विवाह सोहळ्यात बेरंग करणारा रंगीत धूर...

विवाह सोहळ्यात बेरंग करणारा रंगीत धूर...

कोल्हापूर - अक्षता पडल्या, बॅंड वाजू लागला. आता नवरा नवरी एकमेकांच्या गळ्यात हार घालणार तोवर नवऱ्याच्या मित्रांनी स्टेजवरच त्यांच्याकडील फटाकासदृश कांड्यातून रंगीत धूर सोडला. हिरवा, निळा, पिवळा, लाल रंगाचा धूर सर्वत्र पसरला. असेल काही क्षणाचा हा उत्साहाचा भाग असे उपस्थितांना वाटले, मात्र एका क्षणी अचानक नवरा नवरी, स्टेजवरचे उपस्थित जोरजोरात खोकू लागले. शिंकू लागले. धूर जसा पुढे पुढे पसरत गेला तसे सर्वच उपस्थित खोकू लागले. शिंकू लागले. खोकल्याची उबळ एवढी की अनेकजण खोकता खोकत कासावीस झाले. घाबरे घुबरे झाले. अनेकजण मंगल कार्यालयाबाहेर पळू लागले. या रंगीत धुरामुळेच हे सारे घडले हे सर्वांच्या लक्षात आले आणि अक्षरशः मंगल कार्यालय मोकळे झाले. 

तीन दिवसांपूर्वी वडगाव परिसरात एका लग्न समारंभात या रंगीत विषारी धुराचे नाट्य घडले. पुढे काही अघटित घडले नाही हे बरे झाले; पण लग्न समारंभात अशा विषारी रंगीत धुराच्या वापरामुळे काय अनर्थ घडू शकतो याची ‘झलक’ सर्वांना पाहायला मिळाली. कोल्हापुरात अलीकडे काही दिवसांत लग्न समारंभात असा फटाकासदृश कांड्यातून धूर सोडण्याचे फॅड आले आहे. ते फुटबॉलच्या मैदानावरही येऊन पोचले आहे.

बंदिस्त हॉलमध्ये अशा स्मोक फायरचा वापर धोकादायक ठरू शकतो. धुरामुळे खोकता खोकता श्‍वास बंदू पडू शकतो. या फायर स्मोकचे पृथक्करण करुन खबरदारीची जाहीर सूचना दिली जाईल. 
- रणजित चिले,
अग्निशामक दल प्रमुख, महापालिका

अतिशय घातक असा या धुराचा आनंदाच्या क्षणी वापर थांबण्याचीच गरज आहे. वधू वराकडील ज्येष्ठ लोकांनी स्टेजवर थांबून अशा अतिउत्साही विकृत ‘मित्रपरिवाराला’ रोखले तरच हे थांबू शकणार आहे. नाहीतर कधीतरी या विषारी रंगीत धुरामुळे अनर्थ घडणार आहे. लहान मुले, वृद्ध यांना तर हा धूर खूप धोकादायक आहे. अतिउत्साहाच्या भरात आपण काय अनर्थ घडवणार आहोत याचा विचारही न करणाऱ्या तरुण मंडळीमुळे हे घडत आहे. वडगाव येथे घडलेली घटना एक निमित्त आहे; पण धोक्‍याचा मोठा संकेत देणारी आहे. 

मंगल कार्यालयात फटाके किंवा रंगीत धुरासारखा कोणी वापर करत असेल तर कार्यालय चालकाने संबंधितावर पोलिस कारवाई करावी अशा सूचना आम्ही दिल्या आहेत. कारण एखादा अनर्थ घडल्यानंतर शहाणे होण्यापेक्षा अगोदरच काळजी घेण्यावर आमचा भर आहे. व्यवस्थापनाने पोलिसांना कळविल्यास अतिउत्साही तरुणांना चाप बसेल. 
- सागर चव्हाण,
अध्यक्ष 
कोल्हापूर जिल्हा मंगल कार्यालय संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com