निसर्गाशी एकरूप व्‍हा - देशमुख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

कोल्हापूर​ - किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत  वसुंधरा मित्र, वसुंधरा गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला

कोल्हापूर - ‘‘मानवी संसाधने आणि नैसर्गिक संसाधनांच्या संयोगातून मानवी जीवन सुसह्य होईल. निसर्गाबरोबर राहण्याचे समाधानही मिळेल’’, असे मत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले. 

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत  वसुंधरा मित्र, वसुंधरा गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला. राधानगरी येथील अनिल बडदारे, रणजित माजगावकर, एन्व्हायरो लीगल फोरमला वसुंधरा मित्र; तर विश्‍वास बालिघाटे, हेरवाड येथील बंडू ऊर्फ बाळगोंडा पाटील, कोगे येथील लहू मोरे यांना वसुंधरा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. मानचिन्ह, मानपत्र, वेखंडाचे रोप, जलचित्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. ॲड. केदार मुनीश्‍वर यांनी एन्व्हायरो लीगल फोरमतर्फे पुरस्कार स्वीकारला.

श्री. देशमुख म्हणाले, ‘‘मानवी नाते माणसाला सांभाळत असते. आपण हेच नातं निसर्गाबरोबरही निर्माण केले पाहिजे. २०५० मध्ये पिण्याच्या पाण्यावरून युद्धे होतील. पिण्याच्या पाण्याचे रेशनिंग होईल. खायच्या लायकीचे अन्न, पाणी २०५० मध्ये असेल का? श्‍वास घेण्यासाठी शुद्ध हवा मिळेल का, हा प्रश्‍न आहे. ’’

निसर्गमित्रचे अनिल चौगुले यांनी परिचय करून दिला. किर्लोस्कर कंपनीचे मानव संसाधन उपव्यवस्थापक राहुल पोवार यांनी प्रास्ताविक केले. उदय गायकवाड यांनी मानपत्राचे वाचन केले. भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी आभार मानले. दुर्गा आजगावकर, प्रतीक्षा व्हनबट्टे यांनी सूत्रसंचालन केले. किर्लोस्कर कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक (जनसेट विभाग) सुरेश मगदूम, सचिन जिल्हेदार, ‘सायबर’मधील प्रा. डॉ. भोसले, किर्लोस्कर महोत्सव समन्वयक समितीचे कृष्णा गावडे, सुवर्णा भांबुलकर, विजय टिपुगडे आदी उपस्थित होते.