कुठे आहे इंधन तपासणी सूची?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे पेट्रोल पंपावर आवश्‍यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध ठेवण्यासह नियमांचे काटेकोर पालन करण्याची ताकीद दिली आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर या नियमांना हरताळ फासला जातो. पंपावर पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह आणि टायरमध्ये हवा भरण्याची सोय उपलब्ध असणे अनिवार्य आहे. मात्र अनेक पंपांवर या सुविधा असून नसलेल्याच स्थितीत आहेत.  

पंपावर सुविधा न मिळाल्यास तशी तक्रार पंपावरील तक्रार पुस्तिकेत करता येते. त्याची तपासणी झाल्यानंतर कारवाई होण्याची शक्‍यता असते. मात्र या तक्रार पुस्तिकांची माहिती ग्राहकांनाही नाही आणि कुणी तक्रार नोंदवायची म्हटले तर तक्रार पुस्तिकाच नाही, असे चित्र बहुतांश ठिकाणी आहे. 

काही पंपावर ‘तपासा आणि भरा’ अशा आवाहनाची सूची लावण्यात आली आहे. मात्र ती ग्राहकांच्या नजरेला पडणार नाही, अशा पध्दतीने लावली गेली आहे. त्याशिवाय बहुतांश पंपावर तिचे अस्तित्वच नाही. या सूचीवर ‘आम्ही आपणास इंधन तपासणीसाठी आमंत्रित करीत आहोत’ असे आवाहन करून तपासणीची प्रक्रिया सचित्र स्पष्ट केली आहे. ग्राहकांना पेट्रोलमध्ये भेसळ आहे का,याची तपासणी करायची असल्यास 

फिल्टर पेपर टेस्ट घेण्याचा त्याला अधिकार आहे.त्यासाठी पंपावर फिल्टर पेपर उपलब्ध असायला हवेत.फिल्टर पेपरवर पेट्रोलचा एक थेंब टाकल्यास त्याचे कोणत्याही डागाशिवाय त्वरित बाष्पीभवन झाल्यास ते पेट्रोल शुध्द तर कागदावर डाग पडून थोड्या वेळाने बाष्पीभवन झाल्यास त्यात भेसळ असल्याचे सिध्द होते. पेट्रोल व डिझेलची घनताही पंपावर तपासता येते.त्यासाठी हायड्रोमीटर- थर्मामीटर पंपावर उपलब्ध असायला हवे. या सहाय्याने घनता मोजूनही शुध्दता तपासता येते. त्याशिवाय सर्व पंपावर वैधमापन शास्त्र विभागाने प्रमाणित केलेले पाच लिटरचे माप उपलब्ध असायला हवे. ग्राहकांना पेट्रोल कमी मिळते, अशी शंका आल्यास या मापाचा उपयोग करता येतो.     

कामगारांकडूनही लूट
अनेक पेट्रोल पंपावर तेथील कामगार वाहनधारकांची लूट करीत असल्याच्या तक्रारी आहेत. वाहनात पेट्रोल टाकताना हातचलाखीने ही लूट होते. विशेष म्हणजे, याकडेही पेट्रोल पंपचालक व संबंधित यंत्रणाही जाणिवपूर्वक दुर्लक्ष करते.