जीएसटी विरोधात मुंबईत मोर्चा काढू - उद्धव ठाकरे

जीएसटी विरोधात मुंबईत मोर्चा काढू - उद्धव ठाकरे

कोल्हापूर - जीएसटी विरोधात थेट सरकारवर हल्लाबोल करण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली. व्यापारी उद्योजकांवर अन्यायबाबत मुख्यमंत्र्यांशी लोकशाही मार्गाने बोलून त्यातून मार्ग निघाला तर ठीक अन्यथा व्यापारी उद्योजकांसह मुंबईत मोर्चा काढू. त्याचे नेतृत्व आपण स्वतः करू अशी ग्वाही त्यांनी दिली. 

कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी व उद्योजकांशी ठाकरे यांनी आज सकाळी संवाद साधला. केंद्र आणि राज्य सरकार विरोधात उघड भुमिका घेत आपल्याला जे पटणार नाही ते स्पष्टपणे बोलत राहीन असेही त्यांनी सांगितले. व्यापारी उद्योजकांनी जीएसटीमुळे कंबरडे मोडले असून यातील तरतुदी अन्यायकारक असल्याचे सांगितले. वीज उत्पादनाचे तंत्रज्ञान बदलण्यापेक्षा जुनेच तंत्र वापरून वीजनिर्मिती केली जाते. पर्यायाने उद्योजकांना महागड्या दराने वीज मिळते. अशीही तक्रार उद्योजकांनी केली. 

सर्वांचे म्हणणे ऐकल्यानंतर ठाकरे यांनी आक्रमकपणे भुमिका मांडली. ते म्हणाले. गुजरातची निवडणूक नसती तर जीएसटी कमी झाला असता का. तेथील व्यापारी एकत्रित येतात मग तुम्ही का नाही एकत्रित येत? जीएसटीच्या विरोधात पहिल्यांदा शिवसेनेने भुमिका घेतली. हेतू चांगला असला तरी, पण आकारण्याची पद्धत वाईट आहे. तुम्ही दबलात तर संपलात. तुम्हाला चटके बसत असतील तर ते सहन करू नका.  विदर्भ मराठवाड्यात गेल्यानंतर तेथेही उद्योजकांशी चर्चा करेन. 

तुमचा माझ्यावर गाढ विश्‍वास आहे त्यास तडा जाऊ देणार नाही असे सांगून ठाकरे म्हणाले. फार मोठ्या विश्‍वासाने मोदींच्या हाती सत्ता दिली होती. गेली साठ वर्षे कॉंग्रेस एके क्रॉंग्रेस करून लोक कंटाळले होते. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह हे काही देशाचे चेहरा होऊ शकत नाहीत. देश भरकटत असताना मोदींचा चेहरा बरा वाटला. वाटले देश अधोगतीकडून प्रगतीकडे जाईल. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी येथे आलो तेव्हा रामदेवबाबा सोबत होते. आता रामदेवबाबा उद्योजक झाले आणि खऱ्या उद्योजकांना रडायची वेळ आली आहे.

राज्यकर्ते बदलले की धोरणेही बदलतात असे सांगून ते म्हणाले. राजीव गांधी यांनी पंचायत राज व्यवस्था आणली. स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायतत्ता दिली. यांनी ही स्वायतत्ता मोडून काढली. अध्यक्षीय लोकशाहीकडे देशाची वाटचाल होती की, काय अशी सघ्याची परिस्थिती आहे. एका बाजूला कारभार शून्य असताना निवडणूक जिंकलीच पाहिजे यासाठी उद्योग सुरू आहेत. 

मुंबईच्या जकातीला मी अजिबात हात लावू दिला नाही. मराठी माणसाची राजधानी असलेली मुंबई भिकाऱ्यासारखी कुणाच्या दारात नाही उभी राहणार? माझ्यासारख्या अडाण्याला कळले पण जे शहाणे होते त्यांना नाही कळले की आपल्याच खिशातील पैसे जाणार आहेत म्हणून? , असेही ठाकरे म्हणाले.

चीनमध्ये सरकारच्या विरोधात बोलले की दोन दिवसात ती व्यक्ती अदृष्य होते. आधार कार्ड लिंकिंग सुरू आहे, तो काय प्रकार आहे. पाच दहा वर्षांनी आपलाही चीनच होणार आहे. कुठे व्हायचे तेथे होऊ दे पण शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडू देणार नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले.

सरकार हे नवसाचे पोर 
सध्याचे सरकार हे नवसाच पोर आहे. असे पोर असले की आपण त्याचे फार लाड करतो. पण हेच पोर आता उडाणटप्पू निघालय, त्याला तू बिघडलास असे म्हणण्याची धाडस आहे का? अशी विचारणा ठाकरे यांनी केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com