टिंबर मार्केटमधील अतिक्रमणे उद्‌ध्वस्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

अतिक्रमण हटवताना भाजी विक्रेत्यांचा पोलिस, अधिकाऱ्यांशी वाद

कोल्हापूर  - टिंबर मार्केट भाजी मंडई येथे कारवाई करताना भाजी विक्रेत्यांनी तीव्र विरोध केल्याने प्रशासन आणि भाजीविक्रेते यांच्यात संघर्ष निर्माण झाला. पोलिसांसमोरच हा संघर्ष सुरू होता. त्यामुळे गुरुवारी दुपारी दोन तास येथे तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी विरोध करणाऱ्या मनसेच्या राजू जाधव यांच्यासह काही कार्यकर्त्यांना  ताब्यात घेतल्यानंतर प्रशासनाने अतिक्रमणे उद्‌ध्वस्त केली. 

अतिक्रमण हटवताना भाजी विक्रेत्यांचा पोलिस, अधिकाऱ्यांशी वाद

कोल्हापूर  - टिंबर मार्केट भाजी मंडई येथे कारवाई करताना भाजी विक्रेत्यांनी तीव्र विरोध केल्याने प्रशासन आणि भाजीविक्रेते यांच्यात संघर्ष निर्माण झाला. पोलिसांसमोरच हा संघर्ष सुरू होता. त्यामुळे गुरुवारी दुपारी दोन तास येथे तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी विरोध करणाऱ्या मनसेच्या राजू जाधव यांच्यासह काही कार्यकर्त्यांना  ताब्यात घेतल्यानंतर प्रशासनाने अतिक्रमणे उद्‌ध्वस्त केली. 

प्रशासनाने विक्रेत्यांना नियमाप्रमाणे चार बाय चारची जागा दिली आहे. भाजी विक्रेत्यांनी त्यापुढेही अतिक्रमणे केल्याने प्रशासनाने ही कारवाई केली. महापालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालय, अतिक्रमण विभाग व इस्टेट विभागाने आज ही संयुक्त कारवाई केली.  टिंबर मार्केट भाजी मंडई व परिसरातील ५० अतिक्रमीत शेड, टपऱ्या हटविण्यात आल्या. 

विभागीय कार्यालय क्र.१, गांधी मैदान विभागीय कार्यालयामार्फत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत आज दुपारी  दीड वाजता टिंबर मार्केट भाजी मंडई येथे कारवाईला सुरवात झाली. कारवाई करताना भाजी विक्रेत्यांनी तीव्र विरोध केल्याने या ठिकाणी तणाव निर्माण झाला.

महापालिका प्रशासन आणि भाजीविक्रेते, असा हा संघर्ष सुमारे दोन तासाहून अधिक काळ सुरू होता.गांधी मैदान विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंते रमेश मस्कर यांनी या परिस्थितीची माहिती आयुक्तांना दिली. त्यांनतर येथे जादा पोलिस बंदोबस्त मागवून कारवाई करण्याची सूचना आयुक्तांनी दिली. त्यानुसार जादा पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. कारवाईला विरोध करणाऱ्या गटाचे नेतृत्व करणाऱ्या मनसेच्या राजू जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर कारवाई पुन्हा सुरू झाली. जाधव यांच्यासह शंभर ते दीडशे जणांचा भाजीविक्रेत्यांचा गट कारवाईला विरोध करत होता.

या कारवाईत भाजी मंडईतील अतिक्रमणे हटविण्यात आली. तसेच क्रशर चौकातील विनापरवाना चायनीज स्टॉल हटविण्यात आला.  त्याचबरोबर दिवसभरात राजकपूर पुतळा, क्रशर चौक, सानेगुरुजी- राधानगरी रोड, देवकर पाणंद चौक, टिंबर मार्केट, भाजी मंडई या परिसरातील एकूण ५० डिजिटल होर्डिंग व विद्युत पोलवरील ७५ बॅनर्स हटविण्यात आले. या वेळी राजवाडा पोलिस ठाण्यातर्फे मोठा पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आला होता.
अतिक्रमण कारवाई उपशहर अभियंता रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता संजय नागरगोजे, सुनील भाईक, सागर शिंदे, इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख पंडित पोवार यांचे मार्गदर्शनाखाली पवडी, इस्टेट, विद्युत व अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी यांनी ही कारवाई केली. 

दरम्यान, शहरातील अतिक्रमणाविरोधात कारवाई चालू राहणार असून संबंधितांनी विनापरवाना डिजिटल बोर्ड, बॅनर व अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

भाजी मंडईला विरोध नाही, नियमाप्रमाणे बसावे : रमेश मस्कर 
उपशहर अभियंता रमेश मस्कर यांनी कारवाईला विरोध करणाऱ्या भाजी विक्रेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाचा मंडईला विरोध नाही. व्यापाऱ्यांनी नेमून दिलेल्या चार बाय चारच्या जागेतच बसावे. त्या बाहेर आलेली शेड व अन्य अतिक्रमणे काढणे हे प्रशासनाचे कामच आहे, असे मस्कर यांनी सांगितले.

महिलेने फेकला अधिकाऱ्यांवर दगड
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू असताना संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्या महिलेने महापालिकेचे अधिकारी व पोलिस यांच्या अंगावर मोठा दगड फेकण्याचा प्रयत्न केला. या वेळी महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतली. तरीही ही महिला मी येथेच बसणार, असे सांगून अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत होती.