वाहनाचे रजिस्ट्रेशन, लायसन रद्द

वाहनाचे रजिस्ट्रेशन, लायसन रद्द

गुटखा तस्करीवर बडगा - ‘अन्न, औषध’ देणार आरटीओला माहिती

कोल्हापूर - गुटखा तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाची नोंदणी रद्द करण्यासह चालकाचाही वाहन परवाना आता रद्द होणार आहे. यासंबंधी जप्त केलेले वाहन व चालकाच्या वाहनासंबंधी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओला) माहिती देण्याचे आदेश अन्न, औषध विभागाने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्यात गुटखा बंदी होऊन चार वर्षांचा कालावधी उलटला आहे. सुगंधी तंबाखू, पानमसाला, गुटखा आणि माव्यावर तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने बंदी घातली. भाजप सरकारनेही गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील गुटखाबंदीस मुदतवाढ दिली. राज्यात बंदी आणि शेजारील राज्यात गुटख्याचे कारखाने सुरू असल्याने चोरटी वाहतूक काही बंद झालेली नाही. किंबहुना आडमार्गाने गुटख्याची राजरोसपणे विक्री सुरू आहे. पानपट्टीच्या टपऱ्या, कोल्ड्रिंक हाऊस, चहाच्या टपऱ्या येथे मागणी केल्यास तातडीने गुटख्याची पुडी मिळते. 

अन्न व औषध प्रशासनाचे अपुरे मनुष्यबळ यामुळे गुटखा तस्करीला उघडपणे वाव मिळाला आहे. खात्याकडून काही तरी कारवाई केली यासाठी प्रत्येक जिल्ह्यात या विभागाकडून गुटखा जप्तीची कारवाई होते. गेल्या चार वर्षांतील निर्णयांचा आढावा घेता ही बंदी केवळ कागदोपत्री राहिली आहे, उघडपणे विक्री सुरूच असल्याचे दिसून येते. शेजारील राज्यात गुटखाबंदी लागू नसल्याने गुटखा तयार करण्याचे कारखाने सीमावर्ती भागात आहे.

तेथून हुपरी, हातकणंगले, कोगनोळी, अब्दुललाट, सांगली जिल्ह्यातील मिरज परिसर येथून गुटखा आणला जातो. अन्न व औषध प्रशासनाने पूर्वीही कारवाई केली आहे. गुटखा तस्करांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

अन्न, औषधच्या कार्यालयातून दरवर्षी कोट्यवधींचा गुटखा जप्त केला जातो. तो जाळला, की या विभागाची जबाबदारी संपते. गुटखा तस्कर अजूनही मोकाट आहेत. चोरट्या वाहतुकीला पायबंद बसलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर ज्या वाहनातून चोरटी आयात होते, ते जप्त करण्याचे आदेश मध्यंतरी झाले होते. नंतरही चोरट्या वाहतुकीत फरक न पडल्याने अखेर संबंधित वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि वाहनचालकाचा वाहन परवाना रद्द करण्यासंबंधी आरटीओला कळविण्यासंबंधी आदेश दिले आहेत.

राज्यभरातच गुटखा बंदी लागू असताना छुप्या मार्गाने मिळणारा गुटखा, मावा, सुगंधी तंबाखू आणि उत्पादन चर्चेचा विषय ठरला आहे. शेवटचा उपाय म्हणून वाहनाची नोंदणी आणि चालकाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय तरी कामी येतो का, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

गुटखा तस्करी रोखण्यासाठी संबंधित वाहनाची नोंदणी रद्द करण्यासह वाहचालकाचा परवाना रद्द करावा, यासंबंधी आरटीओशी पत्रव्यवहार करण्याचे आदेश झाले आहेत. काल मुंबईतील बैठकीत तसे आदेश देण्यात आले. यापुढे वाहन आणि चालकाची नोंदणी रद्द होईल. मनुष्यबळाची कमतरता असूनही कोल्हापूर कार्यालयाने कारवाई केली आहे.  
मोहन केंबळकर, सहाय्यक आयुक्त, अन्न, औषध प्रशासन

दोन वर्षांत ११३ ठिकाणी छापे 
अन्न व औषध प्रशासनाने गेल्या दोन वर्षांत ११३ ठिकाणी छापे टाकून एक कोटी बारा लाखांचा गुटखा जप्त केला. एक एप्रिल २०१४ ते ऑगस्ट २०१७ अखेर ही कारवाई झाली. एरव्ही पानपट्टी टपरीत मिळणारा गुटखा महामार्गावरील चहाच्या टपऱ्या तसेच कोल्ड्रिंक हाऊसमध्येही आढळून आला. आजअखेर एक कोटी बारा लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त झाला आहे. जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) बॉयलरमध्ये गुटखा जाळून नष्ट केला जातो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com