आता मुख्यमंत्री शिवसेनेचाच - उद्धव ठाकरे

आता मुख्यमंत्री शिवसेनेचाच - उद्धव ठाकरे

कोल्हापूर / कुडित्रे - लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका केव्हा आणि कशा व्हायच्या तशा होऊ देत; पण या खेपेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुडित्रे येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले. त्यांनी यानिमित्ताने आगामी निवडणुकीत शिवसेनेची भूमिका काय असेल, हेच स्पष्ट केले. 

कुंभी कासारी साखर कारखान्याचा या हंगामातील साखर पोती पूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्यात श्री. ठाकरे बोलत होते. श्री. ठाकरे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका करताना मी सत्तेत असलो तरीही सरकारचे गोडवे गाणार नाही. जे चुकीचे आहे, त्यावर मी बोलणारच, असे स्पष्ट करत नोटाबंदी, जीएसटी, कर्जमाफी अशा कोणत्याच निर्णयाचा लाभ जनतेला झालेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. कारखान्याच्या मैदानावर झालेल्या मेळाव्याला हजारो शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत उपस्थितांनी त्यांच्या भाषणाला दाद दिली. 

निवेदनांचा पाऊस... विकासाचा दुष्काळ
श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘हे सरकार येऊन तीन वर्षे झाली. शिवसेनेने केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावर या सरकारला पाठिंबा दिला होता. तीन वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र आणि आताचा महाराष्ट्र काय आहे, हे जाणून घेण्यासाठी मी हा दौरा सुरू केला आहे. शेतकरी, कामगार, उद्योजक, व्यापारी या सर्व घटकांशी भेटलो, चर्चा केली. या वेळी माझ्याकडे निवेदनांचा पाऊस पडला. जेव्हा असा निवेदनांचा पाऊस पडतो; तेव्हा नक्कीच विकासकामांचा दुष्काळ असतो. त्यामुळे होय, या सरकारवर मी नाराज आहे. त्यांच्या कामावर मी अजिबात समाधानी नाही. सत्तेत सहभागी असलो तरी सरकार जेथे चुकेल तेथे मी बोलणारच. सरकारने जी आश्‍वासने दिली, त्यापैकी एकही आश्‍वासन पूर्ण नाही. शेतकरी कर्जमुक्त झालाच नाही. प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख काय, पंधरा पैसेही जमा नाहीत. शेतकऱ्याला वीज मिळत नाही.’’

ते म्हणाले, ‘‘मुलगी शिकली, की कुटुंब सुशिक्षित असे म्हटले जाते; पण विदर्भ- मराठवाड्यात शाळेत जायला एसटीसाठी पैसे नाहीत, म्हणून स्वाती पितळेवर आत्महत्या करायची वेळ येते; तेव्हा हाच का फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र, असा प्रश्‍न पडतो.’’ ते म्हणाले, ‘‘हे सर्व बदलायला हवे. ही घटना घडल्यानंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना सांगून मी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवासाची योजना केली. मुंबईत देखील अशी योजना सुरू केली. अशा प्रकारच्या लोकोपयोगी योजना करायला हव्यात. या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफीची योजना सुरू केली. महिने होऊन गेले; पण शेतकऱ्यांच्या कर्जापैकी एक छदामही कर्ज कमी झाले नाही. नुसत्या घोषणा करणार असतील तर या सरकारची मी काय आरती ओवाळू? मग काँग्रेस आणि भाजपमध्ये फरक तरी काय?’’ 
प्रास्तविकात आमदार चंद्रदीप नरके यांनी कारखान्याची पार्श्‍वभूमी सांगितली. ते म्हणाले, ‘‘सुरुवातीच्या काळात केवळ प्रतिदिन निव्वळ एक हजार टन गाळप होते. आज साडेचार हजार टनापर्यंत पोहचले आहे. कारखान्याने अत्यंत कमी किमतीत सहवीज प्रकल्प उभा केला. आम्ही उसाला प्रतिटन ३१०० रुपये दर जाहीर केला आहे.’’ सर्वश्री अजित नरके, दादा लाड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. व्यासपीठावर पाटबंधारे राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार विनायक राऊत, खासदार गजानन किर्तीकर, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, आमदार सत्यजित पाटील- सरुडकर, आमदार सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, संग्राम कुपेकर उपस्थित होते.

सरकार कोण चालवतंय? 
मुख्यमंत्र्यांनी वीज बिल कमी करण्यासंदर्भात आदेश दिलेल्या कागदावर एक वर्ष झाले तरीही निर्णय झाला नाही. मग सरकार कोण चालवतंय, अशी टीका श्री. ठाकरे यांनी केली.

मतपत्रिकेद्वारेच मतदानाचा आग्रह
‘‘उत्तर प्रदेशमध्ये ईव्हीएम मशीनचा घोटाळा उघडकीस आला. एकाने बसपला मतदान केले; पण हे मत भाजपच्या खात्यावर गेले कसे, यावरून गोंधळ सुरू आहे. निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शकच हवी. एरवी अनेक बाबतीत आपण पाश्‍चात्त्यांचे अनुकरण करतो. पाश्‍चात्त्य देशांतही निवडणुका या बॅलेट पेपरवरच होतात. त्यामुळे निवडणुकीत पारदर्शकता आणायची असेल तर येथेही निवडणुका बॅलेट पेपरवरच व्हाव्यात’’, असेही श्री. ठाकरे या वेळी म्हणाले.

शेतकऱ्यांना वाचविणे हेच खरे हिंदुत्व
गोमातेला वाचविणे हे हिंदुत्व आहेच; पण आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यालाही वाचविणे म्हणजेच हिंदुत्व आहे, असे सांगून श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘गोमातेबाबत भाजपची भूमिका दुटप्पी आहे. हा पक्ष गाईला महाराष्ट्रात माता मानायला लावतो; तर मग गोव्यात गोमांस कमी पडणार नाही, असे या पक्षाचे मंत्री सांगतात. असा फरक का केला जातो? भाजपचे हे हिंदुत्व म्हणजे थोतांड आहे. त्यावर लाथ मारा.’’

साखर उद्योगासाठी पुढाकार घ्या
आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, ‘‘हे सरकार मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्रच्या नावाखाली परदेशी कंपन्यांना पायघड्या घालत आहे; पण इथला साखर उद्योग जो शेतकऱ्यांनी स्व-हिमतीवर उभा केला आहे, तो आज ढासळण्याच्या स्थितीत आहे. मात्र हे सरकार उद्योग सावरण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आता आपणच यामध्ये पुढाकार घ्यावा.’’

त्या सचिवाला पाण्यावर जुपा
शेतकऱ्याला केवळ रात्रीच्या वेळी आठ तास वीज पुरवठा केला जातो. पाणी पाजताना शेतकऱ्यांना जीव धोक्‍यात घालावा लागत आहे. रात्रीच्या वेळी गवा हल्ला करण्याची शक्‍यता असते. शेतकऱ्यांना सर्पदंश होतो. रात्री शेतकऱ्यांना पाणी पाजायला लावण्याची टूम काढणाऱ्या त्या सचिवालाच आता पाण्यावर जुपा, अशी मागणीही आमदार नरके यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com