भाजीपाल्याची विक्री नव्हे, तर खतासाठी गाडला शेतात

नांदणी: दर नसल्याने विक्रीस आलेला फ्लॉवरवर ट्रॅक्‍टर फिरविला जात आहे. 
नांदणी: दर नसल्याने विक्रीस आलेला फ्लॉवरवर ट्रॅक्‍टर फिरविला जात आहे. 

जयसिंगपूर - कर्नाटक सीमाभागातून भाजीपाल्याची वाढलेली आवक आणि कवडीमोल दरामुळे भाजीपाला टाकून देण्याची वेळ शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. भाजीपाला उत्पादक काळजावर दगड ठेवून उभ्या पिकावर नांगर फिरवत आहेत. तर काही शेतकरी भाजीपाला शेतात गाडून त्यांचा खतासाठी वापर करत आहेत.

शिरोळ तालुका भाजीपाला उत्पादनाचे आगर म्हणून ओळखला जातो. तालुक्‍यातील भाजीपाल्याने मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्येही आपला दबदबा निर्माण केला आहे. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षापासून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना विविध समस्यांनी घेरले आहे. दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल यातून होते. एखाद्या वर्षी भाजीपाल्याचे उत्पादन अथवा उत्पन्न घटले तरी जिद्दीने पुन्हा भाजीपाला पिकवणारा शेतकरी यंदा मात्र चांगलाच गांगरला आहे. 

सध्या भाजीपाला काढून बाजारपेठेत नेण्याचा दरही शेतकऱ्याला परवडेनासा झाला आहे. नजीकच्या कर्नाटक सिमाभागातून टोमॅटो, फ्लॉवर आणि कोबीची मोठ्या प्रमाणात आवक सुरु झाली आहे. यामुळे कोबी आणि फ्लॉवर पोत्यांनी येऊन बाजारात विक्रीसाठी येत असताना कोसळलेल्या दरामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी उसात कोबीचे आंतरपिक घेतले आहे. मात्र, दरच नसल्याने हा कोबी ऊसाला पोषक म्हणून शेतातच गाडला जात आहे. माणसांनी खाण्यासाठी पिकवलेल्या भाजीपाला जनावरांना द्यावा लागण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

ज्या भाजीपाल्याने तालुक्‍याची ओळख सर्वदूर नेली त्याच भाजीपाल्यामुळे इथला शेतकरी कोलमडला आहे. तालुक्‍यातील नांदणी, उमळवाड, कोथळी, दानोळी या गावांना भाजीपाल्याने लौकीक मिळवून दिला आहे. मात्र आजची स्थिती खूपच निराशजनक आहे. उभ्या भाजीपाल्याच्या पिकात ट्रॅक्‍टर फिरविण्याच्या वेदना शेतकऱ्याला सोसाव्या लागत आहेत. नांदणी येथील विजय संभुशेटे यांनी दर नसल्याने फ्लॉवरवर ट्रॅक्‍टर चालवून त्याचा हिरवळीच्या खतासाठी वापर केला आहे. यानंतर गावातील अनेक शेतकऱ्यांनी हा प्रकार सुरु केला आहे. 

उदगाव येथील अजित मगदूम यांनीही शेतातील कोबीचा वापर हिरवळीच्या खतासाठी केला आहे. काढणीनंतर ज्या ठिकाणी पॅकींग करायचे त्याच ठिकाणी कोबी गाडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांच्या कोबीच्या 50 किलोच्या पोत्याला 25 रुपये दर मिळाला. यानंतर नाराज झालेल्या मगदूम यांनी कोबी बाजारात नेण्याचे टाळत खतासाठी त्याचा वापर केला. दानोळीच्या टोमॅटोच्याबाबतही असेच चित्र आहे. शेतकऱ्यांनी टोमॅटो काढून रस्त्याकडेला फेकले आहेत. 

हमीभाव नाही, वेदना नित्याच्या
भाजीपाल्याला हमीभाव मिळत नाही. नगदी पिक म्हणून शासन याकडे दुर्लक्ष करते. हजारो रुपये खर्च करुन भाजीपाला पिकवायचा आणि बाजारात गेल्यानंतर अपेक्षित दर मिळत नसल्याने भाजीपाला उत्पादक आता ऊस पिकाकडे वळू लागला आहे. अशा स्थिती कोणता लोकप्रतिनिधीही भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घ्यायला तयार नाही. कोणत्या गावात किती भाजीपाला पिकवला जातो याची नोंदही कृषी विभागाकडे नसणे यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते असू शकते. 

कोबी दिड रुपये किलो
मोठ्या कष्टाने ऊसात कोबीचे आंतरपिक केले. कोबी काढून बाजारात गेला तेंव्हा केवळ दिड रुपये किलो दर मिळाला. उत्पादनाचा सोडा काढणीचा खर्च मिळाला नाही. कष्टाने पिकवलेल्या भाजीपाल्याच्या दराची हि अवस्था पाहून नाराज झालो. किमान ऊसाला तरी याचा फायदा होईल या अपेक्षेने कोबी शेतात गाडला जात आहे. भाजीपाल्याला दर नसला तरी उत्पादन खर्च कमी होत नाही. चार पैसे मिळतील या आशेने पिकवलेला भाजीपाला डोळ्यादेखत गाडताना खूपच वेदना होतात. 

- अमोल मादनाईक
भाजीपाला उत्पादक, उदगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com