सहा आमदार दिले, मंत्रिपद कधी?

सहा आमदार दिले, मंत्रिपद कधी?

कोल्हापूर - मोदी लाटेतही दहापैकी सहा आमदार कोल्हापूरने शिवसेनेला दिले. मुंबईनंतर सर्वाधिक आमदार देणारा हा जिल्हा असे संपर्कप्रमुखांनी कालच सांगितले. आमदार दिले; पण कोल्हापूरच्या वाट्याला मंत्रिपद केव्हा, असाच प्रश्‍न आमदारांसह जिल्ह्याला पडला आहे.

भाजप सरकारचा जेमतेम दोन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक राहिला आहे. यात मंत्रिपदाची लॉटरी लागली तर ठीक, अन्यथा पुन्हा संधी मिळणार नाही. आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान द्यावे, अशीच मागणी सहाही आमदारांची आहे. मंत्रिपद कुणालाही मिळू दे; पण एकदा शिवसेनेचा मंत्री म्हणून कोल्हापूरच्या वाट्याला पद येऊ दे, असाही सूर आहे. 
लोकसभा निवडणूक लागली की, प्रत्येकाला वेध लागतात, ते शिवसेनेकडून लढण्याची. विक्रमसिंह घाटगे या भगव्या लाटेवरच स्वार झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांना पावणेसहा लाखांवर मते पडली, ती केवळ शिवसेनेच्या पुण्याईने, कोल्हापूर उत्तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. दिवंगत दिलीप देसाई पहिल्यांदा आमदार झाले. नंतर सुरेश साळोखे यांनी दोन टर्म पूर्ण केल्या आणि आता राजेश क्षीरसागर त्यांची दुसरी टर्म पूर्ण करत आहेत. 

हातकणंगले हा राखीव मतदारसंघ पहिल्यांदा काँग्रेसचा आणि नंतर जनसुराज्यचा बालेकिल्ला, आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी बालेकिल्ल्याला खिंडार पाडून ते दुसऱ्यांदा विजयी झाले. शिरोळही काँग्रेसच्या ताब्यात. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई करणारे उल्हास पाटील शिवसेनेच्या हाताला लागले. आमदारकीचा कुठलाही थाट नाही, अगदी पूर्वी जसे होते, तसा आपल्यातील हाडाचा कार्यकर्ता जिवंत ठेवून आमदार उल्हास पाटील यांनी दबदबा राखला आहे.

राधानगरी-भुदरगडचे राजकारण ठराविक नेत्यांच्या भोवती घुटमळत राहिले. सामान्यातील सामान्य माणूस स्वतःजवळचे पैसे देऊन एखाद्या कार्यकर्त्याला कसा निवडून आणू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे पाहता येईल. आबिटकर यांनी भल्याभल्यांना घाम फोडला आणि राष्ट्रवादीच्या हक्काच्या मतदारसंघात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट केली. चंदगड असा तालुका आहे, तो नेहमी सेनेच्या पाठीशी राहिला. प्रा. मंडलिकांना पहिल्यांदा मताधिक्‍य याच तालुक्‍यातून मिळाले. 

करवीर विधानसभा म्हटले, की पुन्हा काँग्रेस; मात्र आमदार चंद्रदीप नरके यांनी सलग दोन वेळा ‘करवीर’चा गड सर केला. राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि अमुक एक नेता म्हणेल तीच पूर्व दिशा, असा समज नरके यांनी मोडून काढला. दोन्ही निवडणुकीत तरुणांची फौज आणि शिवसेनेची जादू काय करू शकते, हेच मतदारसंघाने दाखवून दिले. पन्हाळा-शाहूवाडीत सत्यजित पाटील (आबा) यांनी मागच्या वेळी आमदारकी खेचून आणली. जनसुराज्यसारखी मोठी शक्ती समोर असताना आबांनी सनसनाटी विजय मिळविला.

शहराच्या प्रत्येक प्रश्‍नावर पोटतिडकीने भांडणारे आमदार म्हणून राजेश क्षीरसागर यांची ओळख आहे. अंबाबाई मंदिरातील पुजारी हटावचा लढा यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. त्यात क्षीरसागर यांचा मोठा वाटा आहे. शहरातील तालीम मंडळे आणि तरुणांशी असलेला संपर्क वाखाणण्यासारखा आहे.

बाळासाहेबांचा झंझावात आजही कायम 
काँग्रेस- राष्ट्रवादीचा काळ असो अथवा सध्याचा भाजपचा बोलबाला, कोल्हापूर जिल्ह्याने शिवसेनेला कधीही अंतर दिले नाही. त्यामागे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची असलेली जादू हे एकमेव कारण आहे. १९८० ते ९० या काळात बाळासाहेबांनी जो झंझावात निर्माण केला, तो आजही कायम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com