पावसानं कोल्हापूर शहर तुंबलं

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - ढगांच्या गडगडाटासह आज सलग दुसऱ्या दिवशीही धुवाँधार पावसाने शहर तुंबवून टाकले. रविवारी झालेल्या स्थितीप्रमाणे  सोमवारीही रस्त्यांना ओढे आणि नाल्यांचे स्वरूप आले होते. 

कोल्हापूर - ढगांच्या गडगडाटासह आज सलग दुसऱ्या दिवशीही धुवाँधार पावसाने शहर तुंबवून टाकले. रविवारी झालेल्या स्थितीप्रमाणे  सोमवारीही रस्त्यांना ओढे आणि नाल्यांचे स्वरूप आले होते. 

शहरात जिल्हाधिकारी कार्यालय, केव्हीज पार्क, गांधी मैदान, शिवाजी स्टेडियम, लाईन बाजार, गांधी मैदान, दुधाळी, फोर्ड कॉर्नर, रंकाळा ते टॉवरपर्यंतच्या रस्त्यांना अक्षरश: ओढ्यांचे स्वरूप आले होते. अतिवृष्टीने झालेली दैना सावरत असतानाच सोमवारी पुन्हा धुवाधार पावसाने शहराला झोडपून काढले. कपिलतीर्थ मार्केट, शाहू उद्यान, शाहूपुरी येथील भाजी मंडईतही पाणी शिरले; मात्र रविवारच्या अतिवृष्टीने सावधगिरी बाळगलेल्या व्यापाऱ्यांना आपले नुकसान टाळता आले. पाऊस सुरू झाल्यानंतर खरेदीसाठी फुललेला बाजार पाच मिनिटांत रिकामा झाला. पाऊस उघडल्यानंतरही बाजार रिकामाच राहिल्याने इतर वेळेपेक्षा लवकरच बाजार बंद करावा लागला. जोरदार वाऱ्यामुळे शिवाजी स्टेडियम व टेंबे रोडवरील इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या दुकानांत पाणी शिरले. इलेक्‍ट्रॉनिक साहित्य भिजू नये, यासाठी विक्रेत्यांची धांदल उडाली. दरम्यान, सायंकाळी सातपर्यंत पावसाने धुमाकूळ घातला होता.

कसलं स्ट्रॉम वॉटर अन्‌ कसलं काय?
स्ट्रॉम वॉटर या हेडखाली महापालिकेने शंभर कोटींहून अधिक रुपये खर्च केले आहेत; पण कसलं स्ट्रॉम वॉटर ड्रेन अन्‌ कसलं काय म्हणण्याची वेळ आली आहे. आयआरबी कंपनीने केलेल्या रस्त्यालगतच्या गटारी या फक्त पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठीच आहेत, हे ठासून सांगितले जात होते; पण या गटारी अर्धवट अवस्थेतच सोडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी या गटारीत अडथळे आहेत. त्यामुळे ५० किलोमीटर केलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटारीतून एक थेंबही पाणी वाहून जात नाही. हे सगळे पाणी रस्त्यावरूनच वाहते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च गटारांवर होऊनही पाणी रस्त्यांचे ओढे करीत आहेत. त्यामुळे गटारांवर केलेला खर्च तर वाया गेलाच आहे; पण चांगले केलेले रस्तेही या पाण्यामुळे खराब होण्याचा मोठा धोका आहे.

गटारींची सफाई हवी 
गेल्याच आठवड्यात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पदपथ साफ करण्याची सूचना झाल्यानंतर स्वतंत्र मोहीम राबवून साफसफाई करण्यात आली. त्यावरचे गवत काढले. त्याच धर्तीवर आयआरबी कंपनीने केलेल्या रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूच्या गटारीही साफ करायला हव्यात. या गटारी जेथे मुख्य नाल्याला जोडलेल्या नाहीत अथवा अखंडित आहेत, तेथे त्या जोडून पूर्ण करायला हव्यात; अन्यथा रस्तेही खराब होतच राहणार.

भाविकांची धावपळ
- नवरात्रीनिमित्त इतर जिल्ह्यांतून शहरात आलेल्या भाविकांचे आजही हाल झाले. पार्किंग करण्यासाठी गेलेल्या वाहनांमधून उतरलेल्या भाविकांची आडोसा शोधताना चांगलीच धावपळ उडाली. 
- काल आणि आजच्या पावसामुळे गांधी मैदानात गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचल्याने गांधी मैदानाचे गांधी तळे झाले आहे. 
- पावसाचा जोर जसजसा वाढत गेला, तसे परीख पुलाखालीही गुडघ्यापर्यंत पाणी वाढले. त्यामुळे पुलाखालूनची वाहतूक बंद झाली.

हे केले पाहिजे... 
- प्लास्टिकचा वापर टाळावा.
- डायपर, सॅनिटरी नॅपकीन 
- गटारीत टाकू नका.
- प्लास्टिकच्या रिकाम्या 

-  बाटल्या गटार, नाल्यात टाकू नका.
- कचरा कोंडाळ्यातच टाका.
- ओला कचरा आणि सुका 
- कचरा वेगवेगळा करा.