्या पाटील यांच्या पत्नीने सावरले. त्यानंतर ते तिघे खाली आले. त्यावेळी त्यांना घराचा कडीकोयंडा उचकटलेला दिसला. त्यांनी परिसरातील नागरिकांना हाका मारून उठवले. त्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर याची माहिती नागरिकांनी परिसरात राहणारे पोलिस कर्मचारी रमेश घाटगे यांना दिली. त्यांनी याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक निशिकांत भुजबळ यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक दाखल झाले.

त्यांनी ठसेतज्ज्ञांनाही पाचारण केले. शहर परिसरात गेल्या दोन महिन्यात सुरू असलेले घरफोडीचे सत्र पंधरा दिवसापूर्वी बंद झाले होते. मात्र काल देवकर पाणंद आणि आज गजानन महाराजनगरात झालेल्या चोरीमुळे चोरटे पुन्हा सक्रिय झाले की काय? अशी शंका व्यक्त केली जात असून नागरिकांत याबाबत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हळद काढण्यासाठी आणल्या दोन अंगठ्या -
पाटील यांच्या घरात अर्धातोळ्याच्या चार अंगठ्या होत्या. नुकतेच दुसऱ्या मुलीचेही लग्न झाले होते. दोन्ही जावयांची हळद काढण्यासाठी त्यांनी दोनच दिवसापूर्वी आणखी दोन अंगठ्या खरेदी केल्या होत्या. घरखर्चासाठी पेन्शनमधील दहा हजाराची रोकडही काढून आणली होती. चोरट्यांने त्या सर्वावर डल्ला मारल्याचे पाटील यांच्या पत्नीने सांगितले. 

तीन ते चार साथीदार
चोरट्याने शेजारील घरांना बाहेरून कड्या घातल्या होत्या. परिसरातील एका बंगल्यातील कुत्र्यांचे भुंकणे सुरू होते. ते पाहण्यासाठी एक महिला बाहेर आली. त्यावेळी तिला रस्त्यावर पाठमोरे दोन व्यक्ती उभे असलेले दिसले. त्यामुळे चोरटा एकटा नसून त्याचे तीन चार साथीदार असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com