सूर्योदय, सूर्यास्त अाणि तिरंगा

सुधाकर काशीद
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

महापालिकेतील विक्रांत बाळासाहेब वासुदेव या कर्मचाऱ्याच्या आगळ्यावेगळ्या कामाची ही कथा आहे. तो महापालिकेच्या पब्लिक वर्क्‍स डिपार्टमेंटचा कर्मचारी. त्याच्याकडील कामाचे स्वरूप म्हणजे महापालिका इमारतीवरील तिरंगा झेंडा रोज चढवणे आणि उतरवणे.

कोल्हापूर - सूर्योदय किती वाजता आणि सूर्यास्त किती वाजता याचा वर्षभराचा तक्ताच त्याच्याकडे आहे. सूर्योदयाच्या आधी पंधरा मिनिटे तो महापालिकेच्या इमारतीवरील ध्वजस्तंभाजवळ जातो, झेंडा दोरीला व्यवस्थित बांधतो आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेलाच झेंडा वरती चढवतो. झेंड्याला सलाम करतो. सूर्यास्ताच्यावेळीही असेच काम. बरोबर सूर्यास्ताची वेळ घड्याळात पाहून तो झेंडा खाली उतरवतो. झेंड्याची व्यवस्थित घडी घालून तो पेटीत ठेवतो. गेली दहा वर्षे सुटी, रजा न घेता, त्याचे हे काम सुरू आहे. स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा तिरंगी झेंडा रोज फडकवायचे काम मिळाल्याचा त्याला अभिमान आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ एक मिनिटानेही कधी चुकवली नाही. 

महापालिकेतील विक्रांत बाळासाहेब वासुदेव या कर्मचाऱ्याच्या आगळ्यावेगळ्या कामाची ही कथा आहे. तो महापालिकेच्या पब्लिक वर्क्‍स डिपार्टमेंटचा कर्मचारी. त्याच्याकडील कामाचे स्वरूप म्हणजे महापालिका इमारतीवरील तिरंगा झेंडा रोज चढवणे आणि उतरवणे. त्यानंतर महापालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व्हीनस कॉर्नर चौकातील छत्रपती राजाराम महाराज, आईसाहेब महाराज व दसरा चौकातील छत्रपती शाहूंच्या पुतळ्यास हार घालणे. जयंती, पुण्यतिथीला हे पुतळे स्वच्छ धुणे हे त्याचे काम. 

वरवर हे काम साधे वाटते; पण झेंडा चढवणे व उतरवणे, हे अतिशय जोखमीचे काम असते. रोज सकाळी झेंडा चढवणे व दिवस मावळला की झेंडा उतरवणे एवढेच त्याचे स्वरूप नसते. त्यासाठी सूर्यादय व सूर्यास्ताची वेळ महत्त्वाची असते व त्याच वेळेस हे काम करावे लागते. इतर कोणत्याही कामात थोडे मागे-पुढे चालते; पण येथे वेळ आणि झेंड्याचा मान याला महत्त्व असते. त्यासाठी विक्रांत याने वर्षभरातील सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळा टिपून ठेवल्या आहेत. याशिवाय एकदा चढवलेला झेंडा चुकून खाली घसरला तर तो झेंड्याचा अवमान होतो. त्यामुळे झेंडा चढवल्यावर तो घट्ट बांधावा लागतो.

दहावेळा गाठीचा अंदाज घ्यावा लागतो. या कामासाठी महापालिकेत दुसरा माणूस नाही. त्यामुळे विक्रांतच न चुकता हे काम करत आहे. हा झेंडा चढवल्यावर तो शुक्रवार पेठेतील रणसिंग यांच्या घरातून हार आणतो आणि ते हार शाहू, आंबेडकर, राजाराम व आईसाहेब यांच्या पुतळ्यास घालतो. एका उंच काठीस तो हार अडकवतो व अलगदपणे पुतळ्यास घालतो. या कामात त्याला सुटी नाही; पण त्याला या कामाचा अभिमान आहे. तिरंग्यासाठी एक छोटेसे काम रोज न चुकता करण्याची संधी मिळाली, हे त्याच्या दृष्टीने भाग्याचे आहे. 

एखाद्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचे निधन झाले, तर झेंडा अर्ध्यावर उतरवावा लागतो. झेंड्याचे कापड जीर्ण झाले आहे, असे जाणवले तर वरिष्ठांना सांगून नवा झेंडा घेतो. विशेष हे की, महापालिकेतील ध्वजस्तंभ तिसऱ्या मजल्यावर आहे.
- विक्रांत वासुदेव

Web Title: Kolhapur News Vikrant Vasudeo and national flag special story