वाहन चालविणाऱ्या अल्‍पवयीन मुलांवर कारवाईचे स्वागतच

वाहन चालविणाऱ्या अल्‍पवयीन मुलांवर कारवाईचे स्वागतच

कोल्हापूर - वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांवरील कारवाईबाबत पालकांनीही मोहिमेचे स्वागत केले आहे. खरोखरंच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन झाले, तर आपोआपच वाहतुकीला शिस्त लागेल. वाहतूक कोंडीपासून सुटकाही होईल. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सुरू केलेल्या या मोहिमेचे सर्वत्र स्वागत होत आहे. आता अशीच कारवाई शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात झाल्यास याचे परिणाम दिसू लागतील.

दिवसभरात अनेक जण आजारी 
ताराराणी पुतळ्याजवळ अल्पवयीन मुलाला थांबविले. त्याने बहीण आजारी आहे, दवाखान्यात आहे, असे सांगून तो वाहतूक शाखेच्या पोलिसांजवळ भावुक झाला. त्यावर पोलिसाने सांगितले, आज दिवसभरात अनेक जण आजारी पडत आहेत... गाडी येथे लावा आणि रिक्षाने दवाखान्यात जा. येतो तो कोणाला ना कोणाला आजारी पाडतो... असे म्हणतच त्यांनी मुलाच्या पालकांना नोटीस काढली.

अल्पवयीन मुले वाहन चालवताना पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच आहे. विशेष मोहीम राबवून ही कारवाई सुरू आहे. ती सुरूच राहणार आहे. कायद्याप्रमाणेच पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. संबंधित पालक किंवा वाहनमालकांना न्यायालयात उभे राहावे लागल्याने याला चाप बसेल. त्यामुळे ही मोहीम पुढेही सुरूच राहणार आहे. ती अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.
 - संजय मोहिते, 

 पोलिस अधीक्षक

साहेब, पोरं ऐकतच नाहीत...
साहेब, पोरं ऐकतच नाहीत, आता आम्हीच कोर्टात उभं राहतो. आता तरी सुधारतात काय ते पाहूया, अशा शब्दात हतबल पालक शहर वाहतूक नियंत्रण शाखेत (ट्रॅफिक) येऊन आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. या पोरा समोरच मला इंथ फरशी पुसायला लावा, लोटायला लावा म्हणजे त्याला लाज वाटते का ते पाहुया, अशा शब्दात एक माहिला पालकाने आपली हतबलता व्यक्त केली. वडील पुण्यात नोकरीला असतात त्यांच्या अपरोक्ष आईचे न ऐकता मुलगा मोपेड घेऊन जातो. ‘माझं मी, पोलिसांचे पाहतो’ असेही वर सांगून जातो, अशी ही कबुली महिलेने पोलिसांसमोर दिली.

वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांना पकडून त्यांच्यावर कारवाई करताना अनेक प्रतिष्ठांकडून वाहतूक शाखेत फोनाफोनी होत आहे. सोडविण्याची विनंती केली जात आहे, दबाव आणण्याचा प्रयत्न केला  जात आहे. तरीही अल्पवयीन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई होणारच, अशी ठाम भूमिका आम्ही घेतली आहे, त्यामुळे कोणीही दबाव आणला तरीही कारवाई सुरूच राहील.
- अशोक धुमाळ,
पोलिस निरीक्षक-शहर वाहतूक शाखा

कारवाई कोणत्या आधारे
मोटार वाहन कायदा १९८८ कलम १८०-५ (१) आणि ४(१) १८१ नुसार पोलिसांकडून ही कारवाई सुरू झाली आहे. वाहन परवाना नसताना वाहन चालविण्यास देणे, तसेच वाहन मालकाकडून अल्पवयीन मुला-मुलींना वाहन चालविण्यास देणे या कायद्याचा आधार पोलिसांनी घेतला आहे.

शिक्षा आणि दंड
एक हजार रुपये दंड किंवा तीन महिने साधा कारावास किंवा दोन्हीही अशा शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. तसेच दंड न भरल्यास तीन दिवस साधी कैदही सुनावली जाऊ शकते. यामुळे वाहन मालक किंवा ज्याने वाहन चालविण्यास दिले आहे, असे दोघेही किंवा ज्याने वाहन चालविण्यास दिले आहे त्याला दोषी धरले जाऊ शकते, असे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

मी गाडी दिली नाही, मी येणार नाही
साहेब, तुमच्या मुलाला गाडीसह ट्रॅफिक ऑफिसला आणले आहे, तुम्ही येऊन जा, असा निरोप आज दुपारी एका मुलाच्या पालकांना देण्यात आला. यावर पालकांनी प्रतिक्रिया दिली ‘‘त्याला मी गाडी दिली नाही, मी ट्रॅफिक ऑफिसला येणार नाही,’’ यावर पोलिसांनी गाडी मालकांना फोन लावला. त्या महिला होता. त्यांनी मी माझ्या मुलाला गाडी दिली होती, त्याने मित्राला दिली आता आम्ही काय करू? असा 
प्रतिप्रश्‍न केला. अखेर पोलिसांनी गाडी मालक म्हणून संबंधित महिलेला नोटीस बजावली. मुलाने मित्राला गाडी दिली त्याची शिक्षा मुलाच्या आईला भोगावी लागली. त्यामुळे मित्रांना गाडी देण्यापूर्वी त्याचा वाहन परवाना आहे का, याची खात्री करा.

कारवाईचा धडाकाच
अल्पवयीन मुले वाहन चालविताना त्यांना पकडण्याची मोहीम तीन दिवसांपूर्वी सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी आठ जणांवर, दुसऱ्या दिवशी नऊ जणांवर आणि तिसऱ्या दिवशी २५ जणांवर कारवाई झाली. आज चौथ्या दिवशी १४ जणांवर कारवाई केली.

ग्रामीण भागातही आवश्‍यक
शहराच्या आजूबाजूच्या निमशहरी गावातही वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाई झाली पाहिजे. विशेष करून गांधीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज, कागल, पन्हाळा रोड, अशा मार्गावर कारवाई गरजेची आहे, तसेच दुचाकीवरून तिब्बल सीट जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यालाही पायबंद घालण्यासाठी सर्वत्र कारवाई आवश्‍यक बनली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com