मटका अड्ड्यावर छाप्यात विजय पाटीलसह १३ अटकेत

मटका अड्ड्यावर छाप्यात विजय पाटीलसह १३ अटकेत

कोल्हापूर - शिवाजी पेठ, वेताळ माळ तालीम परिसरात सुरू असलेल्या विजय पाटीलच्या मटका अड्ड्यावर पोलिस उपाधीक्षक भारतकुमार राणे यांच्या पथकाने सायंकाळी छापा टाकला. या वेळी विजय पाटीलसह १३ जणांना अटक करून, त्यांच्याकडून साडेसहा लाखांच्या रोकडीसह सुमारे सात लाखांचा मुद्देमाल जुना राजवाडा पोलिसांनी जप्त केला. 

अटक केलेल्या संशयितांची नावे अशी - विजय लहू पाटील (वय ४७, रा. हळदी, करवीर), मकरंद मारुतराव मुद्‌गल (वय ५४, श्रीकृष्ण कॉलनी, देवकर पाणंद), समीर सुरेश नायर (वय ४०, रा. न्यू शाहूपुरी), सतीश जयवंत माने (वय ३०, रा. बालावधूतनगर, फुलेवाडी रिंगरोड), योगेश आनंदराव पावली (वय ३६, रा. बुद्धीहाळकरनगर, कळंबा रिंगरोड), विनायक राधाकृष्ण बागल (वय ४९, रा. जयभवानी कॉलनी, फुलेवाडी), हेमंत बाबूराव घोरपडे (वय ६१, रा. शाहूमिल कॉलनी, राजारामपुरी), किशोर बाजीराव माळी (वय ५२, गणेश गल्ली, कदमवाडी), पांडुरंग दत्तात्रय चव्हाण (वय ५९, कांडगाव, करवीर), चंद्रकांत तुळशीदास माने, (वय ६०, रा. जुना वाशीनाका), गौरव निरंजन खामकर (वय ३६, रा. वेताळ तालीम परिसर), सचिन सुभाष पाटील (वय ४३, रा. तस्ते गल्ली, मंगळवार पेठ) आणि अब्दुल राशिदबाबूसेठ हुकेरी (वय ४७, रा. आर. के. नगर) अशी आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शिवाजी पेठ, वेताळ माळ तालीम परिसरातील गजबजलेल्या वस्तीत पोलिस रेकॉर्डवर मटका बुकी अशी नोंद असलेला विजय पाटील हा मटका अड्डा चालवत असल्याची माहिती, करवीर पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक आरती नांद्रेकर यांना मिळाली. त्यांनी ही माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात कार्यरत असणारे पोलिस अधीक्षक भारतकुमार राणे यांना दिली. त्यांनी आज सायंकाळी जुना राजवाडा पोलिसांच्या मदतीने येथे छापा टाकला.

येथील राऊत गल्लीतील जगताप यांचे घर विजय पाटीलने दोन महिन्यांपूर्वी भाड्याने घेतले होते. पहिल्या मजल्यावरील भाड्याने घेतलेल्या हॉलमध्ये हा मटका अड्डा सुरू होता. येथे पोलिसांनी छापा टाकला. या वेळी विजय पाटील व त्यांच्या १२ साथीदारांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र बाहेर पडण्याला दुसरी जागाच नसल्याने ते सगळे पोलिसांच्या जाळ्यात सापडले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा लाख ४८ हजारांच्या रोकडीसह मोबाईल संच, लॅपटॉप, कॅलक्‍युलेटरसह मटक्‍याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.

साकोली कॉर्नर येथे गेल्या वर्षी विजय पाटीलच्या मटका अड्ड्यावर तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी छापा टाकून विजय पाटीलसह त्याच्या साथीदारांना अटक केली होती. दरम्यान जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धाळा गार्डन परिसरात सुरू असलेल्या दोन मटका अड्ड्यांवरही पोलिस उपाधीक्षक राणे यांच्या पथकाने छापा टाकला होता. त्यात २३ जणांना अटक केली होती. त्यापाठोपाठ राणे यांनी ही दुसरी कारवाई केली. 

डी. बी. पथके करतात काय?
हद्दीत एकही अवैध धंदा सुरू राहता कामा नये, असे आदेश पोलिस अधीक्षकांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत; तरीही जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू आहेत. ते शोधून काढून त्यावर कारवाई करण्याचे काम विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात कार्यरत असणाऱ्या उपअधीक्षक भारतकुमार राणे यांना करावे लागते. हे धंदे डी. बी. पथकाला का सापडत नाहीत, अशी विचारणा घटनास्थळावरील नागरिकांत सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com