माणुसकीचाही झाला कचरा...

सुधाकर काशीद
बुधवार, 4 एप्रिल 2018

कोल्हापूर - कचरा म्हणजे भाजीपाल्याची देठे, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कागदाचे बोळे, खाऊची पाकिटे एवढं आपल्याला माहिती आहे; पण माणुसकीचाही कसा कचरा झाला आहे, याचे वास्तव एस.टी. स्थानकालगतच्या महापालिकेच्या रिकाम्या गाळ्यात पाहायला मिळते आहे.

कोल्हापूर - कचरा म्हणजे भाजीपाल्याची देठे, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कागदाचे बोळे, खाऊची पाकिटे एवढं आपल्याला माहिती आहे; पण माणुसकीचाही कसा कचरा झाला आहे, याचे वास्तव एस.टी. स्थानकालगतच्या महापालिकेच्या रिकाम्या गाळ्यात पाहायला मिळते आहे.

घरात नको झालेल्या, आजाराने खंगलेल्या आणि आता यांना कशाला सांभाळायचे म्हणून अक्षरशः रस्त्याकडेला सोडून दिलेल्या १९ महिला या गाळ्यात दिवस काढत आहेत. अवनि, एकटी संस्थेने त्यांना आधार दिला म्हणून दोन वेळ त्यांना खायला तर मिळते; पण आपण मुलांना आता नकोसे कसे झालो, हे यापैकी काही महिलांच्या तोंडून ऐकले तर माणुसकीचाच कसा कचरा झाला, हे पाहायला मिळते. 

यातल्या १९ पैकी १४ महिला घरातून हाकलून दिलेल्या आहेत. धक्कादायक बाब अशी की, या महिलांना एकटी संस्थेत आसरा मिळाल्यानंतर काही महिलांच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृत्यू झाला किंवा यांच्यावर मोठे उपचार करावे लागले तर आम्हाला कळवू नये. त्यांची पुढची जबाबदारी संस्थेनेच घ्यावी, असे लिहूनही दिले. काळ असा कठोर असतो याचे क्षणाक्षणाला चटके या महिला अनुभवत आहेत.

त्या राहात असलेल्या गाळ्याचे फाटक जरा जरी वाजले तरी ‘आपल्या घरातलं तर कोणी आलं नसेल ना’, या भावनेने त्या गॅलरीतून खाली पाहतात. आपलं कोण आलेलं नाही हे ध्यानात आलं की, गॅलरीतून डोकावणाऱ्या त्यांच्या माना हताश होऊन आत घेतात.

साधारण रस्त्याकडेला कचऱ्यात काही तरी धुंडाळणारी महिला पाहिली की ती वेडी आहे, अशीच आपली  समजूत असते. पण प्रत्यक्षात परिस्थिती खूप वेगळी असते. अशा १९ महिलांना एकटी संस्थेने निवारा केंद्रात आणले. त्यांना पहिल्यांदा गरम गरम पाण्याने आंघोळ घालून त्यांचे शरीर आणि मन हलके केले आणि त्यानंतर या महिलांच्या तोंडातून जे काही शब्द बाहेर पडू लागले ते ऐकून संस्थेचे कर्मचारीही गलबलून गेले. 

या १९ महिलांत आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या सधन तालुक्‍यातल्या, सधन घरातली एक साठी ओलांडलेली महिला आहे. तिला गावात रस्त्यावर सोडले. पोलिसपाटलाने आणून एकटी संस्थेकडे सोपवले. ‘‘नोटरी करून सगळे दिले’’ एवढेच ही महिला सांगते. नशिबाचे हे भोग कधी संपतील? हा प्रश्‍न समोर येणाऱ्या प्रत्येकाला विचारते. 

एक महिला काही विचारलं तर फक्त उद्वेगाने हसते. वरचा बघून घेईल, अशा आशयाने छताकडे हात उंचावते. एक महिला फक्त आकाशाकडे नजर लावून बसते. एकजण सतत झोपते. झोपलं तर तेवढंच दुःख विसरता येते, असे म्हणते. इथली प्रत्येक महिला म्हणजे वेगवेगळी कहाणी आहे. 

समाजमन असणाऱ्यांनी एकदा येऊन पाहावेच
माणुसकीचा कचरा कसा झाला, हे साम्य प्रत्येक कहाणीत आहे. उत्सव, वाढदिवस डॉल्बी, रोषणाई, जेवणावळी म्हणजे समाजाशी ‘नाळ’ जोडली असा समज असणाऱ्यांनी एकदा या १९ महिलांची अवस्था पाहून येण्याची गरज आहे. त्यांना घरच्यांनी सोडून दिलं असलं तरी आपण सर्वांनी सांभाळायचं ठरवलं तर ते सहज शक्‍य आहे.

या महिला एस.टी. स्थानकालगतच्या महापालिकेच्या गाळात एकटी निवारा संस्थेत आहेत. या परिसरातील रात्री सर्व गैरप्रकार चालतात. तरीही आम्ही या महिलांना आमच्या हिमतीवर सांभाळले आहे. आपल्या आईच्या वयाच्या या महिला जेव्हा त्यांची दुखणी सांगू लागतात तेव्हा डोळे डबडबून येतात. आम्ही आमच्या कुवतीनुसार त्यांना सांभाळणार आहोत; पण लोकांनी एकदा या महिलांकडे पाहावे. 
- अनुराधा भोसले

 

Web Title: Kolhapur News unhealthy senior citizen issue