उदासीबुवाचा माळ, ते छत्रपती राजाराम महाराज विमानतळ

उदासीबुवाचा माळ, ते छत्रपती राजाराम महाराज विमानतळ

कोल्हापूर - उदासीबुवाचा माळ... उजळाईदेवीवाडी ते आता छत्रपती राजाराम महाराजांच्या नावाने कोल्हापूर विमानतळ ओळखला जाणार आहे. साधारण ७८ वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या भविष्याचा विचार करून खुद्द राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत या विमानतळाचे काम पूर्ण झाले. राजाराम महाराजांच्याच हस्ते उद्‌घाटन झालेल्या या विमानतळावरून पहिले विमान आकाशात झेपावले.

आज या विमानतळास राजाराम महाराजांचेच नाव दिले आणि या विमानतळाच्या इतिहासाचे एक दडलेले पान पुन्हा नव्या पिढीसमोर उलगडले. आता जिथे विमानतळ आहे, ती जागा म्हणजे सरनोबतवाडी, मुडशिंगी आणि तामगाव यांना जोडणाऱ्या उदासीबुवाच्या माळाची जागा. या जागेवर काही सतपुरुषांच्या समाध्या एका ओळीत. जवळच मारुतीचं छोटंसं मंदिर. माळ एवढा विस्तीर्ण की लांब अंतरावर चरत असलेलं शेरडूही स्पष्ट दिसायचं. 

श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी या माळावर जत्रा भरायची आणि गोसाव्यांचे जथ्थेच्या जथ्थे येथे यायचे. रुद्राक्षाच्या वाटपाचा विधी येथे व्हायचा आणि एकदा गोसाव्यांचे जथ्थे या माळावरून गेले, की या माळावर फक्त भन्नाट वाराच राज्य करायचा. 

कोल्हापुरात शाहू महाराजांनी रेल्वे आणून दळणवळणाचा मोठा टप्पा पूर्ण केला होता. त्यात राजाराम महाराजांनी विमानतळाचा प्रकल्प हाती घेतला. १९३० ते ३५ च्या दरम्यान विमानतळाचं काम सुरू झालं. सुरुवातीला १७० एकर जमीन ताब्यात घेतली. असं सांगतात की, सक्तमजुरीची शिक्षा झालेल्या कैद्यांना विमानतळाच्या कामावर आणले जायचे. 

त्या काळात सिंगल इंजिन व्हिंटेज टाईप एअरक्राफ्ट असे तीन आसनी विमान होते. विमानाला पंख्यावर दुसरा पंखा असे दोन पंखे होते. ब्रिटिश अधिकारी व संस्थानिकच अशी विमाने वापरत होते. तारखेबद्दल अनिश्‍चितता आहे; पण चार मे १९४० रोजी राजाराम महाराजांच्या हस्ते विमानतळाचे उद्‌घाटन झाले. ‘सिटी ऑफ भावनगर’ हे विमान विमानतळावरून अवकाशात झेपावले. उजळाईदेवीच्या परिसरातील माळावरील विमानतळ म्हणून ते उजळाईवाडी विमानतळ म्हणूनच ओळखले जाऊ लागले. अर्थात या विमानतळावरून विमानाचे नित्य उड्डाण फारसे झाले नाही. 

१९७८-७९ साली विमानतळासाठी पुन्हा जागा संपादित केली. विमानतळावरील एका छोट्याशा कौलारू इमारतीतून त्या-त्या परिस्थितीत विमानतळाचे व्यवस्थापन चालत होते. आता धावपट्टी मोठी झाली. कोल्हापूर-मुंबई व मुंबई-कोल्हापूर विमान सेवा दहा वेळा सुरू झाली; पण या विमानसेवेत सातत्य राहिले नाही. किंबहुना विमानतळ अधिक काळ बंद अवस्थेतच राहिले. विमानतळाचा परवाना रद्द झाला. अलीकडे तो पुन्हा मिळाला; पण विमानसेवेचा मुहूर्त कायम हुकत गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com